कोरोनाने अनेक व्यवसाय-उद्योगधंदे यांना बदलायला भाग पाडले आहे. शिक्षकीपेशा तर आमूलाग्र बदलाच्या वाटेवर येऊन पोचला आहे. अध्ययन आणि अध्यापन या दोन्ही प्रक्रिया कमालीच्या स्थित्यंतरातून जात आहेत. शालेय शिक्षणापासून विद्यापीठीय शिक्षणापर्यंत शिकणे-शिकवण्याची नवीन पद्धती विकसित करून आचरणाची गरज निर्माण झाली आहे. यापूर्वी जगाने कधीही अशा परिस्थितीचा सामना केला नव्हता. कोरोनाने निर्माण केलेले ‘न्यू नॉर्मल’ स्वीकारून पुढे वाटचाल करण्यासाठी प्रयत्नपूर्वक काही बदल, उपाययोजना, सवयी अमलात आणाव्या लागणार आहेत. पूर्वानुभव आणि अभ्यास नसल्यामुळे काय योग्य आणि काय नाही याबाबत कोणालाच ठामपणाने सांगणे कठीण आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षकी पेशाची जबाबदारी तसेच भूमिका महत्त्वाची झाली आहे. प्रत्येक स्तरावरील अध्यापनासाठी वेगवेगळ्या योजना आखाव्या लागणार आहेत. सुरुवातीला ट्रायल आणि एरर या तत्त्वाने नवे मार्ग शोधावे लागणार आहेत. सध्या तरी आभासी वर्ग अर्थात व्हर्च्युअल क्लासरूम, ऑनलाइन लर्निंग हा पर्याय उपयोगात आणला जात आहे. हे शक्य नसलेल्या ठिकाणी त्या-त्या परिसरातील शालेय शिक्षक उपलब्ध वातावरण, परिस्थिती आणि साधन सामग्री यांची सांगड घालून शिक्षणाचा प्रवाह आटणार नाही याची काळजी घेत आहेत. आपण प्रमाणित आभासी शिक्षक होणे गरजेचे का आहे, हे जाणून घेणार आहोत.
‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम-२०२०’च्या मताच्या अनुषंगाने ‘प्रमाणित आभासी शिक्षक’ अभ्यासक्रम करणे का आवश्यक आहे, याची कारणे समजून घेऊ या.
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नव्या गोष्टी आत्मसात करणे.
आभासी शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेले बदल समजून घेऊन स्व-परिवर्तन घडवून आणणे.
न्यू नॉर्मल परिस्थितीची आवश्यकता लक्षात घेऊन स्वत:मधील कौशल्ये प्रभावी आणि परिणामकारक करणे.
माहिती तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करून विषयाचा नेमका तसेच स्पष्ट आशय विद्यार्थ्यांपर्यंत पोचवणे.
अभ्यासक्रम विकसन, ऑनलाइन सूचना, विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग आणि आभासी समुदाय निर्मिती यासाठी उत्तम सवयी व पद्धती कोणत्या, याबाबत जाणून घेणे.
‘आभासी शिक्षक’ म्हणून स्वत:ला प्रमाणित करून घेणे.
अभ्यासक्रमातील घटक
अशा प्रकारच्या अभ्यासक्रमात सर्वसाधारणपणे पुढील घटकांचा समावेश असतो. अध्ययनाची तत्त्वे, अध्यापन-अध्ययनाची नवीन प्रारूपे, वर्गातील अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर, आंतरक्रियांना चालना देणाऱ्या पाठांची निर्मिती करणे, वर्ग अध्यापनात समाज माध्यमांचा उपयोग, प्रत्यक्ष आणि आभासी अध्ययनासाठीची नीती ठरवणे, अभ्यासक्रम विकसन आणि आढावा व मूल्यमापन इत्यादी घटकांविषयी यात मार्गदर्शन करण्यात येते. सध्या हे अभ्यासक्रम प्रामुख्याने उच्च शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांसाठीच उपलब्ध आहेत. आणि ते खासगी संस्थांमार्फत चालवले जात आहेत. प्राथमिक अथवा माध्यमिक शिक्षकांसाठी अजून असे अभ्यासक्रम उपलब्ध झालेले नाहीत. यासाठी नॅशनल कौन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन अशा राष्ट्रीय स्तरावरील संस्थेने पुढाकार घेण्याची गरज आहे. तसेच राज्य पातळीवर डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग अर्थात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था असा अभ्यासक्रम विकसित करून शिक्षकांना प्रशिक्षित करू शकते. बदललेल्या परिस्थितीत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांसाठी अशा प्रकारचा अभ्यासक्रम तयार करून तो सर्व शासकीय आणि खासगी शाळेतल्या शिक्षकांसाठी उपलब्ध करण्याची गरज आहे.
- प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार
(लेखक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.