देश आज म्हणजे ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिवस साजरा करत आहे. दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या दिवशी हा दिवस साजरा केला जातो. त्यांचं निधन १५ डिसेंबर १९५० रोजी सकाळी ९ वाजून ३७ मिनिटांनी मुंबईमध्ये एका प्रदीर्घ आजाराने झाला. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाचं, मुलांचं काय झालं? तेही राजकारणात आले का?
पटेल यांची मुलगी अनेक वर्षे काँग्रेसची खासदार होती. पण त्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांचा पक्ष सोडला आणि जनता पक्षात सहभागी झाल्या, तिथून त्या निवडणूक लढल्या आणि जिंकल्याही. पटेलांचे घराणे राजकारणात सक्रिय नव्हते असं नाही, उलट ते फार सक्रिय होते असंच म्हणायला हवं. त्यांचा मोठा मुलगा दहया हे मुंबईतील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांमध्ये होते. तर कन्या मणिबेन पटेल या चांगल्या सक्षम राजकारणी होत्या.
जोपर्यंत दोघेही राजकारणात होते, तोपर्यंत त्यांची ओळख सरदार पटेलांच्या नावानेच होती. सत्तरच्या दशकात पटेलांचा मुलगा आणि मुलगी दोघांचाही काँग्रेसशी भ्रमनिरास झाला. पटेल यांची कन्या मणिबेन पटेल अधिक प्रखर आणि सक्रिय होत्या. खूप प्रामाणिकही होत्या. त्या आयुष्यभर अविवाहित राहिल्या. १९८८ मध्ये त्यांचं निधन झालं.
शेवटच्या वर्षांत मणिबेन यांची दृष्टी खूपच कमकुवत झाली. अहमदाबादच्या रस्त्यावर त्या एकट्या फिरताना दिसत. कमकुवत दृष्टीमुळे त्या दोन वेळा अडखळून पडल्याच्या बातम्याही आल्या होत्या. मणिबेन यांनी तरुणपणापासूनच आपलं आयुष्य काँग्रेस आणि महात्मा गांधी यांना समर्पित केलं होतं. अहमदाबादमधील त्यांच्या आश्रमातही मणिबेन बराच काळ राहिल्या. नंतरच्या काळात त्या दिल्लीत पटेल यांच्यासोबत राहू लागल्या. त्या वडिलांचे दैनंदिन काम पाहत आणि सेक्रेटरी म्हणून त्यांना मदत करत. त्यामुळे काँग्रेसचे जवळपास सर्वच नेते त्यांना चांगले ओळखत होते.
पटेल यांच्या मृत्यूनंतर बिर्ला यांनी त्यांना बिर्ला हाऊसमध्ये राहण्यास सांगितलं, परंतु त्यांनी नकार दिला. त्यावेळी त्याच्याकडे फारसे पैसेही नव्हते. त्या अहमदाबाद इथं नातेवाईकांच्या घरी गेल्या होत्या. त्या बस किंवा ट्रेनमध्ये थर्ड क्लासमध्ये प्रवास करत. पुढे काँग्रेस नेते त्रिभुवनदास यांच्या मदतीने त्या खासदार झाल्या. गुजरात काँग्रेसमध्ये त्यांनी प्रभावी पदे भूषवली. अनेक संस्थांमध्ये त्या शेवटपर्यंत विश्वस्त किंवा पदाधिकारी म्हणूनही राहिल्या.
पटेल यांचे पुत्र दहयाभाई पटेल यांचं १९७३ मध्ये निधन झालं. शिक्षण पूर्ण करून त्यांनी मुंबईतील एका विमा कंपनीत चांगल्या पदावर काम करायला सुरुवात केली. त्यांना बिपिन आणि गौतम अशी दोन मुलं होती. पहिल्या पत्नीपासून बिपिन आणि दुसऱ्या पत्नीपासून गौतम. वास्तविक, पहिली पत्नी यशोदा हिच्या मृत्यूनंतर त्यांनी दुसरं लग्न केलं. दहयाभाईंनीही स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. तुरुंगात गेले. स्वातंत्र्यानंतर त्यांनी १९५७ ची लोकसभा निवडणूक लढवली. १९६२ मध्ये राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आले.
सरदार पटेल अनेकदा आपल्या मुलांना राजकारणापासून दूर राहण्याचा सल्ला देत असत. आपल्या मुलांद्वारे लोक आपल्या पदाचा फायदा घेऊ शकतात असं त्यांना वाटलं. दहया यांचा मोठा मुलगा बिपिन याचं २००४ मध्ये निधन झालं. त्यांना मूलबाळ नव्हतं. दुसरा मुलगा गौतम जिवंत आहे. त्यांनी काही वर्षे अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये अध्यापन सुरू ठेवलं आणि नंतर ते भारतात परतले. आता वडोदरात राहतात. गौतमचा मुलगा केदार अमेरिकेत स्थायिक झाला आहे.
गौतम त्यांचे आजोबा वल्लभभाईंबद्दल कोणतेही मत जाहीरपणे मांडत नाहीत. प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या परीने त्याचे भांडवल करू लागतील, असं त्यांना वाटतं. पटेलांच्या नावावर आजकाल जे राजकारण केलं जात आहे त्यावरही त्यांचा आक्षेप आहे. पटेल कुटुंबाशी संबंधित आणखी काही लोक आनंद इथे राहतात, त्यांचा व्यवसाय आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.