Pune News : जागतिक स्तरावर युद्धाचे स्वरूप बदलत असताना देशातील संरक्षण क्षेत्राला आधुनिक, अद्ययावत आणि नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाने परिपूर्ण उपकरणांची आवश्यकता वाढत आहे. सीमावर्ती भागात सैन्याच्या रक्षणासाठी आणि रोबोटिक्सच्या माध्यमातून चेन्नई येथील तरुणांनी मानवरहित ‘ग्राउंड व्हेइकल’ची (UGV) निर्मिती केली आहे. संरक्षण क्षेत्रातील उपकरणाची निर्मिती करणारे ‘टोरस रोबोटिक्स’ (Torus Robotics) हे देशातील तरुणांनी सुरू केलेले पहिले स्टार्टअप आहे.
चेन्नईच्या एसआरएम इन्स्टिट्यूटमधून बी.टेकची पदवी पूर्ण करणारे विघ्नेश मनीमारण, अभी विघ्नेश आणि विभाकर सिंथलकुमार यांनी या स्टार्टअपच्या माध्यमातून पहिले यूजीव्ही संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेला (डीआरडीओ) सुपूर्त केले आहे. भारतीय संरक्षण सेवांसाठी कृत्रीम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित यूजीव्ही विकसित करण्यासाठी ‘एरो इंडिया २०२१’ एक्स्पोमध्ये या स्टार्टअपने भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडसोबत (बीईएमएल) सामंजस्य करार केला आहे.
याबाबत मनीमारण याने सांगितले, ‘‘बी. टेक मेकॅट्रॉनिक्सचे शिक्षण घेत असताना संरक्षण क्षेत्राच्या विद्यमान समस्या ओळखणे आणि रोबोटिक्सद्वारे त्यांचे निराकरण करण्यासाठी सांगण्यात आले होते. संरक्षण क्षेत्राची आवड असल्यामुळे आम्ही तिघांनी या संबंधित संशोधनाचे कार्य सुरू केले. अभ्यासक्रमाच्या सुरवातीच्या वर्षांत सूक्ष्म रोबोट आणि सौर ऊर्जेवर चालणारे वाहन विकसित केले, जे सर्व्हिलेन्ससाठी वापरण्याजोगी होते. २०१६ मध्ये जेव्हा पदवीचे प्रशिक्षण पूर्ण झाले, त्यावेळी मित्रांसोबत संरक्षण क्षेत्रासाठी आधुनिक वाहनाची निर्मिती करण्याचे ठरविले. सध्या मानवरहित एरिअल व्हेइकलबाबत (यूएव्ही) अनेकांनी ऐकले असेल, जे हवाई मार्गासाठी असून याचा वापर होत आहे. मात्र, मानवरहित ग्राउंड व्हेइकल (यूजीव्ही) हे भूभागावर चालणाऱ्या वाहनाची निर्मिती केली आहे. रोबोटिक्स तंत्रज्ञानावर आधारित एक यूजीसी प्रोटोटाईप डीआरडीओला दिले आहे.’’
या स्टार्टअपमध्ये सध्या दहा जणांची टीम कार्यरत आहे. टोरस रोबोटिक्स भारतीय संरक्षण आणि इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांसाठी मॉड्युलर मानवरहित ग्राउंड वाहने व स्वदेशी इलेक्ट्रिक मोटर्स निर्मित करत आहे, जे ५० टक्के हलके, १५ टक्के अधिक कार्यक्षम आणि १० टक्के अधिक किफायतशीर असेल, असे विभाकरने सांगितले.
‘यूजीव्ही’ची वैशिष्ट्य
सीमावर्ती भागात सैन्याला सर्व्हिलेन्सच्या कामात मदत
कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये कार्य करण्यास सक्षम
अत्यावश्यक परिस्थितीमध्ये औषधे पोचविण्यासाठी उपयुक्त
इलेक्ट्रिक-पावरवर चालणारे हे ग्राउंड व्हेईकल स्फोटक उपकरणे (आयईडी) शोधण्यासाठी आणि त्यांना नष्ट करण्यासाठी उपयुक्त
एक किलोमीटरपर्यंतच्या सुरक्षित अंतरावरून याला ऑपरेट करणे शक्य
या वाहनाला चालविण्यासाठी मनुष्याची गरज नाही
उंच - सखल भागांची पाहणी, शत्रूच्या ठिकाणांचा शोध घेणे आणि माहिती गोळा करणे
संरक्षण क्षेत्रात सध्या यूजीव्ही सिस्टिमसाठीची मागणी वाढली आहे. आयडेक्स, मेक इन इंडियासारख्या योजनांच्या माध्यमातून संरक्षण क्षेत्राकडूनही आता देशातील स्टार्टअप्सला प्रोत्साहन दिले जात आहे. येत्या पाच वर्षात यूजीव्हीच्या ५०० युनिट्सची निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे.
- विघ्नेश मनीमारण, सहसंस्थापक, टोरस रोबोटिक्स
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.