चेन्नई: तमिळनाडूचं राजकारण हे खूपचं महत्त्वाचं तसेच संवेदनशील राजकारण मानलं जातं. राज्यातील राजकारणाच्या पटलावर द्रमुक पक्षांची मोठी चलती आहे. अण्णा द्रमुक पक्षाच्या दिवंगत प्रमुख जयललिता आणि द्रमुक पक्षाचे दिवंगत प्रमुख करुणानिधी यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात तशी मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अलिकडेच झालेल्या तमिळनाडू विधानसभेच्या निवडणूकांमध्ये ही पोकळी भरुन काढण्याचे प्रयत्न अनेकांकडून झाले. सरतेशेवटी तमिळनाडूची सत्ता पुन्हा काबीज करण्यात द्रमुक पक्षाला तब्बल 10 वर्षांनंतर यश मिळालं आहे.
मात्र, पराभवानंतरही अण्णा द्रमुक पक्षांतील खळबळ काही थांबली नाहीये. याउलट आता पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ माजणार असल्याचं चित्र पक्षात आहे. जयललिता यांच्या जवळच्या सहकारी मानल्या जाणाऱ्या शशिकला यांनी गेल्या मार्च महिन्यातच आपण राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी जाहीर केलेला हा निर्णय मोठा महत्त्वपूर्ण मानला गेला. मात्र, आता त्यांनी राजकारणात पुन्हा एकदा परतण्याचे संकेत दिले आहेत.
कधीकाळी तमिळनाडूच्या राजकारणात जयललिता यांच्यानंतर कुणाचं नाव घेतलं जायचं तर ते होतं शशीकला यांचंच! मुख्यमंत्री पदावर जयललिता होत्या... मात्र पडद्याच्या मागे त्यांच्या प्रत्येक राजकीय निर्णयामागे आणि हालचालीमागे शशीकला यांचा सल्ला असायचा, असं म्हटलं जायचं.
तमिळनाडूच्या राजकारणातून बाजूला व्हायचा त्यांचा निर्णय हा विधानसभेच्या निवडणुकीच्या महिनाभर आधी घोषित करण्यात आला होता. शशिकला यांना 2017 मध्ये बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर यावर्षीच्या जानेवारी महिन्यात त्यांची सुटका करण्यात आली होती. त्या काळात अण्णाद्रमुकसोबत पुन्हा एकदा सोबत येण्याचे प्रयत्न झाले असले, तरी नवी दिल्लीतील राजकीय दबावामुळे तो उद्देश सफल होऊ शकला नाही..
अण्णाद्रमुकच्या दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये बिघडलेले नातेसंबंध याला कारणीभूत असल्याचं म्हटलं जातंय. माजी मुख्यमंत्री के पलानीस्वामी आणि नंतर उपमुख्यमंत्री झालेले ओ पन्नेरसेल्वम यांच्यातील बिघडलेल्या संबंधांमुळे आता त्या राजकारणात परत येण्याची त्यांची योजना सुरु आहे, असे दिसून येत आहे. राज्यातील याच बिघडलेल्या राजकारणामध्ये पुन्हा पाय रोवण्याची संधी त्यांना मिळत असल्याचं दिसून येतंय.
द्रमुक निवडणूक जिंकणार असल्याचे स्पष्ट झालं होतं तरीही विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी भाजप-आरएसएसचं नेतृत्व शशिकलांचा गट आणि अण्णाद्रमुक यांच्यात पुन्हा सांधेजोड करण्याच्या वाटाघाटीत गुंतले होते, असं शशीकला यांच्या जवळच्या एका सूत्रांनं सांगितलं.
पनीरसेल्वम यांनी त्यांच्या पुनरागमनाच्या कल्पनेचं स्वागत केलं तर पलानीस्वामींनी विरोध केला होता. कारण जर शशीकला यांना पुन्हा पक्षात जागा दिली तर त्या पक्षातील पोकळी भरुन काढतील आणि त्यांचा गट शिरजोर ठरेल, अशी भीती त्यांना होती, असं म्हटलं जात होतं. तुरुंगातून सुटल्यानंतर त्या पुन्हा पक्षामध्ये आपलं बस्तान बसवतील म्हणूनच त्यांना दूर ठेवलं गेलं. एका सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, शशीकला आता येत्या जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात एक राज्यव्यापी दौरा करुन आपल्या कामास सुरुवात करणार आहेत.
पलानीस्वामी यांच्या पक्षातल्या अभूतपूर्व पकडीमुळे येत्या काही आठवड्यांत पलानीस्वामी आणि पन्नेरसेल्वम यांच्या गटामध्ये संघर्ष वाढण्याची अपेक्षा शशीकलांच्या गटाला आहे. एकीकडे दोन्ही नेत्यांमध्ये पक्षामधील क्रमांक एकचा नेता होण्याची धडपड सुरु असतानाच शशीकला या माजी मुख्यमंत्री पलानीस्वामींना अधिक लक्ष्य करताना दिसून येताहेत, ज्याला पनीसेल्वम यांचा देखील पाठिंबा दिसून येतो आहे.
शशीकला यांनी दोन्ही नेत्यांशी याआधी पक्षांतर्गत सत्तेसाठी संघर्ष केला आहे. जयललितांच्या निधनानंतर डिसेंबर 2016 मध्ये पनीरसेल्वम यांनी शशीकला यांच्या पक्षातील अधिकारांवर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं. तर पलानीस्वामी यांना त्यांनी तुरुंगात जाण्यापूर्वी मुख्यमंत्री पदासाठीची पसंती दिली होती
शशीकला यांनी सुचवल्यानंतरच जयललितांनी 2001 ते 2014 दरम्यान त्यांना मुख्यमंत्री बनवलं होतं तर दुसऱ्या बाजूला पलानीस्वामी यांना देखील मुख्यमंत्री पदासाठी त्यांनीच निवडलं होतं आणि म्हणूनच आता त्या पलानीस्वामींवर नाराज असल्याचं एका सुत्राने सांगितलंय. शशीकला यांनीच पलानीस्वामींवर विश्वास टाकत अण्णाद्रमुक पक्षाची धुरा त्यांच्यावर सोपवली होती, मात्र आता तेच त्यांच्या पुनरागमनामध्ये मुख्य अडथळा ठरत असल्याचं म्हणणं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.