पुणे : बारावीनंतर रोजगाराभिमुख अभ्यासक्रम म्हणून बीबीए आणि बीसीएला मी प्राधान्य दिले आहे. मात्र, त्याच्या प्रवेशासाठी सीईटी असल्याचे मला उशिराने समजले. आता अतिरिक्त सीईटी घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, त्यासंदर्भात अजूनही कोणतीच घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे मी संभ्रमात असून, माझ्या करियरच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वाचा आहे. शासनाने लवकर सीईटीची तारीख जाहीर करावी, अशी भावना सुदेश जाधव या विद्यार्थ्याने व्यक्त केली.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) बीबीए, बीसीए, बीएमएस हे अभ्यासक्रम आपल्या अखत्यारीत घेतले आहे. त्यासाठी अतिरिक्त सीईटी घेण्यासाठी शिक्षण संस्थांनी आग्रही मागणी केली. अखेरीस उच्च शिक्षण विभागाच्या निर्देशानंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्यावतीने सीईटी घेण्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, त्याबद्दल अजूनही कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. सीईटीची वाट पाहावी, की समोर असलेल्या पर्यायांचा विचार करत प्रवेश घ्यावा, असा विचार सध्या विद्यार्थी करत आहेत.
१५ जुलैपर्यंत शक्यता
उच्च शिक्षण विभागाने अतिरिक्त सीईटी संदर्भात निर्देश दिले आहे. त्यादृष्टीने सीईटी सेल आवश्यक तयारी करत आहे. साधारणपणे जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यांत सीईटी पार पडेल, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.
सीईटीला उशीर झाला तर शैक्षणिक वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांनी वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला तर बीबीए, बीसीएच्या जागा रिक्त राहतील. लवकर सीईटीची तारीख घोषित करावी.
- डॉ. रवींद्र वैद्य, अध्यक्ष, बीबीए अभ्यास मंडळ, पुणे विद्यापीठ
विद्यार्थ्यांसमोरील आव्हाने
बीबीए, बीसीएसाठी थांबायचे, की पुढे प्रवेश घ्यायचा, याबद्दल संभ्रम
सीईटी झालीच नाही तर करिअरची दिशाच बदलणार
सीईटीसाठी थांबलो आणि ती झालीच नाही तर संपूर्ण वर्ष वाया जाण्याची भीती
इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.