भारतीय स्वातंत्र्यवीरांचे तीर्थक्षेत्र समजले जाणारे व आयुष्यात एकदा तरी तिथे आपण माथा टेकून यावा अशी प्रत्येकाला ओढ लावणारी भूमी म्हणजे अंदमान निकोबार बेटे. हा बेटांचा समूह असला तरी त्यापैकी बहुतांश बेटांचा आता विकास झाला आहे. तेथील अनेक बेटांचे वर्णन 'Untouched Beauty' असेही केले जाते. अत्यंत स्वच्छ, शिस्तीची आणि नम्र-विनयशील माणसे राहत असलेली ही बेटे आहेत.
पोर्ट ब्लेअरचे विमानतळ स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने ओळखले जाते. अंदमानच्या भूमीला पदस्पर्श होण्यापूर्वीच सर्व स्वातंत्र्यवीरांना, क्रांतिकारकांना प्रत्येक भारतीयाकडून मनोमन प्रणाम केला जातो. आता भरपूर प्रमाणात विकसित असलेले हे बेट त्यावेळेस कसे असेल असा प्रश्नही पडतो. अन् मग स्वातंत्र्यपूर्व इतिहास आठवतो. ती वर्णने आठवतात आणि पाय न कळत 'सेल्युलर जेल'कडे वळतात. तिकीट काढून रांगेत आत जाताना, 'त्यावेळेस कैदी म्हणून या थोर महापुरुषांना कसे नेले असेल ते दृश्य डोळ्यापुढे उभे राहते. संध्याकाळचा तेथील शो पाहिल्यावर तर कल्पनेने सुद्धा अंगावर शहारे येतात. त्यावेळी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची किंमत कळते, आणि तेथून बाहेर पडताना आपण देशभक्तीने भारावून गेलेलो असतो.
अंदमानमधील वेगवेगळी बेटे पाहण्यासाठी खास गाड्यांची सोय आहे. दिवसभराच्या वेळापत्रकात जवळपासची बेटे त्यांच्या नियोजनाप्रमाणे दाखवतात. त्यामुळे पहाटे 3 वाजतासुद्धा निघावे लागते. नैसर्गिक सौंदर्याच्या जोडीला कधी ब्रिटिशांनी केलेल्या अमानुष छळाच्या गोष्टी त्या बेटाचा इतिहास म्हणून ऐकायला मिळतात. सागरतळातील खजिना तळाला जाऊन पाहायला मिळतो. मॅनग्रूव्हजची जंगले, जेट्टीतून प्रवास, क्वचित प्रसंगी जारवांचे (आदिवासी) दर्शन, वेगवेगळी संग्रहालये व बरेच काही. डोळ्यात व कॅमेऱ्यात किती साठवले तरी ते कमीच वाटते. जोडीला जेवणात माशांचे अनेक प्रकार. रस्त्यावरील शिस्तबद्ध वाहतूक. आपुलकीने बोलणारे व तत्परतेने सेवा देणारे तेथील रहिवासी आपल्याला नंतरही कित्येक दिवस आठवत राहतात.
स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर इतिहासाने या भूमीला, भारतीयांच्या कर्मभूमीला अमरत्व प्रदान केले. भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर बंगालच्या उपसागरातील ही बेटे सदैव वारे-वादळ, पर्जन्यवृष्टी, त्सुनामी, भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या विळख्यात सापडलेली दिसतात. मात्र पर्यटकांना बेटांचा हाच इतिहास व भूगोल आकर्षित करतो. अत्यंत स्वच्छ किनारे, हिरव्यागार वनराईने आच्छादलेली भूमी, सागरी विविधता असलेले सागरतळ, विविधजातीचे प्राणी-पक्षी घनदाट जंगले अन सर्वात जास्त आकर्षण ज्यांचे बद्धल वाटते ते जारवा-तेथील आदिवासी जमात.
भारतातील व भारताबाहेरील अनेक पर्यटक अंदमानला जाऊन या सर्व गोष्टींचा आनंद घेत असतात. (निकोबार बेट समूहांवरती जाण्यासाठी केंद्र शासनाची खास परवानगी लागते.)
मात्र अचानक काही नैसर्गिक आपत्ती उद्भवली तर फार भयानक अवस्था होते. आल्हाददायक, मन प्रफुल्लित करणारा निसर्ग अचानक वेगळ्याच रूपात बदलतो. वेगवेगळ्या बेटांवर जाताना बोटीतून, जेट्टीवरून तळ दिसणारे नितळ पाणी, झालरीसारखे समोरील बेटांवरील वृक्ष-तरू एकदम बदलूनच जातात. सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस अन् उसळणाऱ्या लाटा, क्षणात सारा रंगमंचच बदलतो. नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद घेत उंच झोक्यावर झुलणारे आपण, अचानक जीवन मरणाच्या दारात येतो. अलीकडील काळात, तीन वर्षांपूर्वी मानवी चुकीमुळे, क्षमतेपेक्षा जास्त माणसे घेतल्याने, परतीच्या प्रवासादरम्यान जहाज बुडाल्याचे ताजे उदाहरण आहे. यावर उपाययोजना करणे शक्य आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून कायद्याची अंमलबजावणी पण करता येईल.
नैसर्गिक आपत्ती मात्र (हवामानाचा अंदाज चुकला तर) सांगून येत नाहीत. त्यामुळे असे प्रसंग आले तर प्रसंगानुरूप पर्यटकांची सुटका करण्याचे व्यवस्थापन अद्ययावत स्वरूपात असणे अत्यंत गरजेचे आहे. लोकांच्या जिवाशी खेळ होता कामा नये. त्यासाठी स्थानिक प्रशासन जागरूक असणे गरजेचे आहे. सागरी वादळामुळे परतीचे मार्गच बंद होतात. अशा वेळेस सुटकेचे मार्ग काय काय असू शकतील? हवाई मार्गे सुटका करता येईल का? प्रत्येक बेटावर आपत्कालीन सुटकेसाठी कायमस्वरुपी सोय करणे पर्यटकांच्या जीवनाच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.