ग्रोइंग माइंड्स
प्रांजल गुंदेशा,संस्थापक, द इंटेलिजन्स प्लस
आपण शाळेत शिकलेल्या गोष्टी किंवा इतरही काही अभ्यासाच्या गोष्टी लवकर का विसरतो? याचे उत्तर आपल्याला माहिती टिकवून ठेवण्यासाठी मेंदूला कशा प्रकारे तयार करण्यात आले आहे, हे समजून घेतल्यास मिळते. आपण रोज गोळा करत असलेली बहुतेक माहिती किंवा एखाद्या पद्धतीचा ‘डेटा’ हाताळतो आणि तो तत्काळ विसरतो. अंदाजे २० ते ३० सेकंदांसाठी ही माहिती आपल्या मेंदूत राखून ठेवली जाते. या बुद्घीला ‘वर्किंग मेमरी (कार्यरत बुद्धी) असे म्हणतात. उदा. गणना करताना एखादा क्रमांक लक्षात ठेवणं किंवा एखाद्याचा मोबाइल नंबर लक्षात ठेवून थोड्या वेळात तो लिहिणं इत्यादी.
भावनिक अनुभवांशी संबंधित असलेल्या गोष्टी, प्रासंगिक घटना आणि विविध विषयाशी संबंधित असलेले ज्ञान यावर आधारित गोष्टी अल्पकाळासाठी आपल्या स्मृतीत राहतात. हा वेळ थोड्या दिवसांचा असू शकेल. मात्र, बऱ्यापैकी माहिती झपाट्याने नष्ट होत असते. जोपर्यंत आपण ती माहिती आणखी कोणाला मोठ्याने सांगत नाही किंवा मनातल्या मनात तिचा पुनरुच्चार करीत नाही, तोवर ती आपल्या स्मृतीत फार काळ राहत नाही. जर आपण ती दीर्घकाळ लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला, तर ती राहू शकते. मग अशा प्रकारची उजळणी करण्यासाठीची सर्वोत्तम प्रक्रिया किंवा धोरण कोणते आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? चला, जाणून घेऊया.
उजळणीच्या पद्धती
विशिष्ट अंतर ठेवून माहितीची उजळणी करणे ही सामग्रीचे पुनरावलोकन करण्याची एक पद्धत आहे. शिकण्याच्या प्रक्रियेच्या सुरुवातीला, मध्य भागात विशिष्ट अंतर ठेवले जाते. उदाहरणार्थ, सुरुवातीला त्याच आठवड्यात पुन्हा पुन्हा पुनरावलोकन करावे. त्यानंतर एका आठवडा किंवा एक महिन्याचा कालावधी वाढवून त्यानंतर पुनरावलोकन करावे. यामुळे ती माहिती आपल्याला दीर्घकालीन स्मृतीमध्ये टिकवून ठेवण्यास मदत करते. अंतराची पुनरावृत्ती अनेक प्रकारे ‘क्रॅमिंग’च्या उलट आहे. कमी कालावधीत माहिती आत्मसात करण्याचा प्रयत्न केल्यास ती पटकन विसरली जाते. याउलट ठरावीक अंतराने उजळणी करत राहिल्यास कोणतीही नवीन माहिती दीर्घ काळ टिकवून ठेवता येते. उदाहरणार्थ, तुम्ही सेमिस्टरच्या पहिल्या आठवड्यात पाठ्यपुस्तकातील धड्यातून काही शिकलात आणि ती तुम्हाला दीर्घ काळ लक्षात ठेवायचे आहे, तर तुम्ही सेमिस्टरच्या दुसऱ्या, चौथ्या, आठव्या आणि शेवटच्या आठवड्यात त्याची पुन्हा एकदा उजळणी करा. त्यामुळे ते तुमच्या दीर्घकालीन स्मृतीमध्ये जमा होईल.
अंतराची पुनरावृत्ती प्रभावी का?
एकाच अभ्यास सत्रात (सेमिस्टरमध्ये) आपण वाचलेली माहिती पुन्हा पुन्हा वाचण्यापेक्षा ठरावीक अंतराने आपण त्या माहितीचे पुनरावलोकन केले, तर ते प्रभावी ठरते. त्यामुळे आपल्या मेंदूलादेखील त्या प्रक्रियेची सवय होते. अंतराच्या पुनरावृत्तीमुळे आत्मसात केलेली माहिती पुन्हा पुन्हा आठवणे सोपे होते. तसेच, मध्येच एखादा तपशील आपण विसरलो, तर ती मेंदतून निसटून जाणारी माहिती टिकवून ठेवण्यासाठीदेखील या पद्धतीचा अधिक लाभ होतो.
उजळणी किती वेळा करावी?
प्रत्येक व्यक्तीची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता, शिकण्याची आणि गोष्टी टिपून घेण्याची पद्धत, स्मृतितंत्राचा अभ्यास, त्यातील स्वारस्य आणि प्रासंगिकता वेगळी असते. त्यामुळे रिव्हिजन करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. मात्र, माझ्या अनुभवातून मी एक पद्धत तुमच्यासमोर मांडते आहे. तिचा वापर करून तुम्हालाही फायदा होऊ शकतो. ती पद्धत म्हणजे -
१:१:१:१:१ चे मध्यांतर किंवा अंतराच्या पुनरावृत्तीचे ‘फाइव्ह वन’ धोरण
जेव्हा तुम्ही पहिल्यांदा काही तरी नवीन शिकता, तेव्हा उजळणी/पुनरावृत्ती कशा प्रकारे करावी हे पाहूया.
पहिला दिवस : २४ तासांच्या आत म्हणजे. त्याच किंवा दुसऱ्या दिवशी उजळणी करा.
पहिल्या आठवड्याच्या आत : पहिल्या उजळणीपासून ३-४ दिवसांनी पुन्हा एकदा वाचा.
पहिल्या महिन्याच्या आत : त्या महिन्याच्या आत, म्हणजे साधारण तिसऱ्या आठवड्यात वाचा.
पहिल्या तिमाहीत : पहिल्या महिन्यापासून ३ महिन्यांच्या आत तीच माहिती पुन्हा वाचा.
एका वर्षाच्या आत : वर्ष संपण्यापूर्वी संपूर्ण माहिती आणखी एकदा वाचा.
ही प्रक्रिया लक्षात ठेवण्यास सोपी आहे आणि अंमलात आणणंही सोपं आहे. यामध्ये शिकणाऱ्या वयोगटानुसार थोडे फार बदल करता येतात. अंतराची पुनरावृत्ती आणि पूर्वीच्या लेखांमध्ये चर्चा केलेल्या प्रभावी अध्यापन शिक्षणपद्धतींचा वापर केला, तसेच बुद्धिमत्ता प्रशिक्षण पद्धतीचा वापर केल्यास लक्षणीय फायदा दिसून येतो. ही मेंदूवर आधारित प्रक्रिया असल्याने शालेय किंवा उच्च शिक्षणातील प्रत्येक मुलाने या गोष्टीचा वापर केला पाहिजे. मेंदूच्या विकासाच्या क्रियांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इन्स्टाग्रामवर pranjal_gundesh पेजला किंवा TheIntelligencePlus या यू-ट्यूब चॅनेलला भेट द्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.