लखनऊ : उत्तरप्रदेशमधील लखनऊ शहरातील लुलू मॉलचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आंदोलन करणाऱ्या हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. लुलू मॉल हा मॉल नसून ती एक मशीद आहे अशा आशयाचे काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यानंतर लखनऊमध्ये तणाव निर्माण झाला होता. दरम्यान आज हिंदू महासभेचे कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी मॉलच्या बाहेर जमा झाले असताना त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. (Lulu Mall Row Lucknow )
लुलू मॉल हा लखनऊ शहरात नवीनच सुरू झालेला मॉल असून मुस्लिम समुदायाचे लोक तेथे नमाज पढताना दिसून आले होते. यासंबंधित एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यानंतर या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर काही लोकांनी या मॉलमध्ये हनुमान चालिसा पठण करण्यासाठी काल परवानगी मागितली होती पण त्यांची परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलन करत घोषणाबाजी केली होती. यानंतर चार आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.
हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते शिशिर चतुर्वेदी म्हणाले की, "नव्यानेच सुरू झालेल्या मॉलमध्ये नमाज पठणाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सार्वजनिक ठिकाणी नमाज पठणाची परवानगी नसताना सरकारच्या नियमांचं उल्लंघन झालं आहे." असं चतुर्वेदी म्हणाले.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन गटात तणाव निर्माण करणे आणि समाजाच्या भावना दुखावणे या कारणावरून अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर मॉलमध्ये कोणत्याही प्रकारच्या सामाजिक प्रार्थनासाठी परवानगी देण्यात येणार नसल्याची नोटीस मॉलच्या अधिकाऱ्यांनी लावली आहे.
लुलू मॉलचे सोमवारी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उद्घाटन केले असून भारतीय वंशाचे युसूफ अली यांच्या नेतृत्वाखाली अबू धाबी येथे असलेल्या लुलू समूहाद्वारे हा मॉल सुरू करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.