पिंपरी : कोरोनाच्या (corona) पार्श्वभूमीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे दहावीनंतर स्थलांतर, ढासळलेली आर्थिक परिस्थितीचा परिणाम आयटीआय प्रवेश प्रक्रियेवर झाला आहे. परिणामी मागील वर्षीच्या तुलनेत शासकीय आणि खासगी आयटीआयमध्ये उपलब्ध जागा आणि अर्ज नोंदणीच्या तुलनेत यंदा अर्जनोंदणीत घट झाली आहे. अर्जनोंदणी वाढविण्यासाठी आता आयटीआयला ‘प्रवेश प्रोत्साहन अभियान’ चा आधार घ्यावा लागणार आहे.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने शासकीय, खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. शहरात शासकीय, महापालिका व खासगी पाच आयटीआय आहेत. यंदा दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी १५ जुलैपासूनच आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली होती. प्रवेश अर्ज नोंदणीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत आहे. शहरात मागील वर्षी आयटीआयसाठी ५ हजार २१८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदा अर्ज निश्चिती करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अद्याप कमीच आहे. यंदा दहावीच्या निकालाचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आयटीआय प्रवेशासाठी अर्जात वाढ होईल अशी शक्यता होती. एक महिना उलटून गेला तरी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून अल्पप्रतिसाद मिळाला आहे.
डिप्लोमाकडे पावले
यावर्षींचा मूल्यमापन पद्धतीनुसार दहावी-बारावीचा निकाल जाहीर झाला. यात विद्यार्थ्यांना भरघोस गुण मिळाले. यामुळे विद्यार्थ्यांनी डिप्लोमा अभ्यासक्रमाकडे पावले वळविली आहेत. दुसरीकडे आयटीआयमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असतात. कोरोनामुळे या विद्यार्थ्याचे पालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. खासगी आयटीआयमधील शुल्क भरणे, हे पालकांना शक्य नाही. त्यामुळे डिप्लोमाचे कमी शुल्क असल्याने विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांना पसंती दिली. कोरोनामुळे या विद्यार्थ्याचे पालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर पुढील आठ ते नऊ दिवसांत अर्जनोंदणीची संख्या वाढावी, आयटीआय प्रवेश शंभर टक्के पूर्ण व्हावेत, यासाठी सर्व आयटीआय संस्थांमध्ये ‘प्रवेश प्रोत्साहन अभियान’ राबविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयटीआय प्राचार्य शशिकांत पाटील यांनी दिली.
असा करणार प्रचार
या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व प्रादेशिक आयटीआय कार्यालयांच्या सहसंचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. या अभियानांतर्गत सर्व ग्रामीण व दुर्गम भागात आयटीआय प्रवेशाबाबतची माहिती उपलब्ध करून देणे, स्थानिक प्रसार माध्यमांचा तसेच सामाजिक प्रसार माध्यमाचा वापर करून आयटीआयमधील व्यावसायिक अभ्यासक्रम, त्यातून उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी याची इत्थंभूत माहिती प्रवेशास इच्छुक उमेदवाराला देणे आणि मार्गदर्शन करणे याचा समावेश करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शहरातील आयटीआय स्थिती
आयटीआय - प्रवेश क्षमता
शासकीय आयटीआय - ५३२
खासगी आयटीआय - १५३०
महापालिका आयटीआय -६५०
‘‘कोरोनामुळे आयटीआय प्रवेश प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. आता पालकांसह विद्यार्थ्यांचा प्रवेश प्रक्रियेत सहभाग वाढविण्यासाठी अभ्यासक्रमाचा व्हिडिओ तयार करून जनजागृती केली जात आहे. ’’
-कमलेश पवार, गटनिदेशक, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था निगडी
विद्यार्थी म्हणतात
‘‘आयटीआयला प्रवेश घ्यायचा असल्याने तूर्त ऑनलाइन नोंदणी केली आहे. सध्या अकरावी प्रवेशासाठी प्रयत्न सुरू आहेत. पसंतीचे महाविद्यालय मिळाले नाही तर शासकीय आयटीआयमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न करणार आहे.’’
- शिवराज शितोळे, विद्यार्थी.
‘‘अकरावी आणि आयटीआय दोन्हीसाठी अर्ज करण्याचा विचार सुरू आहे. आयटीआयचे मुदत अद्याप संपली नसल्याने तो पर्याय ही खुला ठेवणार आहे.’’
-सुरेश खाडे, विद्यार्थी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.