सराव म्हणजे अभ्यासातील रियाज. एखाद्या गायकाला आपले गाणे सादर करण्यापूर्वी अनेक वेळा तेच तेच गाणे परत परत गाऊन पहावे लागते. मगच त्याचे सादरीकरण एकदम प्रभावी होऊ शकते, तसेच अभ्यासाच्या बाबतीतही आहे. सराव करणे याचा अर्थ तालीम करणे, मेहनत घेणे असे सांगितले जाते. म्हणूनच अभ्यासाचा महत्त्वाचा भाग म्हणून एखादी गोष्ट परत परत करून पाहिली पाहिजे. अभ्यास, त्यातील आशय ही सवयीची बाब बनली पाहिजे. ते अंगवळणी पडले पाहिजे. सराव असा हवा की ज्याचे पर्यवसान रोजच्या रीतीमध्ये होऊन जाते, तो एक शिरस्ता बनून जातो. सरावाचे रूपांतर वृत्तीमध्ये कधी झाले, तो एक पायंडा कसा झाला हेदेखील नैसर्गिकपणे घडून जाते. एक नित्यक्रम, परिपाठ म्हणजेच आपल्याला अपेक्षित असलेला अभ्यासातील सराव.
असे म्हणतात की सर्व अभ्यास हा स्वतःला सवय लावण्याचा भाग आहे. सराव करून आपण आपल्या मनाला एक प्रकारची विचारांची सवय लावतो. ती अंगवळणी पडण्यासाठी सरावाची गरज असते. अशी सवय लावणे इतर करमणुकीच्या बाबींपेक्षा वेगळी असते, तसेच हा सराव यांत्रिकपण नसावा. त्यात वेगळेपणा आणायला हवा. यातूनच सरावात येणारा कंटाळवाणेपणा टाळता येण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळेस कामातील बदल हीच विश्रांती समजून सराव केल्यास फायद्याचे ठरू शकते.
सराव हा अनेक प्रकारचा असू शकतो. सातत्याने करावयाचे वाचन, लेखन, तेच तेच प्रश्न सोडवण्याचा सराव, तीच तीच आकृती परत परत काढण्याचा, एखाद्या विषयावर परत परत बोलण्याचा सराव, असा कोणताही भाग सरावात येऊ शकतो. सरावात सातत्य राखणे गरजेचे असते. आवश्यक अशा अध्ययन अनुभवाबाबत पुनरावृत्ती करत राहण्याने अभ्यास पक्का व्हायला मदत होते.
वाचनाचा सराव करताना मनात वेगवेगळे हेतू ठेवून वाचल्यास तेच तेच वाचायचा कंटाळा येत नाही. वाचताना कधीतरी प्रगटपणे वाचन केले तर जास्त चांगला सराव होऊ शकतो.
लेखनाचा सराव करताना एखादे उत्तर परत परत लिहून काढावे. अगोदरच्या झालेल्या चुका टाळून हे लेखन करणे आवश्यक आहे. प्रत्येक सरावात काहीतरी वेगळेपणा आणण्याचा आवर्जून प्रयत्न करावा.
आठवून पाहण्याचा सराव हा परीक्षेच्या दृष्टीने फायद्याचा ठरू शकतो. केवळ मनन आणि चिंतनातून बराच अभ्यास साध्य होऊ शकतो. प्रश्न सोडवण्याचा सराव हा परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरतो. उत्तराचे लेखन करताना ते पूर्वीपेक्षा जास्त चांगले कसे होईल याचा प्रयत्न करायला हवा. सराव अर्थपूर्ण असावा, केवळ यांत्रिक नसावा.सराव करताना काय काळजी घ्यायची हे जाणून घेणे महत्त्वाचेच आहे. कोणत्याही प्रकारचा सराव करताना तो नेहमी उपलब्ध वेळेच्या पार्श्वभूमीवरच करावा. प्रत्येक कामाला आपल्यापाशी किती वेळ उपलब्ध आहे हे जाणूनच हा सराव असावा, तरच सराव हा अभ्यासाचा प्रकार उपयुक्त ठरू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.