- इंद्रनील चितळे
‘फूड टेक्नॉलॉजी’मध्ये सुरुवातीची गुंतवणूक अधिक करावी लागत असल्याने स्टार्टअप कमी आहेत. परंतु बायो किंवा नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित स्टार्टअपला जगभरात मोठा वाव आहे. त्यात चांगले संशोधन, पेटंट करू शकल्यास त्यात फूड इंडस्ट्रीज स्वत- गुंतवणूक करण्यास तयार होतात. त्यामुळे मूल्यवर्धित स्टार्टअप करण्यासाठी फूड इंडस्ट्रीमध्ये वाव आहे.
महाराष्ट्रात छोटे शेतकरी अनेकविध प्रयोग करीत आहेत. नवीन तंत्रज्ञान आणि मार्केटिंगची तंत्र शिकून छोट्या व्यावसायिकांनी एकत्रित व्यवसाय करण्यावर भर द्यायला हवा. गावोगावच्या छोट्या दूध उत्पादकांना व्यवसाय वाढवायचा असल्यास एकत्र येऊन एकाच प्रकारच्या वस्तू बनवायला हव्यात. जागतिक बाजारपेठ मिळविण्यासाठी त्या दर्जाचे उत्पादन करायला हवे.
युक्रेनच्या युद्धानंतर भारतातून मोठ्या प्रमाणावर मैदा निर्यात होतो. अख्ख्या युरोपला पूर्वी युक्रेन मैदा पुरवत होते. आज युरोपमध्ये दूध कमी पडत आहे, परंतु ते आपल्याला देता येत नाही. हा पुरवठा करायचा असल्यास आपल्याला दुधाचा दर्जा सुधारावी लागेल. त्यासाठी जनावरांना दिली जाणारी प्रतिजैविके, औषधे कमी करावी लागतील, चांगला चारा द्यावा लागेल.
याशिवाय जनावरांपासून मिळणाऱ्या दुधाचे उत्पादनही वाढवावे लागेल. आपल्या गाई तीन ते चार लिटरच दूध देतात. त्यात वाढ व्हायला हवी. आपल्याच गाई ब्राझीलमध्ये वीस लिटर दूध देतात. आपल्याकडे दुप्पट उत्पादन झाले तरीही एकूण उत्पादनात मोठी वाढ होईल. तसे झाल्यास उच्च दर्जाचे दूध आपल्याला निर्यात करता येईल. यासाठी समूह किंवा क्षेत्र म्हणून एकत्रितपणे विचार करावा लागेल.
असे केल्यास कोणतेही उत्पादन तुम्हाला जगभरात विकणे शक्य होते. चीनने त्यांची उत्पादने जगभरात याच पद्धतीने विकली. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील दूध चीनमध्ये जाते, चीनमधील दूध न्यूझिलंडसारख्या अवघड ठिकाणी जाते, युरोपला जाते परंतु भारतातील जात नाही. यासाठी आपल्याला दुधाचा दर्जा आणि उत्पादन या दोन्ही बाबींवर काम करावे लागेल.
त्याबरोबरच दुधापासून बनवलेले इतर पदार्थही बाहेर जायला हवेत. उच्च दर्जाच्या उत्पादनांना जगात बाजारपेठ नक्की आहे. छोट्या उत्पादकांनी जगाला काय हवं आहे याचा विचार करून ते देण्यासाठी प्रयत्न करावा. सरकारकडून यासाठी मिळणारे सर्व प्रकारचे मार्गदर्शन घ्यायला हवे.
आपली उत्पादकता वाढण्यावर भर द्यायला हवा. जादा दूध उत्पादन होईल, तेव्हा चुकीचे प्रकारही बंद होतील. उत्पादन वाढले की प्रक्रिया केलेल्या पदार्थांकडे आपण वळू, त्यातून सहाजिकच नवी बाजारपेठ मिळेल.
आम्ही चितळे बंधू यापूर्वी ८० टक्के केवळ दूधच विकत होतो. आता तो धंदा वाढला असला तरी जवळजवळ ४५ टक्के दुधापासून श्रीखंड, दही, ताक, गुलाबजाम मिक्स असे वेगवेगळे पदार्थ बनवतो. दूध तर लागणारच आहे परंतु या प्रक्रिया केलेल्या पदार्थांमुळे मोठी बाजारपेठ मिळते. हीच गोष्ट लक्षात घ्यावी.
आपले उत्पादन देशात आणि जगभरात विकण्यासाठी पॅकेजिंगवरही भर द्यावा लागेल. चांगल्या दर्जाचे पॅकेजिंग असल्यास उत्पादन चांगल्या पद्धतीने टिकते. जगभरात आपले उत्पादन विकण्यासाठी मार्केटिंगवरच भर द्यावा लागतो. यासाठी केंद्र सरकार मदत करीत असते, त्याचा उपयोगही करून घ्यावा.
युरोप, अमेरिकेत भारतीय मॉलमध्येच नाही तर ग्लोबल मॉलमध्ये आपला माल सहज विकला जावा, यासाठीही सातत्याने ब्रॅण्डिंग करणे आवश्यक असते. त्यासाठीच एकत्रित येऊन आपले पदार्थ जगभरात कसे जातील याचा विचार नवउद्योजकांनी करावा.
(लेखक ‘चितळे उद्योग’समूहाचे व्यवस्थापकीय भागीदार आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.