नागपूर : आज आपल्या देशातील बहुतांश भागात मुलगा-मुलगी हा भेद गळून पडला आहे. म्हणून तर ‘मुलगी झाली समृद्धी आली’ असे मोठ्याने ओरडून सांगणारे या देशात आहेत. जन्मानंतर तिचे जोरदार स्वागतही केले जाते. किंबहुना मुलापेक्षा मुलगीच बरी असेही काही जण सांगतात. कितीही असले तरी मुलीचे लग्न, त्यानंतर तिचे सासर याबाबत पालकांना कायम चिंता असते. हीच बाब ओळखून प्रत्येक राज्य सरकारने मुलींसाठी योजना आणल्या आहेत. ज्यातून आपले संपूर्ण आयुष्य त्या सुखा-समाधानाने जगू शकतील. चला तर जाणून घेऊया या योजनांविषयी...
नुकतेच महाराष्ट्रात ‘डॉटर डे’ साजरा करण्यात आला. ‘डॉटर डे’ वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. भारतात सप्टेंबरच्या शेवटच्या रविवारी साजरा होते. या दिवशी सोशल मीडियावर अनेक पालकांनी मुलींविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावरूच कोणत्याही बाबतीत मुलगी मुलापेक्षा कमी नाहीच, हेच सिद्ध होते. या दिवशी अनेकांनी आपल्या मुलींना भेटवस्तू दिल्या. मुलींच्या अशा खास योजना आहेत, ज्या जाणून घेणे प्रत्येक पालकासाठी महत्वाचे आहे. हे लक्षात ठेवा की केवळ त्या राज्यातील लोकांना राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळतो.
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ ही भारत सरकारची एक मोहीम आहे. शंभर कोटींच्या निधीतून ही योजना सुरू झाली. हे प्रामुख्याने उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, पंजाब, बिहार आणि दिल्ली येथील गटांना लक्ष्य केले आहे. मुलींचे अस्तित्व आणि सुरक्षा आणि त्यांचे उच्च शिक्षण निश्चित करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. योजनेचा मूळ उद्देश भारतातील मुलींबाबत जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्यासाठी सुरू केलेल्या कल्याणकारी योजना सुधारणे आहे.
‘बालिका समृद्धी योजना’ ही शिष्यवृत्ती योजना आहे. त्याचा फायदा दारिद्र्यरेषेखालील मुलींना आणि त्यांच्या मातांना होतो. मुलींची स्थिती सुधारणे, लग्नाचे वय वाढविणे आणि शाळांमध्ये मुलींचा वाटा वाढविणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेत मुलीच्या जन्माच्या वेळी ५०० रुपये दिले जातात. शाळेच्या काळात मुलीला ३०० ते एक हजार रुपयांपर्यंत वार्षिक मदत दिली जाते.
‘लाडली लक्ष्मी योजना’ ही मध्य प्रदेश सरकारची योजना आहे. २००६ साली या योजनेची सुरुवात झाली. बालविवाह आणि स्त्री-भ्रूणहत्या रोखण्याचा उद्देश या योजनेचा आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी तुमच्या मुलीच्या नावे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात सहा हजार रुपये गुंतविले जातात. सहाव्या वर्गात दोन हजार रुपयांची गुंतवणूक केली जाते. नऊ वर्षांत चार हजारांची गुंतवणूक केली जाते.
‘कर्नाटक भाग्यश्री योजना’ ही योजना मध्य प्रदेशातील लाडली लक्ष्मी योजनेसारखीच आहे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणे या योजनेचे उद्दिष्ट आहे. आर्थिक फायद्यांबद्दल बोलताना या योजनेअंतर्गत मुलींना २५ हजारांपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण देण्यात आले आहे. त्याचबरोबर दहावीपर्यंत तीनशे ते एक हजार रुपयांपर्यंत वार्षिक शिष्यवृत्ती उपलब्ध आहे.
‘सीबीएसई उडान स्कीम’ ही योजना उडान सीबीएसद्वारे वंचितांना शाळेनंतर व्यावसायिक शिक्षण मिळावे म्हणून सुरू केली आहे. यात विज्ञान आणि गणिताकडे विशेष लक्ष दिले जाते. शाळेच्या काळातही या योजनेचा फायदा होतो. सीबीएसई उडान योजनेअंतर्गत अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणासाठी विनामूल्य सामान आणि ऑनलाईन व्हिडिओ अभ्यास सामग्री दिली जाते.
‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ महाराष्ट्रात ही योजना दारिद्र्यरेषेखालील व इतर दुर्बल घटकांमधील मुलींची स्थिती सुधारण्यासाठी सुरू केली गेली. या योजनेअंतर्गत आईला मुलीच्या जन्मापासून ते मुलगी पाच वर्षांची होईपर्यंत दरवर्षी पाच हजार रुपये मिळते. नंतर मुलीला पाचवीत प्रवेश घेईपर्यंत अडीच हजार रुपये वार्षिक दिले जाते. मुलगी अठरा वर्षांची झाल्यावर उच्च शिक्षणासाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाऊ शकते.
‘कन्या श्री प्रकल्प योजना’ ही पश्चिम बंगाल सरकारने सुरू केलेली योजना आहे. या योजनेच्या उद्दिष्टांमध्ये आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबांना मदत करून त्यांच्या मुलींचे जीवन आणि स्थिती सुधारणे समाविष्ट आहे. जेणेकरून आर्थिक समस्येमुळे कुटुंब अठरा वर्षांपूर्वी आपल्या मुलीचे लग्न करू नये, हा उद्देश आहे. या योजनेमुळे स्त्री-भ्रूणहत्या कमी झाली आहे. शाळेत जाणाऱ्या मुलींची संख्याही वाढली आहे. या योजनेअंतर्गत एक हजार रुपये वार्षिक शिष्यवृत्ती उपलब्ध आहे.
‘मुख्यमंत्री राजश्री योजना’ राजस्थानात या योजनेच्या माध्यमातून मुलीचा जन्म झाल्यावर २,५०० रुपये आणि एका वर्षाच्या लसीकरणासाठी २,५०० रुपये दिले जातात. यानंतर तुम्हाला पाहिलीत प्रवेशसाठी चार हजार रुपये आणि इयत्ता सहावीत प्रवेशासाठी पाच हजार रुपये मिळतात. इतकेच नाही तर तुमच्या मुलीला दहावीच्या प्रवेशासाठी अकरा हजार रुपये आणि बारावी उत्तीर्ण झाल्यास २५ हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते.
‘मुख्यमंत्री कन्या सुरक्षा योजना’ बिहार राज्यात या योजनेअंतर्गत बिहार सरकार मुलीच्या नावावर दोन हजार रुपयांची एफडी करते. जेव्हा मुलगी १८ वर्षांची होईल तेव्हा संपूर्ण रक्कम मिळते. ज्यात व्याजही समाविष्ट आहे. या योजनेचा लाभ कुटुंबातील फक्ता दोन मुलीपुरता मर्यादित आहे.
‘सुकन्या समृद्धी योजना’ ही विशेषतः मुलींचे आर्थिक भवितव्य लक्षात घेऊन सुरू केली गेली. योजनेअंतर्गत मुलीच्या नावे सुकन्या समृद्धी योजना खाते उघडू शकता आणि त्यात गुंतवणूक करण्यास प्रारंभ करू शकता. योजनेचा कालावधी १५ वर्षे आहे आणि एक वर्षात जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची गुंतवणूक करता येईल. गुंतवलेल्या पैशांवर व्याज दिले जाते. या योजनेत तुम्हाला कर लाभही मिळेल.
संकलन आणि संपादन - अतुल मांगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.