लखनऊ : शिर्डीचे साई बाबा यांच्या पुजाविधीवरुन अधुनमधून वाद उफाळून येत असतो. यामध्ये एक वर्ग याला विरोध करताना दिसतो तर एक वर्ग याला पाठिंबा देताना दिसतो. आता तर देवभूमी असलेल्या वाराणसी अर्थात उत्तर प्रदेशातील काशी इथल्या मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात आल्या आहेत. तसंच या हटवलेल्या मूर्तींचं गेगेच्या पाण्यात विसर्जन करण्यात येत आहे. केंद्रीय ब्राह्मण सभेनं साईबाबांच्या मूर्तींच्या पुजनाला विरोध दर्शवला आहे. त्यानुसार सनातन रक्षक दल नामक संघटनेनं या मूर्ती हटवल्या आहेत.
आत्तापर्यंत १४ मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती काढण्यात आल्या आहेत. या मूर्ती हटवण्यामागचं कारण सनातन रक्षक दलानं असं सांगितलंय की, साईबाबा हे मृत व्यक्ती होते. त्यामुळं मृत व्यक्तीची पूजा कुठल्याही मंदिरात होऊ शकत नाही, अशी पूजा केवळ घरामध्ये होऊ शकते. त्यामुळं साईबाबांच्या सर्व मूर्ती हटवण्यात येत आहेत. मंदिरांमध्ये केवळ सूर्य, विष्णू, शिव, शक्ती आणि गणपती यांच्याच मूर्तींची स्थापना केली जाऊ शकते. मंदिर प्रशासनाची परवानगी घेतल्यानंतर तसंच प्रथापरंपरेनुसार पुजा करुन साईबाबांच्या मूर्ती काढण्यात आल्या आहेत, असंही सनातन रक्षक दलानं स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, यावरुन आता राजकारण देखील तापताना दिसत आहे. उत्तर प्रदेशातील सत्ताधारी भाजप, विरोधकांमधील समाजवादी पार्टी आणि काँग्रेसनं यावरुन भाजपवर निशाणा साधला आहे. शिर्डीच्या साई संस्थाननं देखील काशीतील ब्राह्मण सभेनं केलेल्या या कृत्यावर आक्षेप घेतला आहे. साई संस्थानच्या प्रतिनिधींनी म्हटलं की, "हिंदू धर्मात सांगितलं आहे की संतांचा सन्मान करा, अवमान करु नका. त्यामुळं कुठल्याही भक्ताच्या आस्थेला ठेच लागेल असं कुठलंही काम करु नका"
साई प्रशासनाचा निषेध
साई बाबा हे सर्व धर्माचे प्रतिक आहेत. त्यांना फक्त वैदिक धर्मच किंवा मुस्लिम धर्मच लागत होता असं नाही. बाबा देहधारी होते तेव्हापासूनच हिंदू धर्मातील सर्व पूजा सुरु होत्या. म्हणून आज सुद्धा आम्ही ही परंपरा जपायचं काम करतो आहोत. संत हा परमेश्वर आहे आणि ही आपली परंपरा आहे. म्हणून आम्ही संतांना पूजनीय मानतो, असंही साई संस्थानच्या दुसऱ्या एका प्रतिनिधीनं म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.