School and Student esakal
एज्युकेशन जॉब्स

मूलं शाळेतून पळून जायला लागली, तर त्याचे गंभीर परिणाम जीवनात होतात; मुलांचे शाळेतून पळून जाणे कसे रोखावे?

सकाळ डिजिटल टीम

मुलांचा शारीरिक, मानसिक किंवा लैंगिक छळ होत असेल किंवा आई-वडिलांचे मुलांकडे पुरेसे लक्ष नसल्यास मुलं शाळा बुडवतात.

-श्रुतिका कोतकुंडे, सजग स्वास्थ्य क्लिनिक, चिपळूण

sajagclinic@gmail.com

संतोषची आई सांगत होती शाळेतून तक्रार आली होती की, संतोष शाळेमध्ये खूप खाडे करत असे व त्याचा गृहपाठ कधीच पूर्ण नसे. संतोषची आई घरकामे करायची व संतोषचे वडील दारूच्या आहारी गेले होते. नवरा सुधारण्याच्या पलीकडे होता; पण आपला मुलगा हातातून सुटू नये म्हणून संतोषची आई दवाखान्यात समुपदेशनासाठी आली होती.

शाळा मुलांच्या जडणघडणीचा खूप महत्त्वाचा भाग असतो; पण शाळेत बसण्यापेक्षा जर मूल शाळेतून पळून जायला लागली तर त्याचे गंभीर परिणाम पुढील जीवनात होतात. जी मुलं नियमित शाळेत जातात त्यांची सामाजिक कौशल्ये तसेच शालेय गुणवत्ता सुधारते. त्या विपरीत जी मुलं शाळा बुडवतात त्यांना पुढील आयुष्यात इतरांशी जुळवून घ्यायला जड जाते, त्यांची शालेय गुणवत्ता घसरते. पुढे जाऊन ते कायमची शाळा सोडण्याचा धोका वाढतो तसेच ही मुलं इतर असामाजिक गोष्टी जसे व्यसने करणे, जुगार खेळणे, चोरी करणे इ. गुन्हेगारीकडे वळण्याचा धोका वाढतो.

अशी प्रवाहाच्या बाहेर फेकल्या गेलेल्या मुलांना पुढील आयुष्यात काही दूरगामी परिणामांना सामोरे जावे लागते. शाळा व घर सोडून गेलेली मुले मानव तस्करीचे बळी जाऊ शकतात व त्यांचे पूर्ण आयुष्य कुस्करून जाण्याची भीती असते. अशी मुलं पुढील आयुष्यात नाती जपण्यास, नोकरी टिकवण्यास अक्षम राहू शकतात व गंभीर गुन्हेगारीकडे वळू शक्यतात. त्यामुळे शाळेचा, पालकांचा व समाजाचा प्रयत्न राहिला पाहिजे की, मुलं शाळेत टिकतील व शाळा पूर्ण करतील.

शाळा बुडवण्याची महत्त्वाची कारणे

१) कौटुंबिक कारणे : कुटुंबात आरोग्याचे प्रश्न असल्यास शुश्रूषा करण्यासाठी किंवा आर्थिक ओढाताण असल्यास मुलं शाळा बुडवतात तसेच ज्या मुलांचा शारीरिक, मानसिक किंवा लैंगिक छळ होत असेल किंवा आई-वडिलांचे मुलांकडे पुरेसे लक्ष नसल्यास मुलं शाळा बुडवतात. ज्या मुलांना घरी सुरक्षित वातावरण मिळत नाही ती मुलं पळून जाण्याची शक्यता वाढते तसेच ज्या पालकांना शाळेचे महत्त्व नसते त्या मुलांचा शाळा बुडवण्याकडे कल असतो.

२) शाळेतील कारणे : ज्या शाळेत मुलांच्या हजेरीबाबत प्रभावी धोरण नसते तिथे शाळा बुडवण्याची शक्यता वाढते. ज्या शाळेत वाईट वर्तन केल्यास अपमानित करून शाळेतून हाकलून देण्याकडे कल असतो तिथे मुलं शाळा बुडवतात. मूल शाळा बुडवते आहे हे पालकांपर्यंत शाळेकडून पोचत नसल्यास मूल पुन्हा पुन्हा शाळा बुडवण्याची शक्यता असते. जे शिक्षक वारंवार मुलांचा अनादर करतात किंवा अनास्थेने मुलांशी वागतात ती मुलं शाळा बुडवण्याची शक्यता वाढते. ज्या शाळेत वातावरण निरस, उदासीन असते तिथे मुले रमत नाही व शाळा बुडवतात. ज्या शाळेत दांडगाईविषयी योग्य धोरण नसते तिथे मुलांना सुरक्षित वाटत नाही व मुलं शाळा बुडवू शकतात. मुलांना गतिमंदत्व किंवा मतिमंदत्व असले त्यांना शालेय कामांमध्ये पुरेशी मदत मिळाली नाही व चेष्टा सहन करावी लागली तर ती मुलं हिरमुसून शाळा बुडवतात.

३) वैयक्तिक कारणे : ज्या मुलांची शैक्षणिक गुणवत्ता कमी असते त्यांच्यात आत्मविश्वास कमी असतो. ती मूलं हेटाळणी टाळण्यासाठी शाळा बुडवतात तसेच अशा आत्मविश्वास कमी असलेल्या मुलांमध्ये व्यसनाधीनता वाढते व ती मुले शाळा बुडवतात. ज्या मुलांना अभ्यासात गोडी नसते तसेच अतिचंचल, धांद्रट मुलांना शाळेतील शिस्तबद्ध वातावरणाशी जुळवून घेण्यास जड जाते व ते शाळा बुडवतात.

मुलांचे शाळेतून पळून जाणे कसे रोखावे :

शाळा, पालक आणि समाजाने एकत्र येऊन मुलांसाठी घरी व शाळेत पोषक वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. मुलाने शाळा बुडवली तर रागावण्यापेक्षा मुलं शाळेत कशी रमतील, त्यांना अभ्यासाची गोडी कशी वाटेल आणि त्यांना शाळेत सुरक्षित कसे वाटेल यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. पोलिसयंत्रणांनी शाळाभेट देऊन मुलांशी संवाद साधून पळून जाण्याच्या धोक्याबद्दल समजावले पाहिजे. दांडगाई करणाऱ्या मुलांसाठी शाळेत कडक धोरण असले पाहिजे, अक्षम मुलांसाठी शाळेत पुरेशी मदत मिळाली पाहिजे तसेच शिक्षकांनी खंबीरपणे तरी सहृदयतेने वागले पाहिजे. घरात अभाव, ताणतणाव असल्यास कुटुंबातील मोठ्यांनी सामोपचाराने वागावे.

सामाजाने आधार व मार्गदर्शन करून कुटुंबाला संकटातून बाहेर येण्यास मदत करावी ज्यामुळे मुलाला एक सुरक्षित वातावरण मिळू शकेल. पालक आणि मुलामध्ये संवाद वाढण्यासाठी समुपदेशानाची मदत होते. पालक आणि शिक्षकांमध्ये संवाद सुधारायला हवा व त्यांनी एकत्रितपणे मुलाचे शालेय आयुष्य निकोप करण्याचा प्रयत्न करावा. मुलांना नैराश्य, अक्षमता असल्यास योग्य उपचाराने, उपायाने त्यांचा आत्मविश्वास वाढवता येईल व मूल शाळा पूर्ण करेल याची खात्री करता येईल. संतोषच्या आई-वडिलांना समुपदेशानातून खूप मदत झाली व मुलाखातर त्याच्या वडिलांनी दारू सोडली. संतोष आता नियमित शाळेत जातो व त्याला मोठे होऊन डॉक्टर बनायचे आहे.

(लेखिका मनोविकार व मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT