महाराष्ट्रातील नामवंत अनुवादक व लेखिका सुनीती अशोक जैन यांचे 16 जुलै रोजी अल्पशा आजारानंतर मुंबईत दुःखद निधन झाले. `महाराष्ट्र टाईम्स’चे दिल्लीतील विशेष प्रतिनिधी व नंतर `महाराष्ट्र टाईम्स’चे मुंबईतील सह संपादक कै अशोक जैन व कै सुनीती जैन यांचा त्याच्या दिल्लीतील वास्तव्यात आलेला संबंध, झालेली मैत्री अनेक ऋद्य आठवणींनी भरली आहे. अशोकच्या प्रदीर्घ दुखण्यात सुनीतीनं त्याला दिलेली साथ, त्या अवस्थेत कोणतीही तक्रार न करता, आनंदी राहून ``त्याने सांगायचे व सुनीतीने लिहायचे,’’ असे करत अनेक पुस्तके लिहिण्यात व अनुवाद करण्यात सुनीतीने मदत केली. एवढेच नव्हे, तर तिनं स्वतंत्रपणे बृहन् मुंबईचे प्रशासन व इतिहास यावर अध्ययन करून, मुलाखती घेऊन लिहिलेल्या पुस्तकाने मुंबईविषयीच्या साहित्यात मोलाची भऱ टाकली आहे.
1 जुलै रोजी मुंबईहून सुनीतीचा फोन आला, तेव्हा थोरली कन्या बिल्वा लंडनला गेल्याचं तिनं सांगितलं. म्हणाली, धाकटी ``क्षिप्रा लौकरच ग्रीसला जाणार आहे. तिला कामातून उसंत मिळत नाही. म्हणून, जरा फिरून ये असं मीच सांगितलं.’’ या दोघीना आम्ही बिलू, शिपू या नावानं हाक मारतो. माझा मुलगा अक्षय व या दोघीही वयाने जवळपासच्या. त्यामुळे अशोक सुनीती व मुली यायच्या तेव्हा मुलांचा धुडगूस चालायचा. सुनीतीला इडली सांबार बनवायची भारी हौस. दोन चार दिवस पुरेल इतक्या इडल्या ती बनवायची व ती खाता खाता अशोक बेजार व्हायचा. मस्करी करीत म्हणायचा, ``आता `इ’ हे अक्षर कुणी काढलं, तरी मला चीड येते.’’
प्रा अशोक `महाराष्ट्र टाईम्स’ चा दिल्लीत प्रतिनिधी असताना सुनीती महाराष्ट्र सरकारच्या दिल्लीतील परिचय केंद्रात माहिती अधिकारी या पदावर काम करीत होती. अशोक प्रमाणेच सुनितीला विनोदाचं अंग होतं. त्यामुळे तिच्याशी बोलायला लागलं, की `हसी मजाक’ चाले. ती फटकळ होती. परंतु, कुणाचं मन दुखावेल, असे शब्द तिच्या तोंडून कधी बाहेर येत नसत. गिर्यारोहणाचा छंद तिनं केवळ जपला नाही, तर एका गिर्यारोहण गटाबरोबर ती एव्हरेस्टच्या बेस कॅंप (समुद्र सपाटीपासून 18 हजार फूट उंच) पर्यंत पोहोचली होती. एव्हरेस्ट गाठण्याचं तिचं स्वप्न होतं, पण प्रतिकूल हवामानामुळे ते शक्य झालं नाही. अशोकला मधुमेहाचा त्रास होता.
त्यामुळं त्याचा तिनं सखोल अभ्यास केला. तसंच, अशोकला त्याच्या आजरपणात द्यावी लागलेली औषधे, भेटलेले डॉक्टर्स त्यांनी वेळोवेळी काढलेली निदाने तिला मुखोद्गत होती. आम्ही बोलत असू, तेव्हा ती सारे सांगत असे. कोणत्या गोळ्यांचे काय गुणधर्म आहेत, ते घडाघडा सांगत सुटायची. तिला दागदागिऩ्यांचा, भपकेपणाचा, काही एक षौक नव्हता. सचोटीनं काम करण्यावर तिचा भार असायचा. जवळच राहाणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री कै रीमा लागू व सुनीती जिवलग मैत्रिणी होत्या. अशोकच्या आजारात त्याला व तिला जी आव्हाने पेलावी लागली, त्याबबत तिनं एक लेख लिहिला होता. तो मन सुन्न करणारा आहे.
मुंबईत गेल्यावर सुनीती काही वर्ष राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभागात अधिकारी पदावर होती. डॉ प्रदीप तळवळकर यांचे `डायबॅसिटी, या पुस्तकाचे `मधुमेही खुशीत’ या केलेल्या अनुवादाची प्रत माझ्यासाठी जपून ठेवली होती. मुंबईत्या एका भेटीत तिनं ती मला दिली. म्हणाली, ``अशोक प्रमाण तुलाही मधुमेह आहे. हे पुस्तक तुला फार उपयोगी पडेल.’’ अशोकनं केलेल्या व्योमकेश बक्षी व फेलूदा यांच्या अनुवादाचे सारे लिखाण सुनीतीनं केलं.
तसंच, डॉ रवि बापट यांच्याशी बोलून त्यांनी लिहिलेले `वॉर्ड नंबर 5’ हे पुस्तक खूप गाजलं. गेल्या दीड दोन वर्षात वासंती फडके सोबत मधु लिमये यांच्या पुस्तकाचा अनुवाद तिनं केला. त्या दिवसात काही संदर्भासाठी आमची सतत फोनवर बोलणी व्हायची. ``लिमयें (भाई) च्या पुस्तकाचा अनुवाद हे एक दिव्यच आहे, ते आव्हान मी स्वीकारलय असे ती सांगे.’’ तसंच, त्यांच्या `भारी’ इंग्रजीचा योग्य अनुवाद करता आला पाहिजे, यासाठी तिनं खूप कष्ट घेतले. दिल्लीत असताना अशोक व सुनीती यांची दैवतं म्हणजे मधु लिमये, चंपाताई लिमये तसेच, मधु दंडवते व प्रमिलाताई दंडवते ही होती. बातम्यांसाठी मी व अशोक अनेकदा एकत्रपणे या दोघांना भेटत असू. चंपाताई व प्रमिलाताई या दोघीही सुनीतीचं कौतुक करीत. वर्षाकाठी प्रमिलाताई सुनीतीला एखादी भेटही देत.
दिल्लीत आल्यावर सुनीती आम्हाला तर भेटायची. पण तिची आणखी ठरलेली खास दोन ठिकाण म्हणजे, गुडगाव (हरियाना) मध्ये राहाणारी मैत्रिण व लेखिका अरुंधती देवस्थळी व मित्र हिरा लोहिया यांचं दक्षिण दिल्लीतील घर. तिथं तिचा मुक्काम असायचा. ``अरूंधतीच्या बंगल्यावर गेलं, की मला खूप बरं व शांत वाटतं, आमच्या गप्पा संपतच नाहीत,’’ असं ती म्हणत असे. तर हिरा लोहिया हा तिचा `भ्रमंती मित्र’. त्याच्या व त्याच्या चमूरोबर तीनं उत्तर भारत व हिमालयातील अनेक स्थळांची भ्रमंती केली. हिरा म्हणायचा, ``जगातील सर्वात सुंदर व हिरवागार देश म्हणजे कोस्टारिका. मी आता तिथंच जाऊन स्थाईक होणार.’’ सुनीतीला सांगायचा ``तुला नक्की तिथं यावं लागेल.’’ सुनीती म्हणायची, ``नशिबात असलं, तर नक्की येईन, हिरा.’’
एक दीड महिन्यापूर्वी सुनीतीनं यारी रोड मार्गावरील निवासस्थानी अशोक जैन स्मृतीनिमित्त मित्रांचं एक `गेट टू गेदर’ केलं होतं. त्यावेळी तिच्या घरी आलेल्या पत्रकार संजीव साबडे, प्रताप आसबे, प्रकाश अकोलकर आदी मित्रांशी माझ्या मनसोक्त गप्पा झाल्या, त्यालाही कारण सुनीती. प्रसिद्ध पत्रकार कुमार केतकर यांच्याही अशोक व सुनीतीच्या आठवणी ताज्या आहेत. अशोक व सुनीतीचे मित्र पुण्याचे रोहन प्रकाशनाचे मालक प्रदीप चंपानेरकर यांचे मुंबईस येणेजाणे व पुस्तकांबाबत चर्चा करणे गेले अनेक वर्ष चालू होते.
तसेच, गोवास्थित कवियत्री व अनुवादक शीला जयवंत यांचाही परिचय सुनीतीमुळे झाला. मी काही वर्षापूर्वी लिहिलेले पुण्याच्या रोहन प्रकाशनने प्रसिद्ध केलेले व महाराष्ट्र सरकारचा `यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार’ मिळालेले माझे ``साउथ ब्लॉक, दिल्ली शिष्टाईचे अंतरंग’’ हे पुस्तक मी अशोक व सुनीती यांना अर्पण केले आहे.
सुनीती जैन आता आपल्यात नसणार, याची बोच कायम लागत राहाणार. तिला मनापासून दिलेली ही माझी शब्दांजली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.