indian flag google
देश

Tiranga : भारताच्या ध्वजातील तीन रंगांचा अर्थ काय? अशोकचक्र काय दर्शवते?

रंगांना जातीय स्वरूप आल्याने शिखांनी आपला प्रतिनिधी म्हणून काळ्या रंगाचाही पट्टा असावा अशी जाहीर मागणी केली, ती मान्य मात्र झाली नाही.

नमिता धुरी

मुंबई : भारतात १८८५ साली राष्ट्रीय काँग्रेस स्थापन झाली असली, तरी तिने राष्ट्रीय निशाण १९२१ सालापर्यंत स्वीकारले नव्हते. मादाम कामा या राष्ट्रभक्त भारतीय महिलेने २२ ऑगस्ट १९०७ रोजी जर्मनीमध्ये स्टगार्ट येथे भरलेल्या समाजवाद्यांच्या जागतिक मेळाव्यात स्वकल्पनेने तयार केलेले एक तिरंगी निशाण भारताचा राष्ट्रध्वज म्हणून सादर केले.

या निशाणात हिरवा, केशरी व तांबडा असे तीन आडवे पट्टे होते. भारताचे राष्ट्रीय फूल समजल्या जाणाऱ्या कमळाची आठ चित्रे हिरव्या पट्ट्यात, वंदेमातरम् ही अक्षरे केशरी पट्ट्यात आणि हिंदुमुस्लिमांची प्रतीके म्हणून अनुक्रमे सूर्य व चंद्र यांची चित्रे तांबड्या पट्ट्यात, असा या ध्वजाचा एकूण साज होता. अशा प्रकारचा ध्वज खुद्द भारतात मात्र कधीच वापरला गेला नाही.

१९१६ साली होमरूल चळवळीचे भूखंड म्हणून ॲनी बेझंट, लो. टिळक आदींना अटकेत ठेवले असताना त्यांनी पाच तांबडे व चार हिरवे पट्टे असलेला वरच्या डाव्या कोपऱ्यात युनियन जॅक, त्याखाली सात तारे व उजवीकडे चांद अशी चिन्हे धारण करणारा राष्ट्रध्वज तयार करून फडकविला. सरकारी अधिकाऱ्यांनी अर्थातच तो फोडून टाकला.

१९१७ सालच्या कलकत्ता काँग्रेसमध्ये अधिकृत राष्ट्रध्वज ठरविण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. त्यानंतर १९२० पर्यंत काँग्रेसच्या अधिवेशनात ध्वजाबद्दल चर्चा होऊनही निश्चित निर्णय झाला नाही. त्यानंतर गांधीजींच्या पुढाकाराने या प्रश्नाला निश्चित चालना मिळाली. यंग इंडिया, हरिजन या नियतकालिकांतून त्यांनी वेळोवेळी लेख लिहून राष्ट्रध्वजाबाबत मतप्रदर्शन केले.

राष्ट्रध्वजातील रंगांचा अर्थ काय ?

मच्छलीपटनम् शहरातील एक प्राध्यापक पी. व्यंकय्या यांनी गांधीजींच्या सूचनेप्रमाणे ध्वज तयार केला. जलंदरचे लाला हंसराज यांनी सदर ध्वजावर चरखा असावा, अशी केलेली सूचना गांधीजींना व इतरांना अर्थपूर्ण वाटली. हा तिरंगी ध्वज खादीचा असून त्यात तांबडा, हिरवा, पांढरा या रंगांचे आडवे पट्टे व त्यांवर गर्द निळ्या रंगाचा चरखा होता.

सर्व धर्मीयांच्या एकतेचे प्रतीक असा हा झेंडा असा त्याचा अर्थ लावण्यात आला. हिंदूंचा तांबडा, मुसलमानांचा हिरवा आणि इतरांचा पांढरा अशी रंगांची वाटणी होती. रंगांना जातीय स्वरूप आल्याने शिखांनी आपला प्रतिनिधी म्हणून काळ्या रंगाचाही पट्टा असावा अशी जाहीर मागणी केली, ती मान्य मात्र झाली नाही.

१९२१ पासून हा तिरंगा स्वातंत्र्य चळवळीत राष्ट्रीय निशाण म्हणून पुढे आला. नागपूर व इतरत्र झालेले ध्वजसत्याग्रह खूप गाजले. १९३१ साली केशरी, पांढरा, हिरवा हे रंगपट्टे धर्माचे द्योतक नसून ते अनुक्रमे त्याग-धैर्य, सत्य-शांतता, प्रेम-विश्वास या गुणांची प्रतिके आहेत, असे जाहीर करण्यात आले.

अशोक चक्राचा अर्थ काय ?

भारताचा राष्ट्रध्वज संविधान समितीने २२ जुलै १९४७ रोजी निश्चित केला. त्या संबंधीचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. एकाला एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्ट्यांचा तो आहे. वरती गर्द केशरी, मध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला गर्द हिरवा, अशा क्रमाने हे तीन रंग आहेत.

मधल्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे धर्मचक्र असून ते सारनाथ येथे आढळलेल्या सिंहमुद्रेवर असलेल्या अशोक चक्रासारखे आहे. चक्राला २४ आरे आहेत. डॉ. एस्. राधाकृष्णन् यांनी भारतीय राष्ट्रध्वजाच्या एकूण रचनेचे महत्त्व चांगल्या प्रकारे विशद केले आहे. त्यांच्या विवेचनाप्रमाणे केशरी रंग किंवा भगवा रंग हा त्यागाचा द्योतक आहे, पांढरा रंग प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा प्रतिनिधी आहे, तर हिरवा रंग मानवाचे निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो.

धर्म आणि सत्य हे भारताच्या राष्ट्रध्वजाखाली काम करणाऱ्याचे शास्ते असावेत, जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्णतेने आगेकूच करावी असे धर्मचक्र दर्शविते. मूलतः हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माचे धर्मचक्र आहे. त्याला ‘अशोकचक्रʼ या नावाने ओळखले जाते. त्यात भारतीय कला, तत्त्वज्ञान, इतिहास व संस्कृती यांचा सुरेख संगम झालेला दिसतो. ‘धर्मचक्र प्रवर्तनायʼ हे घोषवाक्य भारतीय संसद सभापतीच्या स्थानाच्या शिरोभागी लिहिलेले आहे.

राष्ट्रध्वजांना द्यावायाचा मान, त्यांच्या वापराबद्दलचे नियम, राष्ट्रीय शोक-आनंद-स्वागतप्रसंगी तो कसा उभारतात आदींबद्दलचे संकेतही निश्चित केलेले असतात. त्यांनुसार राष्ट्रध्वजांचा उपयोग केला जातो. या बाबतीत भारतीय राष्ट्रध्वज संहिता या नावाची पुस्तिका भारत सरकारने प्रसिद्ध केलेली आहे.

राष्ट्रध्वजाशिवाय जगभर त्या त्या राष्ट्रातील निरनिराळे पक्ष, संघटना, राष्ट्रप्रमुख, सेनापती, लष्करी तुकड्या, नौदलातील आणि व्यापारी नौका व जहाजे, राजघराण्यांतील मान्यवर लोक, महानगरपालिका, महापौर, विद्यापीठे, स्काउट, गाईड इ. निरनिराळ्या संस्था, खेळ व क्रीडासंघटना आदींच्या स्वतंत्र पताका असतात. संदेश दळवळणासाठी छोटेमोठे बावटे वापरले जातात.

संयुक्त राष्ट्रांचा ध्वज आहे. ध्वजपट सौम्य निळ्या रंगाचा आहे. पटावर उत्तर ध्रुव हे केंद्र धरून जगाचा नकाशा हे चिन्ह रुपेरी रंगात दाखविले आहे. या नकाशाभोवती ऑलिव्ह वृक्षाच्या दोन फांद्या दाखविल्या आहेत. हा ध्वज सर्व देशांत संयुक्त राष्ट्रदिनी (२४ ऑक्टोबर) फडकवतात. संयुक्त राष्ट्रांच्या ज्या उपशाखा आहेत, त्यांचेही ध्वज किंवा मुद्रा आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

Cha.Sambhajinagar: इम्तियाज जलीलांवर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल; मतदानाच्या दिवशी झाला होता वाद

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

SCROLL FOR NEXT