Science and technology  sakal
एज्युकेशन जॉब्स

विज्ञानातील ‘मूलभूत’ शास्त्रे

उपयोजित विज्ञानापेक्षा मूलभूत विज्ञानात काम करण्यात एक वेगळी मजा आहे. कोणतेही उपयोजित विज्ञान अथवा तंत्रज्ञान तयार होण्यापूर्वी त्यासंबंधीचे मूलभूत शोध मूलभूत विज्ञानात लागावे लागतात

सकाळ वृत्तसेवा

डॉ. मिलिंद नाईक : प्राचार्य, ज्ञानप्रबोधिनी

बारावी शास्त्र शाखेनंतर अभियांत्रिकी अथवा वैद्यकीय यांसारख्या उपयोजित क्षेत्रात जायचे नसेल, तर मूलभूत विज्ञान शिकण्यासाठी ‘बीएससी’ हा उत्तम पर्याय आहे. सर्वसाधारणपणे तीन वर्षांचा हा अभ्यासक्रम असून, काही विद्यापीठात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, सांख्यिकी, गणित आदी विषयात शेवटच्या वर्षात एकाच विषयाचे सर्व उपविषय शिकून विशेष तज्ज्ञता देणारे, तर काही विद्यापीठात तीन विषयांसह सर्वसाधारण पदवी देणारे अभ्यासक्रम आहेत.

‘बीएससी ऑनर्स’ हा अभ्यासक्रम चार वर्षांचा असतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झाल्यानंतर मुख्य विषय आणि साहाय्यक विषय असे दोन विषय घेऊन पदवी मिळवता येईल. त्यानंतर मुख्य विषयातील उपविषय घेऊन त्या-त्या विषयातील पदव्युत्तर पदवी मिळविता येते.

संशोधन

उपयोजित विज्ञानापेक्षा मूलभूत विज्ञानात काम करण्यात एक वेगळी मजा आहे. कोणतेही उपयोजित विज्ञान अथवा तंत्रज्ञान तयार होण्यापूर्वी त्यासंबंधीचे मूलभूत शोध मूलभूत विज्ञानात लागावे लागतात. बऱ्याच वेळा कोणतेही विशेष कारण नसताना केवळ कुतुहल म्हणून केलेल्या कामातून लागलेल्या शोधातून नंतर तंत्रज्ञान तयार होत जाते. निसर्गाची अथवा निसर्ग नियमांची उकल करण्यासाठी शास्त्रज्ञ काम करत जातात. त्यांच्या मनात या शोधाचा उपयोग करून किती पैसे मिळवता येतील, कुठे उपयोगात येईल, असे व्यावहारिक प्रश्न नसतात.

शास्त्रज्ञ फर्मी यांनी ‘न्युक्लिअर चेन रिॲक्शन’चा शोध लावला, तेव्हा त्यांना कदाचित हे लक्षातदेखील आले नसेल की, ‘ओपनहायमर’ याचा उपयोग अणुबाँब तयार करण्यासाठी करतील. मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधण्याकरिता संशोधन हाच शुद्ध विज्ञानाचा हेतू असतो. त्यामुळे या क्षेत्रात संशोधन करण्यात एक वेगळी मजा असते.

संधी

बीएससी-एमएससी नंतर जसे संशोधन क्षेत्रात जाता येते, तसेच त्यानंतर शिक्षण क्षेत्रात येता येते. बीएससीनंतर बी.एड. करून शालेय स्तरावर शिकवता येते, तर एमएससी नंतर ‘नेट-सेट’ची परीक्षा उत्तीर्ण होऊन महाविद्यालयीन स्तरावर शिकवता येते. याशिवाय बहुतेक सर्व विषयांना उद्योग क्षेत्रातही मागणी आहे. जसे रसायनशास्त्राचे विद्यार्थी औषधे निर्माण कारखान्या रसायने निर्मिती करणाऱ्या कारखान्यात काम करू शकतात.

सूक्ष्मजीवशास्त्राचे विद्यार्थी पॅथॉलॉजी लॅब्स, खाद्यपदार्थ उद्योग, वाइन उद्योग आदी ठिकाणी काम करू शकतात. जरी मूलभूत विज्ञानाचा अभ्यास केलेला असला, तरी उपयोजित क्षेत्रात त्यांचा उपयोग असतोच. अलीकडच्या काळात संगणक, माहिती तंत्रज्ञान, पर्यावरण यांसारख्या उपयोजित विज्ञानातील अनेक शाखाही बीएससी पदवी अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

कौशल्ये

मूलभूत विज्ञानाचा अभ्यास करून पुढे शास्त्रज्ञ, अध्यापक- प्राध्यापक आणि तंत्रज्ञ म्हणूनही काम करता येते. त्यामुळे बारावीनंतर नेमके कोणत्या प्रकारचे काम करायचे, हे निश्चित न करता आलेल्या विद्यार्थ्यांना आणखी काही काळ मिळतो. काही वेळा सध्याच्या परिस्थितीमुळे इंजिनिअरिंगपेक्षा बीएससी सोपे आहे असे वाटू शकते, पण वस्तुतः तसे नाही.

शुद्ध विज्ञानाचा अभ्यास करताना मुळातून प्रश्न विचारता येण्याची क्षमता लागते. त्यासाठी संकल्पना स्पष्ट असणे आणि सूक्ष्मबुद्धी असणे आवश्यक असते. निरीक्षण शक्ती, तर्कविचार, प्रश्नकौशल्य, त्रिमितीय विचार क्षमता, प्रयोगशीलता या किमान क्षमता असणे अपेक्षित आहे.

आव्हाने

मूलभूत संशोधनाने लगेच कोणताही आर्थिक हेतू साध्य होणार नसल्याने संशोधनाला अर्थसाहाय्य मिळण्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. त्यामुळे या प्रकारच्या नोकऱ्याही तुलनेने कमी असतात. मात्र, चांगल्या संशोधकांना मानधनही चांगले मिळते. संशोधन क्षेत्रात चांगले विद्यार्थी यावेत म्हणून शासनाने अनेक शिष्यवृत्ती योजना सुरू केल्या आहेत. संशोधन क्षेत्रात कधी कधी अत्यंत संयम दाखवावा लागतो. इंजिनिअरिंग किंवा वैद्यकीय क्षेत्र उपयोजित क्षेत्र आहे.

त्यामुळे त्यातून उत्पन्न मोठ्या प्रमाणावर मिळत असल्याने त्यांना पगारही चांगला असतो. त्यामानाने बीएससी झालेल्याला पगार कमी मिळतो हे खरे, पण ज्याला नवीन काही शोधायचे आहे, जगाला माहीत नसलेले शोधून काढून ज्ञानात भर घालायची आहे, त्यांनी या क्षेत्रात यायला हवे. अनेक थोर शास्त्रज्ञांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता जे काम केले आहे, त्यामुळे आज आपण समृद्ध आणि सुखकर जीवन जगतो आहोत. शास्त्रज्ञांप्रमाणेच अतिशय चांगल्या शिक्षकांनी नवीन पिढीला घडवले आहे. त्यातूनच नवीन शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि वैद्य निर्माण झाले आहेत, हे विसरून चालणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है'वर राहुल गांधींची मार्मिक टिप्पणी; 'सेफ'मधून अदानी-मोदींचा फोटो काढत केलं 'लक्ष्य'

Maharashtra Weather Update: तापमानात घट, महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार! जाणून घ्या हवामानाची स्थिती

मी बोलायला लागलो, तर घड्याळवाल्यांचा 'कार्यक्रमच' होईल; जयंत पाटलांचा अजितदादा गटाला थेट इशारा

Hypersonic Missile : एका सेकंदात 3.087 KM स्पीड, अर्धा चीन अन् पूर्ण पाकिस्तान रेंजमध्ये, जाणून घ्या भारताच्या नव्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची ताकद

अभिनेत्री कश्मिरा शाहचा भयानक अपघात; रक्ताने माखले कपडे; पोस्ट शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT