नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. पण, त्याआधी एक्झिट पोलचा कल समोर आला आहे. सर्व एक्झिट पोलच्या अंदाजानुसार एनडीए सरकार पुन्हा स्थापन होणार असून जवळपास ३५० जागा युतीला मिळतील असं सांगण्यात आलं आहे. दुसरीकडे, विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या पदरी निराशाच पडेल असे चित्र आहे.
एक्झिट पोल आणि ४ जूनचा खरा निकाल यात तफावत असू शकते. कारण, एक्झिट पोल हे छोट्या पातळीवर केलेला सर्व्हे असतो. त्यामुळे एक्झिट पोलसारखेच निकाल शंभर टक्के लागतील असं आपण म्हणू शकत नाही. पण, अनेकदा एक्झिट पोल जनतेचा अचूक कल हेरतात असंही चित्र पाहायला मिळतं. याच पार्श्वभूमीवर २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये एक्झिट पोलमध्ये काय अंदाज व्यक्त करण्यात आला होता? आणि तो कितपत खरा ठरला याबाबत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करुया.
२००९ मध्ये यूपीए सरकारने केंद्रात सत्ता स्थापन केली होती. देशातील अनेक एक्झिट पोलने यूपीएला कमी जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता. एक्झिट पोलमध्ये यूपीएला सरासरी १९५ तर एनडीएला १८५ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता. याचा अर्थ यूपीए आणि एनडीएममध्ये चुरशीची लढत होईल असा अंदाज बांधण्यात आला होता. पण, चित्र वेगळं होतं. निवडणुकीत यूपीएला २६२ जागा मिळाल्या तर एनडीएला १५८ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसला २०६ तर भाजपला ११६ जागा मिळाल्या होत्या.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल १६ मे रोजी लागला होता.आठ एक्झिट पोलमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सरासरी २८३ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तर यूपीएला सरासरी १०५ जागा मिळतील असं सांगण्यात आलं होतं. पण, जेव्हा खरा निकाला लागला तेव्हा मोदी लाटेने कमाल केल्याचं पाहायला मिळालं. एनडीएला ३३६ जागा मिळाल्याचं स्पष्ट झालं, तर यूपीएची पिछेहाट झाली. यूपीएला फक्त ६० जागा मिळाल्या. यात भाजपला २८२ तर काँग्रेस ४४ जागा मिळाल्या होत्या.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी जाहीर झाला होता. या निवडणुकीमध्ये भाजपने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली होती. १३ एक्झिट पोलने एनडीएला सरासरी ३०६ जागा मिळतील आणि यूपीएला १२० जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता. पण, भाजपने पुन्हा अनपेक्षितरीत्या जास्त जागा जिंकल्या. एनडीएला ३५३, तर यूपीएला ९३ जागा मिळाल्या. भाजपला एकट्याला ३०३ जागा मिळाल्या तर काँग्रेसला ५२ जागांवर समाधान मानावे लागले.
एकंदरीत एक्झिट पोलचा कल पाहता तो एकदम अचूक असतो असं होत नाही. पण, एक्झिट पोल एकदम वेगळे चित्र निर्माण करतात असंही नाही. एक्झिट पोलच्या अंदापेक्षा ५० ते ६० जागा इकडे-तिकडे होत असतात असं आपल्याला मागील तीन लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल आणि निकालाकडे पाहून म्हणता येईल. तूर्तास ४ जूनच्या खऱ्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.