NEET Exam Result sakal
एज्युकेशन जॉब्स

NEET Exam Result : ‘नीट’ परीक्षेची चौकशी करणार

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा ‘एनईईटी-यूजी २०२४’च्या निकालांवरून उद्‍भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सरकारने चौकशी समिती नेमण्याची घोषणा आज केली. या परीक्षेच्या निकालात गडबड गोंधळ झाल्याच्या आरोपांनंतर फेरपरीक्षेची मागणी सुरू झाली आहे. मात्र, फेरपरीक्षा होणार नसल्याचेही सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले.

देशभरातील ५५७ शहरांमध्ये आणि परदेशातील १४ शहरांमध्ये ‘एनईईटी यूजी’ परीक्षा ५ मे रोजी झाली होती. तब्बल २४ लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. या परीक्षेचे पेपर फुटल्याचेही आरोप झाले होते. ४ जूनला ‘एनईईटी यूजी’चा निकाल जाहीर झाला. त्यात ६७ उमेदवारांचा देशात पहिला क्रमांक आला. मात्र गुण देताना अनियमितता झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता.

या पार्श्वभूमीवर दिल्लीतील राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या कार्यालयामध्ये उच्चशिक्षण सचिव के. संजय मूर्ती, राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे (एनडीए) महासंचालक सुबोधकुमार सिंह यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सरकारची भूमिका मांडली. ‘एनईईटी’ परीक्षा पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने झाली असल्याचा दावा सुबोधकुमार सिंह यांनी केला, तर उच्चशिक्षण सचिव मूर्ती यांनी सांगितले की, ‘‘एनईईटी प्रवेश परीक्षेतील अनियमिततेची बाब केवळ सहा केंद्र आणि १६०० उमेदवारांपुरतीच मर्यादित आहे. यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करून आढावा घेतला.

आता पुन्हा एक नवीन उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या तज्ज्ञ समितीमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष आणि अन्य शिक्षण तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती आधीच्या समितीने सादर केलेल्या अहवालाचे अध्ययन करेल आणि आठवडाभरात समितीतर्फे अभिप्राय देईल. त्याआधारे सरकारतर्फे निर्णय करण्यात येईल.’’

एका केंद्रातून सहा जण गुणवत्ता यादीत आले असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना उच्च शिक्षण सचिव म्हणाले, त्या केंद्राचे सरासरी गुण २३५ होते. याचाच अर्थ उच्च गुण मिळवू शकणारे अनेक सक्षम विद्यार्थी होते, त्यामुळे अतिरिक्त गुण नसतानाही त्यांचे सरासरी गुण जास्त होते. अर्थात, ज्या केंद्रांमध्ये अनियमितता झाली आहे त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

सोबतच, फेरपरीक्षा होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाण्याच्या निकषावर भरपाईसाठी गुण देण्यात आले आहेत. ही बाब केवळ सहा केंद्रांशी आणि १६०० विद्यार्थ्यांशी संबंधित आहे. त्यामुळे उच्चस्तरीय समितीचा निर्णय याच समूहाशी निगडित असेल. अन्य विद्यार्थ्यांवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. फेरपरीक्षेची गरज भासल्यास ती केवळ याच सहा केंद्रांवर होईल, असेही स्पष्ट संकेत उच्चशिक्षण सचिव के. संजय मूर्ती यांनी दिले.

एनईईटी परीक्षेमध्ये १५६३ उमेदवारांना अतिरिक्त गुण (ग्रेस मार्क्स) मिळाले आहेत. त्यापैकी ७९० उमेदवार सवलतीच्या गुणांनी पात्र ठरले आहेत. उर्वरित सर्वांचे गुण एकतर उणे (निगेटिव्ह) राहिले किंवा ते उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. एकुणातच काही फरक पडलेला नाही.

- के. संजय मूर्ती,

उच्च शिक्षण सचिव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT