- शुभदा क्षेमकल्याणी
निसर्गोपचारपद्धती शिकूनही उत्तम करिअर करता येऊ शकते. ही एक आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानीप्रमाणेच शासनमान्य उपचारपद्धती असून, कुठलेही रासायनिक औषध न वापरता निसर्गात उपलब्ध असलेल्या विविध नैसर्गिक घटकांच्या साहाय्याने रोगावर उपचार केला जातो. औषधांचे दुष्परिणाम, औषधांच्या न परवडणाऱ्या किमती या पार्श्वभूमीवर आता अनेक लोक निसर्गोपचाराकडे वळत आहेत. मी स्वतः बारा वर्षांपूर्वी हा अभ्यासक्रम पूर्ण केला. मात्र, मी आर्थिकदृष्ट्या अगदी स्वयंपूर्ण आहे. आरोग्यातील बदलही जाणवत आहेत.
महत्त्व
हल्लीच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक लोक पर्यायी उपचारांबद्दल आग्रही आहेत. त्यामुळे या क्षेत्रात प्रचंड वाव आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये अनेकदा आजारी पडल्यावर काय करावे? हे शिकविले जाते. मात्र, या अभ्यासक्रमात आजारी पडूच नये यासाठी काय करावे? हे शिकविले जाते. अशा प्रकारच्या विविध उपचारपद्धतींची, उपायांची माहिती या अभ्यासक्रमात मिळत असल्याने या अभ्यासक्रमाला सध्या मागणी आहे. रुग्णांकडूनही या उपचारपद्धतीची निवड सध्या केली जात आहे.
अभ्यासक्रम
निसर्गोपचारांचा ६ महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पत्राद्वारे घरबसल्याही करता येतो. त्याची फीसुद्धा सर्वांना परवडण्यासारखी आहे. प्रात्यक्षिकांची सोयसुद्धा बऱ्याच ठिकाणी विनामूल्य केली जाते. या अभ्यासक्रमात मसाज, ॲक्युप्रेशर, रसाहार, चुंबकीय उपचार, योग, रेकी, माती, पाण्याचे उपचार इ. अनेक उपचारपद्धती शिकविल्या जातात. विद्यार्थ्यांना छापील नोट्स व पुस्तके देण्यात येतात. यशस्वी विद्यार्थ्यांना ‘सर्टिफिकेट इन नेचरोपॅथी’सारखे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येते.
अभ्यासक्रमानंतर...
निसर्गोपचाराचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर संबंधित व्यक्ती किंवा विद्यार्थी खालील व्यवसाय करू शकतात
निसर्गोपचार - योग केंद्र चालवणे
ॲक्युप्रेशर, मसाज सेंटर चालवणे
चुंबकीय उपकरणांची विक्री करणे
हर्बल ज्यूस सेंटर चालवणे
पौष्टिक खाद्याचा व्यवसाय करणे
नेचरोपॅथिक ब्यूटीपार्लर व नेचरोपॅथी हेल्थ क्लब
आहारविषयक सल्ला केंद्र
काय काळजी घ्याल?
निसर्गोपचाराच्या नावाखाली देशात अनेक ठिकाणी बेकायदा अभ्यासक्रम राबवले जातात. त्यामुळे कोणत्याही संस्थेत प्रवेश घेताना त्या संस्थेची सर्व माहिती तपासून घ्या, योग्य ती चौकशी करा आणि त्या नंतर त्या संस्थेत प्रवेश घ्या.
(लेखिका निसर्गोपचारातील तज्ज्ञ आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.