HSC Result 2024: Sakal
एज्युकेशन जॉब्स

HSC Result 2024: अपयशापुढे यशच आहे! तरुणांनो... खचू नका

कुठलीही एक परीक्षा म्हणजे अख्खे आयुष्य नव्हे

सकाळ वृत्तसेवा

‘१२th फेल’ चित्रपट बहुतांश तरूणाईने बघितला असेलच. बारावीत नापास होऊनही संघर्षातून ‘क्लास वन’ अधिकारी बनणाऱ्या ध्येयवेड्या तरूणाची ही यशकथा सर्वांनाच प्रेरणा देणारी आहे. कुठलीही एक परीक्षा म्हणजे, अख्खे आयुष्य नव्हे, हे यातून ठासून सांगितलंय.

म्हणूनच आजच्या बारावीच्या निकालात यश आले तर लगेच हुरळून जाऊ नका अन् अपयश आले तर खचूनही जाऊ नका. ‘अपयश ही यशाची पहिली पायरी म्हणण्यापेक्षा अपयश हे तर यशाचे पूर्ण पुस्तक असते, ज्याच्या शेवटच्या पानावर यश असते. ते गाठण्यासाठी अपयशाचे संपूर्ण पुस्तक वाचावे लागते. याचाच अर्थ प्रयत्न करा, यश शिखरावर मिळेलच’, असे आवाहन मानसोपचारतज्ज्ञ, शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांनी केले आहे.

राज्य बोर्डाच्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. निकालानंतर काही जण निराश होतात. त्यातून टोकाची पावलं उचलतात. दरवर्षी निकालानंतर विद्यार्थी आत्महत्येसारख्या घटना ऐकायला, वाचायला मिळतात. गेल्यावर्षी राज्यात १ हजार ८३४ विद्यार्थ्यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचे ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो’च्या (एनसीआरबी) अहवालातून स्पष्ट झाले आहे. नैराश्यात गेलेल्यांशी योग्य वेळी संवाद साधला, समस्या जाणून घेतल्या तर नक्कीच जीवनाप्रती ओढ निर्माण होते. निर्णयाचा परिणाम जर आपल्याला हवा तसा मिळाला नाही तर त्याला सरळ अपयश म्हणून खचून जाऊ नका. पर्याय अनेक आहेत, त्यावर फोकस ठेवा'', असे मानसोपचारतज्ज्ञ संदीप शिसोदे यांनी नमूद केले.

आत्महत्या हा गुन्हाच

आत्महत्येचा अर्थ:

धर्म आणि न्याय यांनी निषिद्ध मानलेल्या मार्गाने स्वतःच्या मरणास कारण होणे, हेतुपुरस्सर स्वतःचा जीव स्वतः देणे. आत्मघात, आत्मनाश धर्मशास्त्राप्रमाणे पाप असून कायद्याने गुन्हा आहे.

अपेक्षा असू द्या; ओझे नको

मुलांचे करिअर चांगले घडावे अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. त्यासाठी मुलांकडून अपेक्षा ठेवल्या जातात. अपेक्षा ही ओझे ठरू नये, याची पालकांनी खबरदारी घ्यावी. अपेक्षांचे ओझे झाले की, मुलांच्या मनावर दडपण येते. तणावामुळे परीक्षेत आलेले अपयश, कौटुंबिक वातावरण यातून विद्यार्थी टोकाची भूमिका घेतात. मुले दडपणाविषयी कोणाकडे बोलत नाहीत, त्यामुळे अशा गोष्टी घडतात.

‘स्वतःला संपविणे हा कोणत्याही दुःखावरचा उपाय नाही. आत्महत्या केल्याने महापाप लागते अन् आत्महत्या करणाऱ्याला मृत्यूनंतर परलोकात नरकप्राय यातना भोगाव्या लागतात'', असे धर्मग्रंथांमध्ये सांगितलेले आहे. विद्यार्थी आत्महत्येला प्रवृत्त होण्याचे खरे कारण म्हणजे मनाची दुर्बलता. आपल्या धर्मानुसार ध्यानधारणा, जप यासारखी साधना केल्याने मनोबल वाढून जीवनात स्थिरता येऊ शकते. त्यातून आत्महत्येच्या विचारांवर सहज मात करता येते. अशा प्रकारचे प्रयोग अनेक महाविद्यालयांमधून केले जात आहेत. यातून विद्यार्थ्यांना अभ्यासात लाभही झाल्याचे दिसून आले आहे.

जीवनात आपण काहीच करू शकत नाही, ही नकारात्मक वृत्ती मनातून काढून टाकावी. कारण शासनाने सुशिक्षित तरुणांसाठी अनेक योजना सुरू केलेल्या आहेत. त्यांचा लाभ घ्या. स्टार्टअप इंडिया, मुद्रा योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत तरुण, नवउद्योजकांना ५० लाखांपर्यंत कर्ज मिळते. त्यात दहा ते १५ लाखांपर्यंत सबसिडी दिली जाते. मेहनत, जिद्द, चिकाटी, व्यवहार, परतफेडीचा विश्वास दिल्यानंतर बँका अर्थसाहाय्य करतात. त्यामुळे परीक्षेनंतर नोकरी मिळाली नाही, म्हणून हताश होण्यापेक्षा उद्योजक होऊन इतरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा.

आत्महत्या रोखण्यासाठी...

सॉफ्ट स्किल किंवा इमोशनल इंटेलिजन्स वाढवा

वाईट घटनांमधून हळूहळू बाहेर पडण्याची क्षमता वाढविणे

जीवनात आशा कधीही सोडू नये, याबाबत तरूणंना मार्गदर्शन

युवापिढीने बहिर्मुख असावे, जास्तवेळ एकांतात बसू नये

भावनिक बुद्धिमत्ता वाढविणे, निराशा सहन करण्याची क्षमतावाढ

एखादा प्रसंग खूपच मनाला लावून घेऊ नये, जास्त विचार नको

पालकांनी हे करावे...

मुलांची आवड पाहून मोकळिक द्या

दुसऱ्यांच्या मुलांशी तुलना टाळा

मुलांचा आत्मविश्वास वाढवावा

घरी किंवा मित्रांमध्ये किती वेळ देतो, मित्र कसे आहेत यावर सतत लक्ष ठेवा

संवाद वाढवा, त्याचे कौतुक करीत राहा.

मीही झालो होतो नापास...!

प्रिय मित्रा,

हाय, हॅलो! अरे आज तू बारावीत नापास झालास. मनाला फार बोचलं ना रे हे? पण, छोड यार जो हुआँ सो हुआँ. यात अपसेट होण्यासारखं काहीच नाही. का माहितीये; कारण मीही बारावीत नापास झालो होतो. पण, रडत बसलो नाही. लोकांच्या टोमण्याने खचलो नाही. उलट संधी मानून पुन्हा नव्याने तयारी केली. तुला सांगतो मी जेव्हा बारावीच्या परीक्षेत ते नापास झालो; तेव्हा तुझ्याएवढाच होतो. माझं बालपण ग्रामीण भागात गेलं. आताच्या सारखं आम्हाला सहज काहीही उपलब्ध होतं नव्हतं. तालुक्याला जायचे म्हटले वाहन दुर्मिळ असे. पण, मला शिकण्याची जिद्द होती. दहावीनंतर छत्रपती संभाजीनगर शहरात आलो. इथं १९८४ साली बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. आर्थिक परिस्थिती जेमतेम. शहरातलं वातावरण अंगवळणी पडलं नव्हतं. दिवसभर अभ्यास करायचो. कॉलेज संपल्यानंतर मिळेल तिथे काम करायचो. पण, मी कुठेतरी कमी पडलो अन् बारावीत नापास झालो. थोडं वाईट वाटलं. परंतु, पुन्हा उभारी घेण्याचा निश्चय केला. दुकानात, मेडिकलमध्ये नंतर क्लासेसमध्ये काम करून बारावीचा राहिलेला विषय चांगल्या मार्काने सोडवला. त्यानंतर पदवी प्राप्त केले. गरिबी व आर्थिक परिस्थितीमुळे ज्या मुलांना शिक्षण घेता येत नाही, अशांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण संस्था सुरू केली. आज संस्थेतून पहिली ते पदवीपर्यंत शिक्षण दिले जाते. मागासवर्गातील विद्यार्थ्यांसाठी समाज कल्याणमार्फत हॉस्टेल सुरू केले. संस्थेच्या छत्रपती संभाजीनगरसह नाशिकमध्येही शाळा, महाविद्यालये असून, आठ ते दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

तुझाच मित्र

वाल्मिक सुरासे (सचिव, विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ)

बारावीची परीक्षा आणि निकाल म्हणजे त्या वर्षीच्या अभ्यासाचे मूल्यमापन असते. त्या निकालाचा संबंध विद्यार्थ्यांनी जीवनाच्या यश-अपयशाशी जोडू नये. नापास होणे ही एक स्वतःला समृद्ध करण्याची संधी विद्यार्थ्यांनी मानायला हवी. नापास झाल्यानंतर पुरवणी परीक्षेची संधी असते. त्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. बारावीत नापास होऊनही उत्तम करिअर करता येते याची अनेक उदाहरणे आहेत. मी एक छान वाक्य वाचले की, ‘कोणतेही अपयश हे अंतिम नसते, जोपर्यंत तुम्ही प्रयत्न थांबवत नाहीत तो पर्यंत.’ त्यामुळे प्रत्येक वेळी तयारी करून प्रयत्न करा यश नक्कीच तुमचे असेल.

— डॉ. रूपेश चिंतामणराव मोरे, शिक्षण अभ्यासक

जीवनात यश अपयश येतच असते. बारावीची परीक्षा म्हणजे आयुष्याची शेवटची परीक्षा नाही. अनेक उदाहरणे आहेत, जे दहावी, बारावीत नापास झाले. त्यानंतर मेहनत आणि कष्टाच्या जोरावर यशस्वी उद्योजक व क्लासवन अधिकारी झालेले आहेत.

— डॉ. वैशाली जामदार, सचिव, विभागीय शिक्षण मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT