Guinness Book Of Records : त्याकाळी हे एक बेस्ट सेलर पुस्तक ठरले होते. हळूहळू दरवर्षी त्यांचे एकेक पुस्तक येऊ लागले आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड हा एक ब्रँड बनून गेला.गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या विषयी माहिती नाही अशी एकही व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. पण जगभरातील अनोख्या, वेगळ्या, भन्नाट आणि हटके नोंदीसाठी प्रसिद्ध असलेल हे पुस्तक कसं तयार झालं असेल ओ? असा प्रश्न कधी पडलाय का तुम्हाला?
तर कुठलीही जगावेगळी गोष्ट, एखादा विक्रम नोंदवायचे झाले तर आपल्या डोळ्यासमोर पहिले नाव येते ते गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे. या जगप्रसिद्ध पुस्तकात कुठल्या प्रकारच्या माहितीची नोंद केली जाते हे तर आपल्याला माहितीच आहे.अशाप्रकारे जगभरातील नोंदी गोळा करून त्या प्रकाशित करण्याची भन्नाट कल्पना पहिल्यांदा सुचली ती सर ह्युग बीवर यांना. ही कल्पना त्यांना कशी सुचली यामागेही एक गोष्ट आहे.
एकदा सर ह्युग एका निशाणेबाजीच्या पार्टीत गले होते. तिथे एका मित्राशी बोलता बोलता युरोपमधील सर्वात वेगाने उडणारा पक्षी कोणता असा प्रश्न समोर आला. दोघांनाही त्यावेळी तरी या प्रश्नाचे उत्तर माहिती नव्हते. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी दोघांनीही बरीच पुस्तके धुंडाळली. पण त्यांना काही या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. तेव्हा दोघांच्याही असे लक्षात आले की, फक्त याच प्रश्नाचे उत्तर नाही तर अशा प्रकारची कितीतरी तथ्ये सांगणारे आणि त्याबद्दल माहिती देणाऱ्या पुस्तकांची संख्या खूप कमी आहे.
मग त्या दोघांनी ठरवले की, अशा प्रकारे तथ्ये आणि माहिती देणारे पुस्तक आपणच का काढू नये? ह्युगने आपला हा विचार नोर्रीस आणि रॉस यांच्यासमोर मांडला. त्या दोघांनाही ही कल्पना खूप आवडली. मग ह्युग, नोर्रीस आणि रॉस तिघांनी मिळून असे पुस्तक लिहिण्याचे काम सुरु केले. यासाठी आवश्यक होते ते अशा तथ्यांचे संशोधन करणे, त्यांचे एकत्रीकरण करणे आणि त्यांचा अभ्यास करणे. यासाठी त्यांनी अनेक दिवस प्रचंड मेहनत घेतली. सगळी माहिती जमवल्यानंतर आणि एकही दिवस विश्रांती न घेता कित्येक आठवडे सलग काम केल्यानंतर त्यांचे तथ्यांबाद्द्ल माहिती देणारे पुस्तक तयार झाले.
आता प्रश्न होता पुस्तक खपवण्याचा. हे पुस्तक नेमके खपवायचे कुठे? सुरुवातीला त्यांनी पबमध्ये हे पुस्तक विक्रीसाठी ठेवण्याचा विचार केला. परंतु त्यांना पुस्तक विकण्यासाठी फारशी मेहनत करावीच लागली नाही. पुस्तक बाजारात आल्या आल्या लोकांच्या अक्षरश: त्यावर उड्या पडल्या. या पुस्तकाची पहिलीच आवृत्ती प्रचंड लोकप्रिय ठरली, विक्रमी संख्येने या पुस्तकाची विक्री झाली.
कारण, अशाप्रकारची माहिती देणारे एकही पुस्तक तत्पूर्वी बाजारात आले नव्हते. कुणीही अशा प्रकारचे पुस्तक लिहिण्याची कल्पना देखील केली नव्हती. हे पुस्तक जेव्हा लोकाच्या हातात पडले तेव्हा त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता.त्याकाळी हे एक बेस्ट सेलर पुस्तक ठरले होते. हळूहळू दरवर्षी त्यांचे एकेक पुस्तक येऊ लागले आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड हा एक ब्रँड बनून गेला.
सुरुवातीच्या काळात जगभरातील असे रेकॉर्ड्स जमा करणे वाटते तितके सोपे काम नव्हते. कारण यात कुठल्या एका विशिष्ट प्रदेशाची, देशाची खंडाची माहिती असते असे नाही. यात सगळ्या जगातील माहितीचा खजिना दडलेला असतो. जगभरातील अशी माहिती गोळा करत फिरण्याचे काम खूपच कठीण होते. यासाठी या पुस्तकाच्या मालकांनी देशविदेशातील आपला संपर्क वाढवण्यास सुरुवात केली.
आपल्या या संपर्काच्या माध्यमातून त्यांनी त्या त्या देशातील अशी तथ्यावर आधारित असलेली माहिती जमा केली. हे सगळे काम खूपच किचकट आणि वेळ खाऊ होते पण, तिघांनीही प्रयत्न सोडले नाहीत.या पुस्तकाच्या पहिल्या प्रतीसाठी त्याकाळी सुमारे पस्तीस हजार डॉलर इतका खर्च आला. तेव्हाच्या दृष्टीने ही रक्कम खूप मोठी होती.
जसजसा या पुस्तकाचा बोलबाला वाढू लागला तसतसे लोकं स्वतःहून पत्र लिहून या पुस्तकासाठी माहिती देऊ लागले. आपलेही नाव या रेकॉर्डमध्ये यावे म्हणून धडपडू लागले. काही कालावधी नंतर तर माहिती जमा करण्याचाही प्रश्न उरला नाही. कारण, या पुस्तकासाठी लोकं स्वतःहून माहिती देऊ लागले आणि ती घेण्यासाठी या पुस्तकांच्या मालकांना आमंत्रणही मिळू लागले. माहिती स्वतःहून चालत त्यांच्याकडे येऊ लागली. त्यांना यासाठी कुठेही जाण्याची गरज भासली नाही.
गेली कित्येक वर्षे सातत्याने हे पुस्तक प्रकाशित होत आहे. ज्यामध्ये जगभरातील विशिष्ट विक्रमांची नोंद केलेली असते. आजही या पुस्तकाची लोकप्रियता कमी झालेली नाही. अमेरिकेतील लोक तर या पुस्तकाचे खूपच मोठे चाहते आहेत.
अमेरिकेतील सार्वजनिक ग्रंथालयातून सर्वाधिक चोरीला जाणारे पुस्तक कोणते असेल तर ते गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स. सर्वात जास्त चोरीला जाणारे पुस्तक म्हणून गिनीज बुकचीच गिनीज बुकमध्ये नोंद करण्यास हरकत नसावी. लोकांना हे पुस्तक इतके आवडते की ते ग्रंथालयातून चोरून घेऊन जातात. गिनीज बुकची लोकप्रियता दर्शवणारी यापेक्षा आणखी वेगळे उदाहरण देण्याची गरजच नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.