सांगली : ‘‘जगभरात जायची तयारी ठेवा. प्रगत देशांना भारतातील तंत्रकुशल मनुष्यबळाची गरज आहे,’’ असे मत ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी व्यक्त केले. येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित ‘वालचंद-सकाळ व्याख्यानमाले’त ते बोलत होते. ‘बोल अनुभवाचे’, असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.
महाविद्यालयाचे संचालक डॉ. उदय दबडे, कार्पोरेट रिलेशन ॲल्युमिनाय अँड स्टुडंट करिअर विभागाचे अधिष्ठाता प्रा. संजय धायगुडे, इनोव्हेशन, इंक्युब्युशन अँड ॲंत्रेप्रिनरशीप विभागाचे अधिष्ठाता डॉ. बशीरअहमद मोमीन व्यासपीठावर उपस्थित होते.
‘सकाळ’ने महाविद्यालयास दिलेल्या एक कोटींच्या देणगीतून संशोधन-प्रशिक्षण, व्याख्यानमालेसह उपक्रम राबवले जातात. आज सुमारे दीड तासांच्या संवादात पवार यांनी त्यांच्या जीवनातील अनुभवांचे कथन केले.
ते म्हणाले, ‘‘येत्या काळात केवळ कृत्रिम बुद्धिमत्तेची भांडवली बाजारपेठ १४ ते १५ ट्रिलियनची असेल. त्यातील निम्मे मार्केट बळकावून २०३० पर्यंत अमेरिकेला मात देण्याचा चीन विचार करतो आहे. आपण सगळे मिळून पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट ठेवून महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत आहोत.
जगभरातील प्रगत देश उद्योग-शिक्षण यातील गुंतवणुकीतून त्यांची प्रगती करीत आहेत. आपले लक्ष मात्र दुसरीकडेच आहे. गेली २० वर्षे आम्ही ‘एज्युकॉन’च्या माध्यमातून जगभरातील विविध शिक्षण संस्थांशी विचारांची देवाणघेवाण घडवून आणत आहोत. तेथील विद्यापीठे, महाविद्यालये काय करतात, याकडे आपले लक्ष हवे.
आज आपल्याकडे क्षमता आहे; मात्र तिचा उपयोग करणारी व्यवस्था नाही. आपण सरकारच्या माध्यमातून नव्हे तर तुम्हा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आर्थिक प्रगती करू. सेवा, उद्योग, पुरवठादार देश म्हणून जग आपल्याकडे पाहतेय.
तुम्ही जगात कोठेही जा. तेथे नोकरी करा, उद्योग करा. जगातील अनेक उद्योगांना आपला विस्तार करण्यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. आम्ही मराठा चेंबरच्या वतीने जगभरातील १६ उद्योजकांना भारतातून विस्ताराला वाव मिळवून दिला आहे.’’ इंग्रजीवर प्रभुत्व कसे मिळविले, हे सांगतानाच सामाजिक कार्याचे अनुभवही पवार यांनी मांडले.
संचालक डॉ. दबडे यांनी अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाच्या वाटचालीचा आढावा घेतला. डॉ. मोमीन यांनी आभार मानले. प्रा. नारायण आपटे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी ‘सकाळ’ कोल्हापूर आवृत्तीचे संपादक निखिल पंडितराव उपस्थित होते. ‘सकाळ’च्या ‘यिन’ नेटवर्कच्यावतीने महाविद्यालयात वृक्षारोपण झाले.
कर्तव्य पार पाडताना सबबी सांगू नका
सतत नवे शिकण्याचा, ज्ञान मिळविण्याचा ध्यास ठेवा
२४ बाय ७ तास काम करण्याची तयारी ठेवा
उत्पादनाचा ग्राहक कायम केंद्रस्थानी ठेवा
आलेल्या संकटांना संधी समजून काम करा
ज्या देशात जायचंय, तेथील भाषा आधीच शिका
अनुकरण करू नका, स्वतःचे वेगळेपण जपा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.