पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- २०२१ राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवरील १०९८ उपकेंद्रांवर घेण्यात आली. ही परीक्षा सुरळीत पार पडली असून राज्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान, पेपर वेळ खाऊ व अवघड असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. (MPSC Exam Upates)
कोरोनामुळे तसेच वयोमर्यादा सवलतीमुळे वेळापत्रकानुसार होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे परीक्षा वेळेवर होत नसल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. इतर परीक्षांप्रमाणे संयुक्त पूर्व परीक्षा ही पुढे जाणार का, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला होता. मात्र लॉकडाऊन नंतर एमपीएससीने जाहीर केलेल्या नियोजित वेळापत्रकानुसार ही परीक्षा पार पडल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- २०२१ या परीक्षेद्वारे सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक या संवर्गातील १०८५ पदांकरीता भरती होणार आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातील १०९८ परीक्षा केंद्रांवर ३ लाख ६२ हजार ३१९ उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. या पूर्व परीक्षेचा निकाल एप्रिल महिन्यात जाहीर होणार असून, मुख्य परीक्षा ९, १७, २४, ३१ जुलै रोजी होणार आहे. असे एमपीएससीच्या संभाव्य वेळापत्रकात माहिती देण्यात आली आहे.
परीक्षा वेळेवर सुरु झाली. कोणताही गोंधळ दिसून आला नाही. मात्र पेपर वेळखाऊ आणि अवघड होता. तरी सुद्धा पेपर छान गेला आहे. सर्वच विद्यार्थ्यांना पेपर अवघड गेला अशी चर्चा आहे. आता किती गुणांचा कट ऑफ लागेल याची चर्चा रंगली आहे.
-अमिर मुजावर, परीक्षार्थी
परीक्षा केंद्रांवरील नियोजन उत्तम होते. वेळेतच पेपर दिला आणि घेतलाही गेला. शंकेला कोठेही वाव नव्हता. परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार पार पडली याचा आनंद आहे. एक तासाच्या वेळेच्या मानाने पेपर खुपच वेळ खाऊ वाटला. २०१९ च्या परीक्षेच्या तुलनेत हा पेपर अवघड होता.
- सचिन लेंढवे,/ स्वप्निल जोशी, परीक्षार्थी
पुण्यातील परीक्षा केंद्रांना एमपीएससीच्या अध्यक्षांनी दिली अचानक भेट
पुण्यातील विमलाबाई गरवारे प्रशाळा आणि एसएनडीटी महाविद्यालय या दोन परीक्षा केंद्रांना अचानक भेट देऊन पाहणी केली. राज्यातील सर्व केंद्रांवर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- २०२१ सुरळीतपणे पार पडली आहे. एमपीएससीच्या परीक्षा आणि सरळसेवा भरती प्रक्रियेला गती देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.
- किशोर राजेनिंबाळकर, अध्यक्ष, एमपीएससी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.