नवी दिल्ली - शेतकऱी आंदोलनाची धग आता आणखी वाढली आहे. संत बाबा राम सिंह यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. संत बाबा राम सिंह हेसुद्धा शेतकरी आंदोलनात सहभागी होते. शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्यानं आपण दु:खी असल्याचं म्हणत त्यांनी आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. गोळी झाडून घेतल्यानंतर उपचारासाठी त्यांनी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
संत बाबा राम सिंह यांचा डेरा कर्नाल जिल्ह्यातील निसंग जवळ असलेल्या सिंगडा गावात आहे. त्यांना सिंगडा वाले बाबाजी या नावाने जगभरात ओळखलं जातं. हरियाणा, पंजाब आणि जगात त्यांना याच नावाने ओळखलं जात होतं. बाबा राम सिंह हे सिंगडा शिवाय देश विदेशात प्रवचनासाठी जात होते.
बाबा राम सिंह हे शिखांच्या नानकसर संप्रदायाशी जोडले होते. नानकसर संप्रदायात संत बाबा राम सिंह यांना मानणाऱ्या अनुयायांची संख्या मोठी आहे. शेतकरी आंदोलनातही ते सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या अडचणी आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायामुळे संत बाबा राम सिंह व्यथित झाले होते.
अकाली दल हरियाणाचे प्रदेश प्रवक्ते कंवलजीत सिंह अजराना यांनी सांगितलं की, गुरुवारी बाबा राम सिंह यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी सिंगडा इथं नेण्यात येईल. तिथं डेरा असलेल्या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येणार आहे.
सुसाइड नोट
शेतकऱ्यांचं त्यांच्या हक्कासाठी दु:ख पाहिलं आहे. रस्त्यावर त्यांना पाहून मला दु:ख झालं आहे. सरकार त्यांना न्याय देत नाही. हा अन्याय आहे.जो अन्याय करतो तो पापी आहे. अन्याय सहन करणं हेसुद्धा पाप आहे. कोणी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तर कोणी अन्यायाविरुद्ध काही केलं आहे. कोणी पुरस्कार परत देऊन आपला राग व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, सरकारी अन्यायावर राग असताना सेवक आत्महत्या करतोय. हा अन्यायाविरोधातील आवाज आहे. हा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आवाज आहे. वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरुजी की फतेह
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवरून संत बाबा राम सिंह यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राहुल गांधी म्हणाले की, कर्नालचे संत बाबा राम सिंहजी यांनी कुंडली सीमेवर शेतकऱ्यांची अवस्था पाहून आत्महत्या केली. या दु:खाच्या वेळी माझ्या शोक संवेदना आणि श्रद्धांजली. अनेक शेतकऱ्यांनी प्राणांची आहुती दिली आहे. मोदी सरकारने क्रूरतेच्या सीमा ओलांडल्या आहेत. हट्ट सोडा आणि तात्काळ कृषी विरोधी कायदे मागे घ्या असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.