veteran journalist prakash akolkar writes blog after ayodhya verdict 
देश

गोमाता ते रामलल्ला!

प्रकाश अकोलकर

"बाबरी मशीद' आणि "रामजन्मभूमी' हा विषय राष्ट्रीय स्वयंसेवक संघपरिवारानं चर्चेत आणला ते ऐंशीचं दशक. दैनंदिन बातम्या गोळा करणाऱ्या पत्रकारांसाठी बरंच धकाधकीचं होतं. अगदी त्या रामजन्मभूमीपासून शेकडो किलोमीटरवरील मुंबईसारख्या बहुरंगी-बहुढंगी आणि मुख्य म्हणजे विविध जाती-धर्माच्या लोकांना गुण्यागोविंदानं नांदवणाऱ्या या महानगरातही त्याची धग जाणवत होतीच. पण खऱ्या अर्थानं तो विषय अंगावर आला 1987 मध्ये मुंबईच्या पश्‍चिम उपनगरातील विलेपार्ले मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं. 1985च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले कॉंग्रेसचे आमदार हंस भुग्रा यांच्या निधनानं ही पोटनिवडणूक होऊ घातली होती. त्यात शिवसेनेनं तत्कालीन महापौर डॉ. रमेश प्रभू यांना उमेदवारी दिली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपला "मराठी बाणा' बाजूस सारून, हिंदुत्वाचा झेंडा प्रथमच जाहीरपणे खांद्यावर घेतला तो याच निवडणुकीच्या निमित्तानं आणि त्याच निवडणुकीत "गर्व से कहो हम हिंदू है!' ही घोषणा घराघरांत पोचली होती.

मशिद बांधण्यासाठी हिंदू्ंनी निधी द्यावा : रामदेव बाबा

विश्‍व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी देशभरात अधोरेखित केलेली ही घोषणा महाराष्ट्रातील घराघरांत पोचवण्याचं श्रेय या निवडणुकीच्या निमित्तानं बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलं. त्याही पलीकडली आणि आता फारशी कोणाच्या लक्षातही नसलेली महत्त्वाची बाब म्हणजे विलेपार्ल्यातील या पोटनिवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या विरोधातील जनता दलाचे उमेदवार प्राणलाल व्होरा यांना पाठिंबा दिला होता. एवढंच नव्हे तर जनता पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारातही भाजप सहभागी झाला होता. त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रात तेव्हा शरद पवार यांनी स्थापन केलेल्या पुरोगामी लोकशाही दलाच्या (पुलोद) सरकारमध्ये भाजप सहभागी होता आणि 1985 मधील विधानसभा निवडणुकाही भाजपनं त्याच "पुलोद'च्या झेंड्याखाली निवडणुका लढवल्या होत्या. 

या पोटनिवडणुकीत शिवसेनेला "गर्व से कहो हम हिंदू है!' या घोषणेच्या जोरावर मिळालेल्या विजयाचं माहात्म्य सर्वांत आधी ध्यानात आलं ते प्रमोद महाजन यांच्या. भाजप रामजन्मभूमी मुक्‍ती आंदोलनात सक्रिय सहभागी झाला नाही तर महाराष्ट्रातील "हिंदू व्होट बॅंक' ठाकरे आपल्याकडे खेचतील, हे त्यांनी भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांना पटवून दिलं. त्यानंतर जून 1989 मध्ये हिमाचल प्रदेशातील पालनपूर येथील बैठकीत रामजन्मभूमी हा विषय भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पहिल्यांदा आला. तोपावेतो भाजपची संपूर्ण सूत्रं ही अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडून अडवाणींच्या हातात आलेली होती. बैठकीवर संपूर्णपणे अडवानी आणि महाजन यांचंच वर्चस्व होतं. "भारतातील बहुसंख्याकांच्या म्हणजेच हिंदूंच्या भावनांकडे कॉंग्रेस आणि देशातील अन्य पक्ष कसे डोळ्यांवर पट्टी बांधून बघत आहेत,' अशी तिखट टीका कार्यकारिणीच्या त्या बैठकीत करण्यात आली होती. राममंदिर उद्‌ध्वस्त करून तिथं मशीद उभारण्यात आल्यापासून या देशातील कोट्यवधी हिंदू हे, "याच तीर्थावर पुन्हा मंदिर कधी बांधलं जाईल, याची आतुरतेनं वाट बघत आहेत!' असं मत बैठकीत ठामपणे व्यक्‍त करण्यात आलं. याच बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या एका लंब्याचौड्या ठरावात देशात ब्रिटिशांच्या विरोधात 1857 मध्ये झालेल्या बंडाचाही उल्लेख होता, असं ज्येष्ठ पत्रकार किंगशुक नाग यांनी आपल्या "द सॅफ्रॉन टाइड' या ग्रंथात निदर्शनास आणून दिलं आहे. "या बंडाच्या वेळी मुस्लिमांनी अयोध्येतील रामजन्मभूमीवरचा हिंदूंचा दावा मान्य केला होता. पण ब्रिटिशांनी आपल्या "डिव्हाइड ऍण्ड रूल' या धोरणानुसार त्यात खो घातला आणि त्यामुळेच तो करारनामा अंमलात येऊ शकला नाही!' असा दावा भाजपने त्या ठरावात केल्याचं किंगशुक नाग सांगतात.

मोठ्या वादावर पडदा पडला : उद्धव ठाकरे

रा. स्व. संघाचे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी यांनी, हिंदूंना एकत्र आणण्यासाठी गाय हे प्रतीक म्हणून 1952 मध्येच एक लेख लिहून जाहीर केलं होतं, असं प्रख्यात विचारवंत रामचंद्र गुहा यांनीच आपल्या "इंडिया आफ्टर गांधी' या ग्रंथात नमूद केलं आहे. गोळवलकर यांनी "हिंदू तितुका तो मेळवावा' म्हणून गोमाता हे प्रतीक निश्‍चित करण्याची भूमिका 1952 मध्येच घेतलेली असतानाही त्यानंतर त्यात बदल करून रामाच्या नावाने गजर करण्याचा निर्णय का घेतला असावा, याबाबत तर्क करण्यास वाव देणारी आणखी एक घटना इथं नमूद करायला हवी. 

ही घटना ज्येष्ठ पत्रकार अक्षय मुकुल यांच्या "गीता प्रेस ऍण्ड द मेकिंग ऑफ हिंदू इंडिया' या ग्रंथात तपशीलवारपणे नोंदवण्यात आली आहे. गोरखपूर येथील "गीता प्रेस' ही संस्था विविध धार्मिक ग्रंथ प्रकाशित करते. मात्र, तेवढ्यापुरतेच त्या संस्थेचं कार्य मर्यादित नाही. याच संस्थेमार्फत प्रकाशित होणाऱ्या "कल्याण' या नियतकालिकाच्या माध्यमातून हिंदुत्ववादाचा प्रचार करण्याचे काम गेली अनेक दशके अव्याहतपणे सुरू आहे. आज या नियतकालिकाच्या 20 हजार प्रती वितरित होतात, तर इंग्लिशमधून प्रसिद्ध होणाऱ्या "कल्याण-कल्पतरू'च्या दरमहा 10 हजार प्रती वितरित होत असतात. 1983 पर्यंत "रामचरितमानस' या ग्रंथाच्या 57 लाख प्रती विकल्या गेल्या होत्या आणि योगायोगाची बाब म्हणजे, 1983 मध्ये या ग्रंथाच्या एक लाख प्रती छापण्याबाबत साशंक असलेल्या "गीता प्रेस'च्या संचालक मंडळाला, त्याच वर्षी त्याच ग्रंथाच्या आणखी एक लाख प्रती छापाव्या लागल्या होत्या! सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी 1982 मध्ये संघशिक्षा वर्गानिमित्तानं रात्री झालेल्या अनौपचारिक बैठकीत "ताला कब तक पडा रहेगा?' असा प्रश्‍न विचारला होता. त्याचा पुढच्याच वर्षी खपलेल्या "रामचरितमानस'च्या दोन लाख प्रतींशी काही संबंध होता काय, या प्रश्‍नाचं उत्तर मात्र अयोध्येतील तो रामलल्लाच देऊ शकेल. मात्र, रामनामाची भुरळ भारतीय आणि विशेषत: उत्तर भारतीय जनमानसाला कशी आणि किती पडलेली आहे, त्याचीच साक्ष या घटनेमुळे मिळाली होती. 
भाजपच्या पालमपूर येथील या ऐतिहासिक ठरावानंतरच्या पुढच्याच वर्षी, म्हणजे 1990 मध्ये अडवाणी तसेच महाजन यांच्या नेतृत्वाखाली ती "सोमनाथ से अयोध्या तक' अशी रथयात्रा निघाली. त्यामुळे अवघा देश ढवळून निघाला आणि पुढच्या दोनच वर्षांत अयोध्येत "बाबरीकांड' घडलं. त्यानंतरच्या भीषण दंग्यांमुळे समाजात कधीही दूर न होऊ पाहणारी "हम और वो' अशी दुराव्याची दरी निर्माण झाली आणि त्या दंग्यांची सर्वाधिक झळही मुंबईला पोचली. त्यानंतर काय काय झालं ते आता आपल्या देशाच्या बखरीच्या पानांवरील नोंदींमध्येच शोधावं लागतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT