आईवडिलांना वाटले की मुलगी इंजिनिअर किंवा डॉक्‍टर होईल, पण..! Sakal
एज्युकेशन जॉब्स

आईवडिलांना वाटले की मुलगी इंजिनिअर किंवा डॉक्‍टर होईल, पण..!

आईवडिलांना वाटले की मुलगी इंजिनिअर किंवा डॉक्‍टर होईल, पण..!

अक्षय गुंड - सकाळ वृत्तसेवा

एमपीएससीच्या ज्या पदासाठी वडिलांचा विरोध होता, तो झुगारून त्याच पदासाठी प्राधान्याने अर्ज केलेल्या अन्‌ यशस्वी झालेल्या मोहोळच्या पूजा गायकवाड यांची ही यशोगाथा.

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : बारावीनंतर आई-वडिलांना वाटले, की इंजिनिअरिंग (Engineering) किंवा मेडिकल (Medical) करेल; पण त्यांनी कला (Arts) शाखेला प्राधान्य देत सर्वांना आश्‍चर्यचकित करणाऱ्या अन्‌ एमपीएससीच्या (MPSC) ज्या पदासाठी वडिलांचा विरोध होता, तो झुगारून त्याच पदासाठी प्राधान्याने अर्ज केलेल्या अन्‌ यूपीएससीत (UPSC) सतत अपयश येऊन देखील खचून न जाता राज्यसेवेतून पोलिस उपअधीक्षक (Deputy Superintendent of Police) पदाला गवसणी घातलेल्या मोहोळच्या पूजा बाळासाहेब गायकवाड (Pooja Gaikwad). त्यांची ही प्रेरणादायी यशोगाथा (Success Story) तरुणांसाठी प्रेरणास्रोतच आहे.

पूजा गायकवाड यांच्या आईचे जेमतेम सातवीपर्यंत तर वडिलांचे देखील दहावीच्या पुढे शिक्षण झालेले नव्हते. दहावीनंतरचे पुढील शिक्षण घेणाऱ्या घरातील पूजा या पहिल्याच. त्यामुळे आई-वडिलांना वेगळेच कौतुक. त्यात आई-वडिलांच्या आनंदात आणखी भर म्हणजे, लहानपणापासून हुशार असल्याने, गुणवत्तेत अव्वलस्थान कायम होते. प्राथमिक, माध्यमिक शिक्षण घेत असताना शालेय स्पर्धा परीक्षेत सहभाग असायचा. त्या शालेय जीवनात विद्यार्थ्यांना जशी भविष्याच्या दृष्टीने विविध स्वप्ने असतात, तशी पूजा यांनी देखील जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्ने रंगवत होत्या. या पदाबद्दल कसलीही माहिती नव्हती, पण आपण यशस्वी होऊ शकतो, असा एक आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण व्हायचा. त्यामुळे हे ध्येय बाळगून त्या दृष्टीने त्यांचा शैक्षणिक प्रवास सुरू होता. खऱ्या अर्थाने या ध्येयाचा प्रवास सुरू झाला तो दहावी व बारावीच्या परीक्षेतील यशानंतरच.

पूजा गायकवाड या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या दहावी व बारावी या दोन्ही परीक्षेत तालुक्‍यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या होत्या. त्यामुळे कुटुंबीयांसह शिक्षकांच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या. परंतु पुढील शिक्षणाचा त्यांनी घेतलेला निर्णय सर्वांना आश्‍चर्यचकित करणारा असाच होता. बारावीनंतर इंजिनिअरिंग किंवा मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी धडपड करतात, ते पूजा यांना गुणवत्तेच्या जोरावर कोणत्याही कॉलेजला सहजरीत्या मिळत असताना देखीलही, त्यांनी कला शाखेकडे जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय कुणालाच मान्य नव्हता. परंतु त्यांच्या डोक्‍यात एवढेच होते की, कमी कालावधीत स्पर्धा परीक्षेतून अपेक्षित असलेले ध्येय साध्य करायचं. वडिलांचा विश्वास होताच व मुलीने स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, ही आईची तळमळ व प्रेरणा पाठीशी होती. पुण्यातील एसपी कॉलेजला आर्टस्‌ शाखेत प्रवेश घेतला. स्पर्धा परीक्षा करायचं हे तर नक्की होतं, पण मेंटॉर (मार्गदर्शक) कोणीच नव्हते. त्यामुळे स्वतःच मार्गदर्शक होत त्यांनी यूपीएससी, एमपीएससीबाबत माहिती घेऊन, कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. यशस्वी विद्यार्थ्यांच्या व्याख्यानातून अनुभव मिळत गेले. अभ्यासाबरोबर कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रम असो की कॉलेजच्या निवडणुका, अशा विविध उपक्रमांत देखील अग्रकमी सहभाग नोंदवला. शेवटच्या वर्षात असताना कॉलेजमधून विद्यार्थी प्रतिनिधी (जनरल सेक्रेटरी) म्हणून देखील त्यांची निवड झाली होती व त्यावेळेस तेथे काम करताना प्रशासन, सामाजिक व्यवस्था व दुनियादारी याचादेखील अनुभव त्यांना घेता आला.

यूपीएससीच्या तयारीबरोबर 'प्लॅन बी' म्हणून एमपीएससीची देखील तयारी सुरू होती. एकत्र कुटुंब व त्यातील घरातील सर्वात मोठी मुलगी असल्याने सर्वांच्या नजरा पूजा यांच्याकडे लागलेल्या होत्या. त्यात मध्यंतरीच्या काळात घरी लग्नाची देखील चर्चा सुरू झाली होती. पदवीचे शिक्षण पूर्ण होताच, काही वर्षे दिल्लीत तर पुढे पुण्यात पूर्णवेळ अभ्यासासाठी दिला. यूपीएससीच्या सलग पहिल्या व दुसऱ्या प्रयत्नात मुख्य परीक्षापर्यंत मजल मारली; परंतु अपेक्षित यश मिळत नव्हते. या काळातच राज्यसेवेच्या दिलेल्या परीक्षेत पहिल्या प्रयत्नात मुख्याधिकारी म्हणून निवड झाली. परंतु, तीन महिन्यांतच या नोकरीचा राजीनामा देत त्यांनी पुन्हा त्याच जोमाने अभ्यास सुरू ठेवला. तिसऱ्या प्रयत्नातही यूपीएससीत अपयश आल्यानंतर मात्र पूर्णपणे राज्यसेवेच्या परीक्षेसाठी प्रयत्न सुरू केले.

राज्यसेवेच्या परीक्षेचा फॉर्म भरत असताना वडिलांनी पोलिस उपअधीक्षक हे पद सोडून इतर कोणत्याही पदासाठी अर्ज कर, असा सल्ला दिला. त्यामागचा उद्देश होता की, लग्नानंतर मुलींसाठी ही नोकरी व कुटुंब व्यवस्थित सांभाळता येईल की नाही, अशी त्यांच्या मनात शंका होती. परंतु इथे त्यांचा विरोध झुगारून पोलिस उपअधीक्षकसह इतर पदांसाठी अर्ज केला. योग्य नियोजन व अपयशातून शिकण्याची वृत्ती अंगीकृत करत, अनेक अपयशांचा सामना करत राज्यसेवेची दुसऱ्यांदा परीक्षा दिली अन्‌ योगायोगाने वडिलांचा ज्या पदासाठी नकार होता त्याच पदावर निवड झाली. जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न असताना देखील, परिस्थितीनुसार वेळोवेळी निर्णय घेत अपयशाने खचून न जाता, प्रयत्नात सातत्य ठेवत पोलिस उपअधीक्षक पदापर्यंत त्या पोचल्या. सध्या नागपूर ग्रामीणला उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आज ज्या पदासाठी वडिलांचा नकार होता त्याच पदावर पूजा गायकवाड काम करत आहेत. याचा नक्कीच त्यांच्यापेक्षा त्यांच्या वडिलांनाच जास्त अभिमान वाटतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT