- डॉ. मिलिंद नाईक
अचूक आत्मपरीक्षण करणे ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. आत्मपरीक्षणाची कितीही तीव्र इच्छा असली, तरी परीक्षण करण्यासाठी आवश्यक ती स्वतःबद्दलची अशी माहिती आपल्या स्वतःकडे असतेच असे नाही.
त्यासाठी इतरांची मदत घेणे आवश्यक ठरते. ‘जो-हॅरी खिडक्या’ हे असे एक तंत्र आहे की, ज्यातून आपल्याला आपल्याबद्दलची अधिकची व इतरांबरोबरच्या संबंधांची माहिती मिळते.
जो-हॅरी खिडक्या हे तंत्र मानसशास्त्रज्ञ जोसेफ लुफ्ट (१९१६-२०१४) आणि हॅरिंग्टन इंगहॅम (१९१६-१९९५) यांनी सुमारे सत्तर वर्षांपूर्वी साधारणतः 1955 मध्ये तयार केले होते. हे मुख्यतः स्वयं-मदत गट आणि कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये परीक्षणाचे तंत्र म्हणून आजही वापरले जाते.
लुफ्ट आणि इंगहॅम यांनी त्यांच्या पहिल्या नावाचा वापर करून त्यांच्या प्रतिमानाला ‘जो-हॅरी’ असे नाव दिले. आपली स्वतःची प्रतिमा जी आपल्या मनात असते आणि लोकांना ती जशी दिसते यातील फरक ओळखण्यास हे तंत्र खूप मदत करते.
म्हणूनच त्याचा वस्तुनिष्ठ आत्मपरीक्षण करण्यास उपयोग होतो. एवढेच नाही, तर आपल्याबद्दलच्या ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत, त्याही आपल्याला अवगत होण्यास या तंत्राचा उपयोग होतो. यात ४ चौकोन अभिप्रेत असून, प्रत्येक चौकोनास एक नाव दिले आहे.
खिडकी क्रमांक १ (I know, You know) मध्ये ज्या गोष्टी अत्यंत पारदर्शक आहेत त्या येतात. म्हणजेच ज्या गोष्टी मलाही माझ्याबद्दलच्या माहीत आहेत व इतरांना म्हणजेच माझ्या मित्रांना, परिवारातील सदस्यांना अथवा अन्य सदस्य, जिथे कुठे आपला वावर असतो अशा सर्वांनाच माहीत आहेत, त्या गोष्टी इथे लिहायच्या असतात.
खिडकी क्रमांक २ (I don’t know, You know) मध्ये ज्या गोष्टी इतरांना माहिती आहेत, ज्या त्यांच्याकडूनच आपल्याला कळाल्या, पण आपल्याला माहिती नव्हत्या अशा गोष्टी लिहायच्या असतात, तर खिडकी क्रमांक ३ (I know, You don’t know) मध्ये ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, पण इतरांना माहिती नाहीत, ज्या इतरांपासून दडवल्या आहेत अशा गोष्टी लिहावयाच्या असतात.
खिडकी क्रमांक ४ (I don’t know, You don’t know) मध्ये ज्या गोष्टी कोणालाच माहीत नाहीयेत, अज्ञात आहेत अशा गोष्टी लिहिणे अपेक्षित असते. त्या सर्वांनाच अज्ञात आहेत. त्या कोणालाच माहिती नसल्यामुळे ती खिडकी तूर्तास रिकामीच राहते.
पहिल्या तीन खिडक्यांमधील माहिती भरण्यासाठी स्वतःचे निरीक्षण करता करता आपल्याला ओळखणाऱ्या इतर अनेक सदस्यांशी गप्पा मारायला हव्यात. त्यांच्याकडून आपल्याबद्दलची अधिकची माहिती मिळवायला हवी. तसेच ती मिळवता मिळवता आपल्याला आपल्याबद्दलची जी माहिती आहे, ती तपासून बघायला हवी.
म्हणजे आपल्या स्वतःबद्दलची आपली माहिती व इतरांना आपल्याबद्दल जे वाटत आहे ती माहिती यातील फरक समजून घेऊन क्रमांक ३ ची खिडकी भरता येते. हे करत असताना इतरांकडून आपल्याबद्दलची माहिती मिळावायला अजिबात लाजू नका. एखादी आपल्याला न पटणारी गोष्ट जरी आपल्याला कळाली तरी ती नाकारू नका, खुल्या मनाने ती स्वीकारा.
सर्वांत आदर्श स्थिती म्हणजे खिडकी क्रमांक १ मध्ये सर्वांत जास्त गोष्टी असणे. यात जितक्या गोष्टी अधिक तितके व्यक्तिमत्त्व पारदर्शक! जितके व्यक्तिमत्त्व पारदर्शक तितके निर्णय अचूक ठरण्याची शक्यता जास्त व आत्मविश्वास जास्त.
त्यामुळे त्याकडे प्रवास करण्याचा प्रयत्न करायला हवा. मात्र, खरी अडचण आहे ती खिडकी क्रमांक ४ ची ! ज्यात आपल्याबद्दल कोणालाच माहिती नाहीये. ना मला न इतरांना! ती माहिती मिळवायची आहे.
सध्या सगळंच अज्ञात ! आता ही माहिती उलगडण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आज अज्ञात असलेली माहिती काही काळाने उलगडली जाऊन खिडकी क्रमांक १ मध्ये भर पडू शकते व पारदर्शकता वाढू शकते. त्यासाठी काय करावे लागेल हे आपण पुढील भागात पाहूया!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.