श्रीनगर : दहशतवादी कारवायांमुळे अशांत झालेल्या जम्मू आणि काश्मिरमध्ये एकावन्नवर्षीय मौलवीकडून सुफीवादाच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मोहम्मद अश्रफ असे या मौलवीचे नाव असून सुफीवादातून कट्टरतावादाचा यशस्वीपणे सामना केला जाऊ शकतो, असा त्यांचा दृढ विश्वास आहे. २०१८ मध्ये जम्मू आणि काश्मिरमधील दहशतवादी हल्ल्यात ते अंशत: दिव्यांग झाले आणि आधारासाठी हातात काठी आली. त्यातून सुफी तत्वज्ञानावरील त्यांचा विश्वास दृढ झाला.
मौलवी अश्रफ हे बिजबेहारामधील गुरी या गावाचे रहिवासी आहेत. ते १९९४ पासून सुफी संस्कृतीच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्नशील आहेत. काश्विर विद्यापीठाबरोबरच इस्लामिक विद्यापीठ आणि जम्मूतील राजौरी जिल्ह्यातील बाबा गुलाम शहा बादशहा विद्यापीठात सुफी अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ते याबद्दल म्हणाले,की माझे कुटूंब कट्टरतावादाचे बळी ठरले. दहशतवादी हल्ल्यात मी थोडक्यात बचावलो. मात्र, माझ्या नातेवाईकांना जिवंत जाळण्यात आले. सरकारकडून मदत मिळाली नसली तरी सुफीवादावरील श्रद्धा आणि लोकांच्या पांठिब्यामुळे इथवर मजल मारली. कट्टरतावाद एकाच धर्मापुरता मर्यादित नाही. आपण धर्म, पंथ किंवा जात आदींचा विचार न करता एकत्र येऊन कट्टरतावादी घटकांविरुद्ध लढण्याची गरज आहे , असेही त्यांनी नमूद केले.
शंभर मदरशांतून प्रचार
मौलवी अश्रफ यांनी सुफी तत्वज्ञानावर दोन पुस्तकेही लिहिली. काश्मिरमध्ये दहशतवादाचा केंद्रबिंदू असलेल्या शोपियाँमध्येही त्यांनी ‘स्वर्गाकडे परत’ ही पहिली सुफी परिषदही भरविली. या परिषदेला शेकडोजण उपस्थित होते. त्याचप्रमाणे मौलवी अश्रफ यांनी सुफी विचारधारेच्या प्रसारासाठी स्वयंसेवी संस्थेचीही स्थापना केली. जम्मू आणि काश्मिरात १०० मदरशांतून ते सुफी तत्वज्ञानाचा प्रचार करत आहेत.
सुफीवाद ही सहअस्तित्व, अध्यात्मिक उपदेश, बंधुत्व आणि सामाजिक सौहार्दावर विश्वास असणारी विचारधारा आहे. ती काश्मिरियतच्या सर्व कोनशिलांवर प्रेम करते. मात्र, अनेक वर्षांपासून केंद्र व राज्य सरकारांकडून या विचारधारेकडे दुर्लक्ष झाले. त्याचप्रमाणे, शैक्षणिक संस्थांमध्येही हा विषय शिकविण्यात न आल्याने समाजात कट्टरतावाद जोपासला गेला.
- मोहम्मद अश्रफ, मौलवी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.