चुरुंदा (जम्मू काश्मीर) : जगभरात नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत होत असताना भारत आणि पाकिस्तान नियंत्रण रेषेलगत असलेल्या गावातही नव्या वर्षांचे उत्साहात स्वागत झाले. जवानांनी उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ असलेल्या गावात ग्रामस्थांसमवेत नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला आनंद व्यक्त केला. यावेळी नागरिकांनी जवानांसमवेत गाण्यावर ठेकाही धरला.
रविवारची सायंकाळ नव्या वर्षाच्या स्वागताच्या आनंदात न्हाऊन निघत असताना पाकिस्तानलगतच्या नियंत्रण रेषेवरही जल्लोष होता. एलओसीलगत असलेल्या गावात नव्या वर्षाचे जोरदार स्वागत करण्यात आले. नियंत्रण रेषेवरील चौकीवर आणि गस्तीवर जाण्यापूर्वी जवानांनी स्थानिक नागरिकांसमवेत गरम चहाचा आस्वाद घेतला. त्याचबरोबर भोजन आणि नृत्यही केले. यावेळी त्यांनी स्थानिकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या. उरी सेक्टरमधील एलओसीजवळच्या चुरुंदा गावात रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास कडाक्याची थंडी असताना नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू झाली.
यावेळी लष्कर आणि ग्रामस्थांनी एकमेकांना शुभेच्छा देत चांगल्या आणि कठीण काळात एकमेकांना साथ देण्याचे आश्वासन दिले. सीमाभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यात लष्कर नेहमीच आघाडीवर असते. याबद्दल गावकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते लाल हसन कोहली म्हणाले, प्रत्येक कठीण काळात नागरिकांनी लष्कराला समर्थपणे साथ दिली आहे. नव्या वर्षाच्या स्वागताच्या कार्यक्रमाचे आयोजन लष्कराने केले होते. आपण लष्कराचे आभार मानतो आणि अभिनंदनही करतो, असेही ते म्हणाले. जेव्हा आम्हाला अडचणी येतात, तेव्हा लष्कर खंबीरपणे उभे राहते.
लष्करामुळे आपला शत्रू प्रवेश करू शकत नाही आणि याबद्दल आभार मानतो. वर्षातले सर्वात महत्त्वाचे दिवस एकत्र साजरे करतो. प्रजासत्ताक दिन जवळ आला आहे. राष्ट्रीय कार्यक्रमात गावकरी उत्साहाने सहभागी होतात. गावातील लग्नसमारंभात जवान सहभागी होतात. आम्ही भावंडासारखे राहतो आणि लष्कराशी आमचे जवळचे नाते आहे. हे नाते चांगले राहावे, अशी प्रार्थना करतो, असे कोहली म्हणाले. स्थानिक शाळेतील शिक्षक जहाँगीर लतीफ यांनी बोलताना नियंत्रण रेषेवर वर्षभर शांतता राहिल्याबद्दल लष्कराचे आभार मानले. २०२४ वर्ष देखील शांततेत आणि बंधूभावाच्या वातावरणात व्यतीत होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
नियंत्रण रेषेवर लष्करासमवेत आम्ही दरवर्षी नवीन वर्षानिमित्त जल्लोष करतो. आनंदोत्सव साजरा करण्याची परंपरा भविष्यातही कायम राहो, अशी अपेक्षा करतो. घरापासून दूर असलेल्या जवानांना आनंद साजरा करण्याची संधी यानिमित्ताने मिळते.
- लाल दिन खटाना, सरपंच
काश्मीरमध्ये ७६ दहशतवाद्यांचा खातमा
जम्मू काश्मीरमध्ये वर्षभरात विविध कारवायांत ७६ दहशतवादी मारले गेले असून त्यात ५५ परकी दहशतवाद्यांचा समावेश होता. पोलिस महासंचालक आर. आर. स्वॅन यांनी पत्रकार परिषदेत बोलताना २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये दहशतवादी हल्ले कमी झाल्याचे सांगितले. मावळलेल्या वर्षात जम्मू काश्मीरमध्ये २९१ दहशतवाद्यांना अटक केली तर घातपाती कारवाया करण्यासाठी मदत करणाऱ्या २०१ जणांविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायद्यार्तंगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस महासंचालक स्वॅन म्हणाले, जम्मू काश्मीरमध्ये २०२२ च्या तुलनेत दहशतवादी कारवायांत ६३ टक्के घट झाली आहे.
२०२२ मध्ये १२५ घटना झालेल्या असताना २०२३ मध्ये केवळ ४६ दहशतवादी घटना घडल्या. यावर्षी काश्मीर खोऱ्यातून दहशतवादी संघटनांत भरती होण्याचे प्रमाण ८० टक्क्यांनी घसरल्याचे निदर्शनास आले आहे. २०२२ मध्ये काश्मीर खोऱ्यातून १३० जण दहशतवादी संघटनांत सामील झाले तर २०२३ मध्ये ही संख्या केवळ २२ राहिली. स्थानिक नागरिकांच्या हत्येचे प्रमाणही कमी राहिले आहे. २०२२ मध्ये विविध ठिकाणी दहशतवाद्यांनी ३१ जणांची हत्या केलेली असताना २०२३ मध्ये ही संख्या १४ राहिली. २०२३ मध्ये पोलिस अधीक्षकांसह चार पोलिस कर्मचारी हुतात्मा झाले तर २०२२ मध्ये १४ पोलिस कर्मचारी हुतात्मा झाले. याप्रमाणे जवान मृत्युमुखी पडण्याच्या संख्येत ७१ टक्के घसरण झाली आहे. २०२३ मध्ये काश्मीरमध्ये ७८ आणि जम्मूतील ११ सह ८९ दहशतवादी मोड्यूलचा भांडाफोड करण्यात आला. तसेच काश्मीर खोऱ्यात १२ तर जम्मूच्या ६ ठिकाणांसह दहशतवाद्यांच्या एकूण १८ ठावठिकाणांचा शोध लागला.
मालमत्ता जप्ती आणि फेक खाते
२०२३ मध्ये दहशतवादी आणि फुटिरवाद्यांशी संबंधित १७० कोटींपेक्षा अधिक किंमतीच्या ९९ मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून त्यातील ५७ मालमत्ता राज्य तपास यंत्रणांने ताब्यात घेतल्या आहेत. तसेच सोशल मीडियावरचे सुमारे ८ हजार बनावट खाते उघडकीस आणले असून ही खाते परदेशातून हाताळली जात होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. याशिवाय अनेक वादग्रस्त बँक खाती गोठविण्यात आली आहेत. जम्मू भागातील राजौरी आणि पूँच जिल्ह्यात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.