वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर मार्गदर्शक
आनंदासाठी काम की कामातून आनंद हा मूळ प्रश्न. कामासाठी गरजेचे कौशल्य शिकण्याची वृत्ती असणे फार गरजेचे. त्या कौशल्यात काळानुसार, वेळेनुसार, तंत्रज्ञानानुसार बदल करता आल्याशिवाय प्रगती होत नाही. या दरम्यान सहकारी नावाची शत्रू-मित्रांची व बॉस नावाने सतत छळणाऱ्यांची अवतीभोवती ठाणी कायमच मांडलेली असतात. वर्तमानपत्रांमधले महाराष्ट्रातील दिवाळीनंतरचे राजकारण चवीने वाचणारे व चघळणारे आपण सारेच जण वरील प्रत्येक गोष्टीला स्वतःच्या आयुष्यात मात्र पार विसरून जात राहतो. तरीही मला करिअरमध्ये मनाजोगते यश का नाही, यावर चरफडतो. उदाहरणातून थोडेसे विस्ताराने पाहिले तर?
शिकवण्यातील अद्ययावत पद्धती, आयटीमधील नवीन डोमेनचा अभ्यास, इंजिनिअरिंगसाठीचे तंत्रज्ञान, डॉक्टरी कामातील संगणकाचा वापर अन् उपकरणे, कलाक्षेत्रातील व्हीएफएक्सने होत चाललेले बदल हे सारे कौशल्याधारित शिक्षणाची गरज अधोरेखित करतात. मगच कामातून आनंद सुरू होतो. निव्वळ आनंदासाठी जगात काहीच नसते हे कळते, तेव्हा वृद्धत्व सुरू झालेले असते. आवडले नाही तरी हे एक वास्तव नीट लक्षात घ्यायला हवे.
कुटुंबातील आजी-आजोबा किंवा आई-वडील यांपैकी कोणीतरी, कधीतरी बॉस असतोच. खरे तर आई व आजी, बाबा आणि आजोबा यांच्यातील संवाद ऐकणाऱ्याला बॉस नावाची चीज घरातच उलगडत जाते. पण, त्याचा अर्थबोध न घेणारा ऑफिसमधील बॉसवर चिडत राहतो किंवा कुंठत राहतो.
शाळेत थोडीफार तर कॉलेजात नक्कीच मित्रांची टोळी कशी कार्यरत असते, हे अनुभवलेले असते. टोळीयुद्ध खेळणारे अगदी मोजकेच असले, तरी कट्टीबट्टीच्या भाबडेपणातून बाहेर येऊन टोळीच्या संरक्षित गटात शिरूनच बहुसंख्याकांचे शिक्षण संपते.
आता प्रश्न असतो तो या साऱ्या अनुभवांचा, यथायोग्य, समतोल वापर करण्याचा. स्पर्धा, हारजीत, टक्केवारी याला विसरून समोर आलेल्यांचा स्वीकार करतानाच कौशल्यविकास, सहकार्याचा हात पुढे करत, प्रत्येकाचा आदर करत, प्रत्येक कामाबद्दल व ते करणाऱ्याबद्दल माणुसकीच्या नजरेने पाहणारा करिअरमध्ये अत्युच्च यश मिळवतो. खेळातील सुवर्णपदकाइतकाच खेळण्याचा आनंद गरजेचा असतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.