सिमला : हिमाचल प्रदेशमध्ये सहा ठिकाणी ढगफुटीने आलेल्या जलप्रलयात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप ४८ जण बेपत्ता आहेत. सिमला जिल्ह्यात रामपूरमधील समघमध्ये ‘एनडीआरएफ’ आणि ‘एसडीआरएफ’ने आज सकाळी बचाव मोहीम पुन्हा सुरू केली. समघमधील ३६, बागीपूलमधील पाच आणि मंडीतील राजबनचे सात नागरिक बेपत्ता आहेत.
समघमधील पुरात ३० घरे वाहून गेली. येथे सहा मुलांसह ३६ जण बेपत्ता आहेत. यात चार प्रवासी, ग्रीनको समघ प्रकल्पातील सात कर्मचारी आणि २२ स्थानिकांचा समावेश आहे. पुरात १५० जनावरे वाहून गेली आहेत. एक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि विजेचे दोन प्रकल्प उद्ध्वस्त झाले. कुलूतील निरमंडमधील बागीपूलमध्ये पुरात दहा दुकाने, एक हॉटेल, १५ गाड्या, एक बसस्थानक आणि आठ पूल वाहून गेले आहेत. अन्य ठिकाणीही अशा प्रकारे नुकसान झाले आहे.
मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सुक्खू हे नुकसानाची पाहणी करण्यासाठी बुशहरला जाणार होते. पण खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर उडू शकले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना सचिवालयात परतावे लागले. रामपूरचे उपविभागीय दंडाधिकारी निशांत तोमर घटनास्थळी बचावकार्यावर देखरेख करीत आहेत. कुलूमधील पावसामुळे येथील न्यू कुंदन या प्राथमिक शाळेचे स्थलांतर करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी तोरुल एस. रवीश यांनी सांगितले. कुलू जिल्हा विभागात पावसामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना मदतनिधी देण्यात आला आहे. एक लाख २५ हजार रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम वेगाने सुरू आहे. कुलूतील पार्वती खोऱ्यात ढगफुटीमुळे मलाणा जलविद्युत प्रकल्पात अडकलेल्या चारजणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे.‘एनडीआरएफ’ बरोबर गृहरक्षक दल आणि खासगी बचाव दलाने या चौघांना बाहेर काढले. त्यांच्या बचावासाठी ‘एनडीआरएफ’चे पथक काल रवाना झाले होते. पण घटनास्थळी पोहचू शकले नव्हते. सतलज नदीत वाहत येणाऱ्या मृतदेहांच्या शोधासाठी सुन्नी-तत्तापानी येथे कालपासून शोध सुरू आहे. हिमाचलमधील बाधित गावांमध्ये मदत व शोध कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. राज्याचे गृहमंत्री जगतसिंह नेगी घटनास्थळी उपस्थित आहेत. ढगफुटीमुळे रस्ते, पूल आणि जल प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले आहे. मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह शोधण्यासाठी व बाधितांना मदत करण्यासाठी ‘एनडीआरएफ’, ‘एसडीआरएफ’, लष्कर आणि पोलिस अहोरात्र झटत आहेत, असे मुख्यमंत्री सुक्खू यांनी सांगितले.
पंतप्रधानांचे मदतीचे आश्वासन
‘‘डोंगराळ भागातील लोकांचे आयुष्य खूप कठीण असते. दरवर्षी असे संकट येते आणि हिमाचलवासीयांची जीवित आणि वित्तहानी होत असते. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला असून साहाय्य निधीतून जास्तीत जास्त मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. वेगवेगळ्या मंत्र्यांना भेटून मी आवश्यक मदतीची विनंती करेन. माझे काम संपल्यानंतर मी हिमाचलमधील संकटग्रस्त लोकांना भेटणार आहे,’’ असे मंडी येथील खासदार कंगना राणावत म्हणाल्या.
पावसामुळे वाहतूक विस्कळीत
कुलू-मनाली राष्ट्रीय
महामार्ग बंद
भरमोर-पठाणकोट राष्ट्रीय महामार्गही ठप्प
मंडी-चंडीगड राष्ट्रीय महामार्ग दहा तास बंद
विभागातील ४५५ रस्ते बंद
४९५ बस मार्ग, ९८३ पेयजल योजना, १७८ ट्रान्सफॉर्मर बंद
वेगवगळ्या विभागांचे २१५ कोटी रुपयांचे नुकसान
ठिकठिकाणी कोंडी
राजस्थानात पाऊस
जयपूर : राजस्थानमध्ये गेल्या २४ तासांत अती ते अति मुसळधार पाऊस पडला. बिकानेर जिल्ह्यातील खजुवाला येथे १९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अनेक भागात पाणी साचले होतो. रस्तेही पाण्याखाली गेले. टोंक जिल्ह्यातील बोरखंडी कलान या स्थानिक धरणाचा काही भाग पडला
भाविकांच्या सुटकेसाठी हवाई दलाची मदत
रुद्रप्रयाग : पावसामुळे केदारनाथ मार्गावर अडकलेल्या ५०० भाविकांच्या बचावासाठी भारतीय हवाई दलाचे ‘चिनूक’ आणि ‘एमआय१७’ हेलिकॉप्टरचा वापर शुक्रवारी करण्यात आला. पहिल्या फेरीत दहा जणांना बाहेर काढण्यात आले. लिंचोलीजवळ जंगलचट्टी येथे बुधवारी(ता.३१) रात्री ढगफुटीमुळे या मार्गाचे मोठे नुकसान झाले. आज ‘एमआय१७’ हेलिकॉप्टरने भाविकांना तेथून बाहेर काढून गौचर विमानतळावर आणण्यात आले. दुथडी भरून वाहणाऱ्या मंदाकिनी नदीत रस्त्याचा २०-२५ मीटरचा भाग वाहून गेल्याने गौरीकुंड-केदारनाथ मार्गावरील भीमबली येथे भाविक अडकले आहेत. घोरापारव, लिंचोली, बडी लिंचोली आणि भीमबली येथे दरडी कोसळल्याने केदारनाथ मंदिराकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. सर्व भाविक सुखरूप असून त्यांना अन्नाची पाच हजार पाकिटे पुरविण्यात आली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.