गेल्या काही महिन्यांपासून भारत-चीन सीमेवर (India-China Border) सातत्याने संघर्ष चालू आहे. आधी गलवान (Galwan), नंतर डोकलाम (Doklam) आणि आता अरुणाचल प्रदेशातील तवांग (Tawang) हा संघर्ष चालू आहे. भारत आणि चीनमध्ये युद्ध होऊ शकतं अशा बातम्या काही दिवसांपासून येत आहेत. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग (Defense Minister Rajnath Singh) यांनी गेल्या महिन्यात सैन्यदलांना युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास तयार राहण्याचे आदेश दिले होते. भारत आणि चीन या दोन्हीही देशांनी आपलं जास्तीक जास्त सैन्य या भागात तैनात केलंय. पण भारत चीनमध्ये हा संघर्ष का होतो?
याचं कारण आहे, येथील भौगोलिक रचना. भारत आणि चीन सीमेवर हिमालयाच्या पर्वतरांगा पसरल्या आहेत. ज्याच्या ताब्यात येथील जास्तीक जास्त भाग असेल, त्याला जास्तीक जास्त लाभ मिळेल. तो नेमका कसा, ते जाणून घेऊया.
गलवान संघर्ष-
१९६२ साली भारत चीन युद्धानंतर जम्मू काश्मिरचा काही भाग चीनने गिळंकृत केला. तो भाग म्हणजे 'अक्साईचीन' होय. गेल्या वर्षीपासून गलवान खोऱ्यामध्ये चीननं अतिक्रमण केलं होते. लडाखच्या पूर्वेकडील भागातील गलवान नदीला लागून असल्याने या भागाला गलवानचे खोरे असं म्हणतात.
दोन्ही देशांसाठी हा प्रदेश अत्यंत महत्वाचा आहे. या भागावर आपलं नियंत्रण नसेल तर भारत अक्साई चीन पठारापर्यंत सहज पोहचेल अशी भीती चीनला वाटते. असं झाल्यास या भागात चीन दोन पावलं मागे गेल्यासारखी परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे चीन आणि भारतही या प्रदेशामधून मागे घटण्यास तयार नाही. दोन्ही देशांनी या भागात काही चौक्याही उभारल्या आहेत. गतवर्षी या भागात झालेल्या संघर्षात चीनचे ४३ तर भारताचे २० जवान शहिद झाले होते.
डोकलाम वाद-
भारत आणि चीनमधील संघर्ष ताणला जाण्यासाठी डोकलाम प्रदेशही कारणीभूत ठरला. भारत, चीन आणि भूतान या तीन देशांची सीमा या विवादीत प्रदेशात येऊन मिळते. या विवादीत भागात चीननं रस्ता बांधायला घेतला. चीनच्या या कृतीस १६ जून रोजी भारताने आक्षेप घेतला.
चीन हा भाग स्वतःचा असल्याचा दावा करतोय. चीनने या भागात रस्ता बांधायला घेतलाय. भूतानच्या प्रदेशावर जर चीनने हा रस्ता बांधला तर ईशान्य भारताला जोडणाऱ्या भारताच्या भूभागाजवळ सहजपणे पोहोचण्याची संधी चीनला मिळू शकते, अशी चिंता भारताला सतावते आहे.
गलवान, डोकलाम आणि नंतर अरूणाचल प्रदेशच्या तवांग भागातही भारत आणि चीन गेल्या महिन्यात आमनेसामने आले होते. अरुणाचल प्रदेशात यांगत्सेजवळ तवांग सेक्टरमध्ये भारतीय सैनिकांनी चीनच्या जवळपास २०० सैनिकांना रोखलं. चिनी सैनिक वास्तविक नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय सीमेत घुसले होते.
खरंतर तवांग भागात भारत आणि चीनमध्ये कोणतीही अधिकृत सीमारेषा नाही. दोन्ही देशांची सीमा रेषा वैयक्तिक आकलनावर आधारीत आहे आणि दोन्ही देशांच्या आकलनात फरक आहे. त्यामुळे या भागात वारंवार अशा घटना घडून येऊ शकतात.
थोडक्यात भारत चीन सीमेवरील हिमालयाच्या पर्वतरांगांमुळे या भागात कोणतीही निश्चित अशी सीमारेषा नाही. त्यात हिमालयाच्या पर्वतरांगांचं भौगोलिक महत्त्व दोन्ही देशांना ठाऊक आहे. त्यामुळे या भागातील कोणताही प्रदेश शत्रूच्या देशात जाऊ नये यासाठी भारत आणि चीन दोन्ही देशांचे प्रयत्न असतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.