तिरुअनंतपूरम: वायनाडच्या भूस्खलनात मृत्युमुखी पडलेल्या १७९ मृतदेहांची ओळख पटल्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितले. विनाशकारी भूस्खलनात चारही गावातील १७ कुटुंब पूर्णपणे नष्ट झाली असून त्यांच्या कुटुंबातील एकही सदस्य वाचलेला नाही. या कुटुंबात एकूण ६५ जणांचा मृत्यू झाला आहे.
पीडित नागरिकांना घर देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले, दरम्यान, तीस जुलैनंतर पीडित खातेधारकांच्या खात्यातून बँकांनी कर्जाच्या हप्त्यापोटी पैस कापून घेतले असतील तर ते पैसे परत खात्यात जमा केले जाणार असून सध्याच्या कर्जाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पत्रकार परिषदेत राज्यस्तरीय बँक समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. भूस्खलनग्रस्त भागात राहणाऱ्या नागरिकांच्या खात्यातून तीस जुलैनंतर पैसे कापले गेले असतील तर त्यांच्या खात्यात पुन्हा पैसे जमा केले जाणार आहेत. शेती आणि बिगर शेतीच्या कामासाठी देखील घेतलेल्या कर्जाची पुनर्रचना करण्यात येणार आहे आणि तत्काळ आर्थिक दिलासा म्हणून गरजूंना २५ हजार रुपये दिले जातील.
२५ हजार रुपयांची परतफेड तीस महिन्यांत करावी लागणार आहे. शिवाय भूस्खलनग्रस्त भागातील कर्जवसुली थांबविण्याचे निर्देश दिले असून त्यानुसार स्थगिती देण्यात आली आहे. शिवाय पीडित लोकांना सध्याच्या काळात दिली जाणारी आर्थिक मदतीचे रूपांतर हे त्यांच्यावरील सध्याच्या कर्जात सामील केले जाणार नाही तसेच भूस्खलनग्रस्त भागातील लोकांवरचा आर्थिक ताण कमी करण्यासाठी त्यांच्या खात्यातून आपोआप पैसे कापले जात असतील तर त्याचाही फेरआढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय कर्ज मंजुरीच्या नियमात सुलभता आणली असून भूस्खलनग्रस्त लोकांना तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
भूस्खलनामुळे अनेक कुटुंब उघड्यावर पडली असून त्यांचे आर्थिक स्रोत हिरावले गेले आहेत. त्यांना नव्याने संसार उभा करण्यासाठी त्यांना बराच काळ लागणार आहे. म्हणून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केरळमधील बँकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे विजयन म्हणाले. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी भूस्खलनग्रस्त लोकांच्या खात्यातून कर्जाचे हप्ते कापल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती आणि काही नागरिकांनी बँकेच्या शाखेसमोर आंदेालनही केले होते.
घरे देण्यासाठी वेगाने हालचाली
भूस्खलनात असंख्य घरांची पडझड झाली असून पीडितांना पुन्हा घर देण्यासाठी केरळ सरकारकडून प्रयत्न केले जात असताना मृतांच्या नातेवाइकांना सहा लाखांची मदत दिली आहे. भूस्खलनामुळे या चारही गावातील सतरा कुटुंबातील एकही व्यक्ती जिवंत राहिलेला नाही. यादरम्यान ११९ जण बेपत्ता आहेत आणि त्यांच्या ९१ नातेवाईकांचे डीएनए नमुने गोळा केले आहेत. ते नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ३० जुलै रोजी वायनाड जिल्ह्यातील भूस्खलनात मुंडक्कई आणि चुरलमला येथे चारशेहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला तर असंख्य जखमी झाले. पीडित कुटुंब भाड्याच्या घरात राहत असतील तर त्याचे भाडे सरकारकडून भरले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.