आत्ताच्या घडीला संपुर्ण देश उत्तरकाशीच्या सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांची बोगद्यातून बाहेर येण्याची प्रतीक्षा करत आहेत. खोदकाम पूर्ण झाल्यानंतर बोगद्यात अडकलेले कामगार आज कोणत्याही क्षणी बाहेर येऊ शकतात. गुरुवारी रात्री ऑगर ड्रिलिंग मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बचावकार्य पुन्हा एकदा ठप्प झाले होते. ज्या प्लॅटफॉर्मवर उपकरणे बसवण्यात आली होती तेथे काही क्रॅक दिसू लागले आहेत.(Latest Marathi News)
उत्तराखंडच्या उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांचे बचावकार्य आता शेवटच्या टप्प्यात आहे. बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना वाचवण्यासाठी बचाव पथक अगदी जवळ आले आहे. आज शुक्रवारी बचाव कार्याचा 13 वा दिवस आहे.
आता कामगार आणि बचाव पथक यांच्यात काही मीटरचं अंतर राहिलं आहे. याआधी गुरुवारी अशी वेळ आली की काही तासांत हे बचावकार्य पूर्ण होईल, अशी शक्यता होती. मात्र, काही तांत्रिक कारणास्तव खोदकाम थांबवावे लागले. शुक्रवारी पुन्हा एकदा बचावकार्य पुढे नेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या 12 दिवसात काय घडलं जाणून घ्या...
उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे चार धाम प्रकल्पांतर्गत बांधण्यात येत असलेल्या सिल्क्यारा बोगद्याला १२ नोव्हेंबर रोजी भूस्खलनानंतर मोठा अपघात झाला होता. बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यावर मोठा मलबा पडला, त्यामुळे आत काम करणारे ४१ मजूर अडकले होते. तेव्हापासून बचावकार्य सातत्याने सुरू आहे. आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ञ अरनॉल्ड डिक्स म्हणाले, ड्रिलिंग मशीन तीन वेळा खराब झाले आहे. ते शुक्रवारपर्यंत ठीक होईल.
१२ नोव्हेंबर : दिवाळीच्या दिवशी पहाटे 5.30 च्या सुमारास ब्रह्मखल-यमुनोत्री महामार्गावरील सिल्क्यारा-दांदलगाव बोगद्याचा काही भाग कोसळल्याने ४१ कामगार अडकले.घटनेची माहिती मिळताच तातडीने जिल्हा प्रशासनाने बचावकार्य सुरू केले. अडकलेल्या मजुरांना पाईपद्वारे ऑक्सिजन, वीज आणि अन्न पुरवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. एनडीआरएफ, एसडीआरएफ, बीआरओ, प्रकल्पाशी संबंधित एजन्सी एनएचआयडीसीएल आणि आयटीबीपी यासह अनेक एजन्सी बचाव कार्यात सामील झाल्या. पण एकही कृती आराखडा कामी आला नाही.
१३ नोव्हेंबर : ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या पाईपद्वारे कामगारांशी संपर्क साधण्यात आला. ते सर्वजण सुखरूप असल्याची माहिती घेण्यात आली. मुख्यमंत्री पुष्कर धामीही घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, वरून बोगद्यावर ढिगारा पडत राहिला, त्यामुळे सुमारे ३० मीटर परिसरात मलबा साठून ६० मीटरपर्यंत पसरला, त्यामुळे बचावकार्य आणखी कठीण झाले.
१४ नोव्हेंबर : 800 आणि 900 MM स्टील पाईप आणण्यात आले. ऑगर मशिनच्या साहाय्याने व्हर्टिकल ड्रिलिंग सुरू करण्यात आले. मात्र, अचानक ढिगारा खाली पडल्याने दोन कामगार किरकोळ जखमी झाले. अडकलेल्या मजुरांना अन्न, पाणी, ऑक्सिजन, वीज आणि औषधांचा पुरवठा सुरूच होता. त्यापैकी काहींनी डोकेदुखी, पोटदुखी यासारख्या तक्रारी जाणवत होत्या.
१५ नोव्हेंबर: खोदकाम करण्यासाठी पहिले ड्रिलिंग मशीन यशस्वी झाले नाही. NHIDCL ने अत्याधुनिक ऑगर मशिनची (अमेरिकन मेड ऑगर ड्रिलिंग मशीन) मागणी केली. ते दिल्लीहून विमानाने आणण्यात आले.
१६ नोव्हेंबर : ड्रिलिंग मशीन एकत्र करून प्लॅटफॉर्मवर बसवण्यात आली. मध्यरात्रीनंतर या मशिनने काम सुरू झाले
१७ नोव्हेंबर: मशीनने रात्रभर काम सुरू होते. दुपारपर्यंत, 57 मीटर लांबीचा ढिगारा कापून सुमारे 24 मीटर खोदकाम पूर्ण झाले. चार एमएस पाईप टाकण्यात आले. पाचवा पाईप टाकत असताना एक दगड आला. अडथळा निर्माण झाल्याने खोदकामाची प्रक्रिया थांबली. आणखी एक ऑगर मशीन इंदूरहून विमानाने आणण्यात आले. संध्याकाळी NHIDCL ने माहिती दिली की, बोगद्यात मोठी दरड दिसली आहे. तज्ञांच्या अहवालावर आधारित ऑपरेशन त्वरित थांबविण्यात आले.
१८ नोव्हेंबर: खोदकाम थांबवण्यात आले होते. तज्ज्ञांनी सांगितले की, बोगद्याच्या आत अमेरिकन ऑगर मशीनद्वारे निर्माण होणाऱ्या कंपनामुळे आणखी मलबा पडू शकतो, त्यामुळे बचाव कर्मचारीही अडचणीत येऊ शकतात. PMO अधिकारी आणि तज्ञांची टीम पर्यायी पद्धती शोधत होती. त्यांनी एकाच वेळी पाच योजनांवर काम करण्याचा निर्णय घेतला, ज्यात बोगद्याच्या वरच्या भागातून ड्रिलिंग करण्यास सुरूवात करण्याचा समावेश होता.
१९ नोव्हेंबर : बचाव कार्याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी देखील घटनास्थळीची पाहणी केली.यावेळी त्यांनी "बीआरओकडून खास मशीन आणून रस्ते तयार केले जात आहेत. अनेक यंत्रे येथे आली आहेत. बचावकार्यासाठी सध्या दोन बोअरिंग मशीन कार्यरत आहेत. ऑगर मशीनने योग्य प्रकारे काम केले तर येत्या दोन ते अडीच दिवसांत आम्ही अडकलेल्या मजुरांपर्यंत पोहोचू शकू", अशी आशा नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
२० नोव्हेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीएम धामी यांच्याशी फोनवर चर्चा केली. घटनास्थळी सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली. शक्य ते पावले उचलून मदत करण्याचे आश्वासन दिले. बचाव कर्मचार्यांनी ढिगाऱ्यांमध्ये सहा इंच रुंद पाइपलाइन टाकली, ज्यामुळे आत अडकलेल्या कामगारांना अन्न आणि इतर आवश्यक वस्तू पोहोचवण्यात मदत झाली. मात्र, तोपर्यंत आडवे खोदकाम सुरू करण्यात आले नव्हते. ऑगर मशीनद्वारे खडक दिसल्यानंतर काम थांबविण्यात आले. परदेशातून बोगदा तज्ञांना बोलावण्यात आले. उभ्या ड्रिलिंगला सुरुवात झाली होती.
२१ नोव्हेंबर : बचाव कर्मचार्यांनी सकाळी आतमध्ये अडकलेल्या कामगारांचा पहिला व्हिडिओ जारी केला. पिवळे आणि पांढरे हेल्मेट घातलेले कामगार बोलतांना दिसले. त्यांच्यापर्यंत पाइपलाइनद्वारे अन्न पाठवण्यात आले. ते एकमेकांशी बोलताना दिसले. दुसरा बोगदा खोदण्याची प्रक्रिया सुरू करून बोगद्याच्या बालकोट-शेवटला दोन स्फोट घडवून आणले जातात. तथापि, तज्ञांनी सांगितले की या योजनेवर काम करण्यासाठी 40 दिवस लागू शकतात. NHIDCL ने सिल्क्यारा टोकापासून रात्रभर होरिजेंटल बोरिंग ऑपरेशन्स पुन्हा सुरू केले, ज्यामध्ये ऑगर मशीनचा समावेश होता.
२२ नोव्हेंबर : रुग्णवाहिका स्टँडबाय ठेवण्यात आल्या होत्या. स्थानिक आरोग्य केंद्रात विशेष वॉर्ड तयार करण्यात आले होते. 800 मिमी व्यासाच्या स्टील पाईप्सचे क्षैतिज ड्रिलिंग सुमारे 45 मीटरपर्यंत पोहोचते. फक्त 12 मीटर अंतर बाकी आहे. एकूण ढिगाऱ्याचे प्रमाण 57 ते 60 मीटर असल्याचे सांगण्यात आले. मात्र, सायंकाळी उशिरा काही लोखंडी रॉड ऑगर मशीनच्या मार्गात आल्याने खोदकामात अडथळे येत आहेत. उभ्या ड्रिलिंगमध्ये मोठे यश मिळाले.
२३ नोव्हेंबर : गुरुवारी सकाळी काढण्यात आलेल्या लोखंडी रॉडमुळे ड्रिलिंगला सहा तास उशीर झाला. बचावकार्य पुन्हा सुरू करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या नोडल ऑफिसरने सांगितले की, ड्रिलिंगमध्ये 1.8 मीटरने प्रगती झाली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ड्रिलिंग 48 मीटरपर्यंत पोहोचले आहे. परंतु ड्रिलिंग मशीन ज्या प्लॅटफॉर्मवर आहे त्या प्लॅटफॉर्ममध्ये क्रॅक दिसू लागल्याने काम पुन्हा थांबवावे लागले.
24 नोव्हेंबर : रेस्क्यू टीम कामगारांच्या अगदी जवळ पोहोचली आहे. आता हे अंतर केवळ 9 ते 12 मीटर आहे.आज बचावकार्य पुर्ण होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.