third term modi oath ceremony 72 leaders took oath cabinet union minister swearing bjp Sakal
देश

Oath Ceremony Updates: जंबो मंत्रिमंडळाचा शपथविधी; नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान; एकूण ७२ जणांचा केंद्रात समावेश

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत इतिहास घडविला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा या पदाची शपथ घेणारे ते दुसरे आणि काँग्रेसेतर पहिलेच नेते ठरले आहेत.

मोदींशिवाय राजनाथसिंह, अमित शहा, नितीन गडकरी यांच्यासह एकूण ७१ जणांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनाच्या आवारात झालेल्या या भव्य समारोहाला नऊ देशांचे प्रमुख, विविध देशांचे राजनैतिक अधिकारी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह विविध पक्षांचे नेते, उद्योगपती, चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित होते.

देशात १८ व्या लोकसभेसाठी १९ एप्रिल ते एक जून या कालावधीत सात टप्प्यांमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने २९३ जागांवर विजय मिळवत बहुमत प्राप्त केले. आधीच्या दोन निवडणुकांप्रमाणे भाजपला एकहाती बहुमत मिळाले नसले तरी २४० जागा जिंकत हा पक्ष सर्वांत मोठा पक्ष ठरला.

मित्रपक्षांच्या साह्याने भाजपने बहुमताचा दावा करत आज सरकार स्थापन केले. आज एकूण ३१ नेत्यांना कॅबिनेट मंत्रिपद, पाच जणांना स्वतंत्र कार्यभार आणि ३६ नेत्यांना राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे. हे सरकार स्थिर राहण्यासाठी भाजपला सहकारी पक्षांची नितांत गरज असल्याने मंत्रिमंडळात सर्वांनाच स्थान देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. राज्यसभेतील काही जणांनाही मंत्रिपद देण्यात आले आहे. खातेवाटप लवकरच जाहीर होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

राजनाथसिंह, अमित शहा, नितीन गडकरी, एस. जयशंकर, निर्मला सीतारामन या भाजपच्या प्रमुख नेत्यांसह भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनाही यावेळी मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्यात आले आहे. तसेच, मनोहरलाल खट्टर, शिवराजसिंह चौहान, सर्वानंद सोनोवाल, एच. डी. कुमारस्वामी यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.

भाजपशिवाय, संयुक्त जनता दल, तेलुगू देसम पार्टी, शिवसेना, जनसेना पक्ष, धर्मनिरपेक्ष जनता दल, अपना दल, हिंदुस्तान अवामी मोर्चा, रिपब्लिकन पार्टी (आठवले गट), राष्ट्रीय लोकदल, लोकजनशक्ती पक्ष (रामविलास) या पक्षांनाही केंद्रीय मंत्रिमंडळात आवर्जून स्थान देण्यात आले आहे.

‘एनडीए’मध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला कॅबिनेट पद हवे असल्याने विस्तारापर्यंत थांबण्याची तयारी या पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी दाखविली आहे. या समारोहाला ‘इंडिया’ आघाडीतर्फे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते. तृणमूल काँग्रेसने उपस्थित राहणार नसल्याचे कळविले होते.

सात माजी मुख्यमंत्री

नव्या मंत्रिमंडळात सात माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. यामध्ये स्वत: नरेंद्र मोदी (गुजरात), शिवराजसिंह चौहान (मध्य प्रदेश), राजनाथसिंह(उत्तर प्रदेश), मनोहरलाल खट्टर (हरियाना), सर्वानंद सोनोवाल (आसाम), एच. डी. कुमारस्वामी (कर्नाटक) आणि जीतनराम मांझी (बिहार) यांचा समावेश आहे.

दिग्गजांची उपस्थिती

नरेंद्र मोदी सरकारच्या शपथविधी कार्यक्रमाला उद्योगपती मुकेश अंबानी, त्यांचे पुत्र अनंत अंबानी, अभिनेते रजनीकांत, शाहरुख खान, अक्षय कुमार, अनिल कपूर, अनुपम खेर, रविना टंडन, दिग्दर्शक राजकुमार हिरानी हे उपस्थित होते.

महाराष्ट्रातील सहा जणांना संधी

केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा नेत्यांना संधी मिळाली आहे. यामध्ये नितीन गडकरी, पियुष गोएल या दोन्ही भाजप नेत्यांना पूर्वीप्रमाणेच कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. तर, रामदास आठवले (रिपब्लिकन पार्टी- आठवले गट), प्रतापराव जाधव (शिवसेना), रक्षा खडसे (भाजप) आणि यंदा प्रथमच निवडून आलेले पुण्यातील भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ यांना राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील कोणी घेतली कोणत्या क्रमाकांवर शपथ?

मोदींच्या नव्या सरकारमध्ये 31 कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. कॅबिनेट मंत्र्यांमध्ये महाराष्ट्रातील नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांचा समावेश आहे. शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये गडकरी यांचा क्रमांक चौथा तर गोयल यांचा क्रमांक अकरावा होता.

दरम्यान स्वतंत्र कार्यभार असलेल्या सहा राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली यामध्ये शिंदे गटाच्या प्रताप जाधव यांनी चौथ्या क्रमांकवार शपथ घेतली.

पंतप्रधान मोदींच्या मंत्रीमंडळात तब्बल 36 राज्यमंत्री असणार आहेत. यात महाराष्ट्रातील 3 राज्यमंत्री आहेत. यावेळी आरपीआयच्या आठवले यांनी पाचव्य, भाजपच्या रक्षा खडसे यांनी 26 व्या आणि मुरलीधर मोहोळ यांनी 34 व्या क्रमांकावर शपथ घेतली.

नवे केंद्रीय मंत्रिमंडळ

१) नरेंद्र मोदी - पंतप्रधान

कॅबिनेट मंत्री

२) राजनाथसिंह

३) अमित शहा

४) नितीन गडकरी

५) जे. पी. नड्डा

६) शिवराजसिंह चौहान

७) निर्मला सीतारामन

८) एस. जयशंकर

९) मनोहर लाल खट्टर

१०) एच. डी. कुमारस्वामी

११) पियुष गोयल

१२) धर्मेंद्र प्रधान (हम)

१३) जीतनराम मांझी

१४) राजीवरंजन सिंह (लल्लन सिंह) (जेडीयू)

१५) सर्वानंद सोनोवाल

१६) डॉ. वीरेंद्र कुमार

१७) किंजरापू राममोहन नायडू

१८ ) प्रल्हाद जोशी

१९) ज्योएल ओरांग

२०) गिरीराज सिंह

२१) अश्विनी वैष्णव

२२) ज्योतिरादित्य शिंदे

२३) भूपेंद्र यादव

२४) गजेंद्रसिंह शेखावत

२५) अन्नपूर्णा देवी

२६) किरेन रिजीजू

२७) हरदीपसिंह पुरी

२८) डॉ. मनसुख मांडवीय

२९) जी. किशन रेड्डी

३०) चिराग पासवान

३१) सी. आर. पाटील

राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार)

३२) राव इंद्रजितसिंह

३३) डॉ. जितेंद्र सिंह

३४) अर्जुन राम मेघवाल

३५) प्रतापराव जाधव

३६) जयंत चौधरी

राज्यमंत्री

३७) जितीन प्रसाद

३८) श्रीपाद येसू नाईक

३९) पंकज चौधरी

४०) कृष्णपाल गुर्जर

४१) रामदास आठवले

४२) रामनाथ ठाकूर

४३) नित्यानंद राय

४४) अनुप्रिया पटेल

४५) व्ही. सोमण्णा

४६) डॉ. पेमासानी चंद्रशेखर

४७) एस. पी. सिंह बघेल

४८) शोभा करंदलजे

४९) कीर्तीवर्धन सिंह

५०) बी. एल. वर्मा

५१) शांतनू ठाकूर

५२) सुरेश गोपी

५३) डॉ. एल. मुरुगन

५४) अजय टमटा

५५) बंडी संजयकुमार

५६) कमलेश पासवान

५७) भागीरथ चौधरी

५८) सतीशचंद्र दुबे

५९) संजय सेठ

६०) रवनीत सिंह बिट्टू

६१) दुर्गादास उईके

६२) रक्षा खडसे

६३) सुकांत मुजुमदार

६४) सावित्री ठाकूर

६५) तोखन साहू

६६) राजभूषण चौधरी

६७) भूपतीराजू श्रीनिवास वर्मा

६८) हर्ष मल्होत्रा

६९) निमूबेन बांभनिया

७०) मुरलीधर मोहोळ

७१) जॉर्ज कुरियन

७२) पवित्र मार्गारिटा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT