देश

June Temperature : यंदाचा जून अंगाची लाहीलाही करणाराच!आतापर्यंतचा सर्वाधिक उष्ण; सलग १२ व्या महिन्यात तापमान वाढ कायम

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : यंदा जून महिन्यात भारताने उष्णतेच्या तीव्र लाटा अनुभवल्या. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात तापमानाच्या नोंदी ठेवण्यास सुरुवात झाल्यापासून यंदाचा जून आतापर्यंतचा सर्वांत उष्ण महिना ठरला. युरोपियन युनियन (ईयू)ची हवामान संस्था असलेल्या कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसेस या संस्थेने यावर शिक्कामोर्तब केले आहे. सलग १२ व्या महिन्यात तापमान पूर्व औद्योगिक काळातील सरासरीपेक्षा दीड अंश सेल्सिअने अधिक नोंदविले गेले. इ.स. १८५० ते १९०० हा काळ पूर्व औद्योगिक म्हणून ओळखला जातो.

जूनमध्ये भारतासह अनेक देशांनी उष्णतेच्या तीव्र लाटा तसेच पूर, वादळेही अनुभवली. एकूण जागतिक लोकसंख्येपैकी ६० टक्के लोकांना अतिउष्णतेचा सामना करावा लागला. संशोधकांच्या मते, गेल्या वर्षी जुलैपासूनचा प्रत्येक महिना उष्ण होता. यंदाचा नुकताच संपलेला जून आतापर्यंतचा सर्वांत उष्ण ठरला. या महिन्यात जागतिक सरासरी तापमान १६.६६ अंश असते. मात्र, यंदाच्या जूनमध्ये १९९१ ते २०२० या काळातील सरासरी तापमानापेक्षा ०.६७ अंश अधिक तापमान नोंदविले गेले. त्याचप्रमाणे, जून २०२३ चा तापमानाचा विक्रम मोडीत काढत यंदाच्या जूनने ०.१४ अंश सेल्सिअस अधिक तापमान नोंदविले. २०२३-२४ मध्ये सक्रिय असलेला एल निनो आणि मानवी हस्तक्षेपामुळे झालेला हवामान बदल या दोन्ही कारणांमुळे यावर्षीचा जून सर्वाधिक उष्ण ठरला.

वायव्य भारतासाठीही यंदाचा जून १९०१ पासूनचा सर्वाधिक तापमानाचा होता. यंदाच्या उन्हाळ्यात देशात उष्माघाताची ४० हजार प्रकरणे नोंदविली गेली तर १०० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला. संयुक्त राष्ट्रांच्या २०१५ मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या हवामान परिषदेत जागतिक तापमानवाढ दीड अंश सेल्सिअसच्या मर्यादेत ठेवण्याबद्दल जगभरातील प्रमुख नेत्यांनी वचनबद्धता दर्शविली होती. हरितगृह वायूच्या उत्सर्जनामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान पूर्व औद्योगिक काळाच्या तुलनेत आधीपासूनच १.२ अंश सेल्सिअसने वाढत असून जगभरात दुष्काळ, पूर, अतिवृष्टी आदी घटनांना ते कारणीभूत ठरत आहे.

प्रमुख निरीक्षणे

  • जुलै २०२३ ते जून २०२४ या १२ महिन्यांच्या काळात जागतिक सरासरी तापमान सर्वाधिक

  • १९९१ ते २०२० च्या सरासरीपेक्षा ते ०.७६ अंश सेल्सिअसने अधिक

  • इ.स.१८५० ते १९०० मधील पूर्व औद्योगिक सरासरीपेक्षा १.६४ अंश सेल्सिअसने जास्त

  • यंदा जूनमधील समुद्राच्या तापमानाचीही विक्रमी नोंद

किती जणांवर परिणाम?

(आकडे कोटींत)

  • भारत : ६१.९

  • चीन : ५७.९

  • इंडोनेशिया : २३.१

  • नायजेरिया : २०.६

  • ब्राझील : १७.६

  • बांगलादेश : १७.१

यंदाचा जून सर्वाधिक उष्ण ठरण्याकडे सांख्यिकीय विषमतेपलीकडे जात पाहायला हवे. यातून हवामानात मोठ्या प्रमाणावर व सातत्याने होणारा बदल अधोरेखित होतो. टोकाच्या हवामानाचा सिलसिला कुठेतरी थांबला तरी वाढत्या तापमानामुळे नवीन विक्रम मोडले जातील. आपण जोपर्यंत वातावरणात व समुद्रात हरितगृह वायू सोडण्याचे थांबवीत नाही, तोपर्यंत हे अटळ आहे.

- कार्लो बुओन्टेम्पो, संचालक, कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसेस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT