रागीगुड्डा येथे ईद-ए-मिलाद मिरवणुकीत दगडफेक झाल्यानंतर तणाव निर्माण झाला आहे.
बंगळूर : शिमोगा शहरातील (Shimoga) शांतीनगर भागात ईद-ए-मिलादच्या (Eid-e-Milad) मिरवणुकीवर रविवारी सायंकाळी समाजकंटकांनी दगडफेक केली. त्यात घरांच्या काचा फुटल्या व वाहनांचेही नुकसान झाले. त्यात काहीजण जखमीही झाले.
सध्या शहरात कडेकोट बंदोबस्त लागू केला आहे. शहरात जमावबंदी जारी केली असून तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, ४० हून अधिक समाजकंटकांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांना सांगितले.
रागीगुड्डा येथे रविवारी ईद-ए-मिलाद मिरवणुकीत दगडफेक झाल्यानंतर तणाव निर्माण झाला. रॅपिड अॅक्शन फोर्स (आरएएफ) च्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांच्या पथकांनी सौम्य लाठीमार केला. शिमोगाचे पोलिस (Shimoga Police) अधीक्षक जी. के. मिथुनकुमार यांनी शिमोगा येथील परिस्थिती आता शांततापूर्ण आहे आणि पोलीस शांतता राखण्यासाठी सर्व उपाययोजना करत आहेत, असे सांगितले.
दरम्यान, गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी सांगितले की, सर्व संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. मास्क घातलेल्या काही समाजकंटकांना आता अटक करण्यात आली आहे. बंदोबस्त वाढविला आहे. शिमोगा भाजपचे आमदार एस. एन. चन्नाबसप्पा म्हणाले, ‘‘ज्यांना दहशत पसरवायची आहे, त्यांच्यासाठी शिमोगा हे आश्रयस्थान बनले आहे.’’
जिल्हा सशस्त्र राखीव (डीएआर) च्या किमान १२ तुकड्या, आरएएफच्या दोन तुडक्या आणि कर्नाटक राज्य राखीव पोलिस (केएसआरपी) च्या दोन तुकड्या तसेच २,५०० पोलिस शहरात तैनात आहेत. त्यामुळे शहराला छावणीचे रुप आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.