देहबोली हा आजच्या काळातील परवलीचा शब्द बनला आहे. देहबोली म्हणजे शब्दांचा वापर न करता काही विशिष्ट शारीरिक हालचालींतून समोरच्यापर्यंत म्हणणे पोहोचवणे.
- सोनल सोनकवडे
देहबोली हा आजच्या काळातील परवलीचा शब्द बनला आहे. देहबोली म्हणजे शब्दांचा वापर न करता काही विशिष्ट शारीरिक हालचालींतून समोरच्यापर्यंत म्हणणे पोहोचवणे. अनेकदा तुमच्या शारीरिक हालचाली तुमच्या मनात काय चाललंय याची सूचना करतात. मुलाखतीदरम्यान याकडे विशेष लक्ष दिले जाते. याबद्दल तुम्ही जेवढे वाचाल तेवढे कमी आहे. परंतु या सगळ्यात समान दिसणारी गोष्ट म्हणजे तुम्हाला वाटणारा आत्मविश्वास असो किंवा तुमचा उडालेला वैचारिक गोंधळ, सारे काही तुमच्या उठण्या-बसण्याच्या पद्धतीवरून, हातवारे आणि हालचाली यांच्या मदतीने समोरचा माणूस ओळखू शकतो.
हे खरंतर आपण आजूबाजूला पाहत असतो. मित्राला एखादा प्रश्न विचारलात आणि त्याला त्याचे उत्तर येत नसल्यास त्याचे शब्द अडखळतातच. परंतु त्याला पक्कं उत्तर माहीत नाहीये हे त्याच्या हालचाली किंवा हातवाऱ्यांवरून तुमच्या लक्षात येतं. काही माणसं खोटं बोलताना किंवा काही माहिती तुमच्यापासून लपवायची असेल तर त्यासाठी हातांच्या आणि डोळ्यांच्या विशिष्ट हालचाली करतात. गोंधळून गेल्यावर दिलेलं उत्तर आणि स्पष्ट खणखणीत दिलेलं उत्तर यामधला फरक हा केवळ वैचारिक स्पष्टतेचा नसून तो तुमच्या देहबोलीतूनही समोरच्या व्यक्तीला ओळखता येऊ शकतो. त्यामुळे काही वेळा तुमचा त्यानुसार सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव तुम्ही एकही शब्द न उच्चारता समोरच्यावर पडू शकतो.
मुलाखतीसाठी त्या पॅनेलच्या समोर खुर्चीत बसल्यावर तुम्ही अगदी सूक्ष्म हालचाली केल्या तरी त्या मुलाखत घेणाऱ्या व्यक्तींच्या लक्षात येऊ शकतात. पुरुषांनी सहसा मुलाखत देताना आपले हात मांडीवर ठेवावेत आणि आपले कोपर खुर्चीच्या हातावर ठेवावे. हाताची घडी घालणे टाळावे. मुलाखत घेणारा तुम्हाला काही सांगत असल्यास लक्ष देऊन तुम्ही ते ऐकता आहात हे त्या व्यक्तीला तुमच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून लक्षात येते. त्यामुळे तुमचे हावभाव योग्य असतील याची काळजी घ्यावी.
मुलाखती दरम्यानच नव्हे तर सर्वसाधारपणे कुणाशीही बोलताना केसांशी खेळणे, केसांमधून सातत्याने हात फिरवणे, दर थोड्या वेळाने हनुवटीला हात लावणे, कानाला हात लावणे किंवा कान ओढणे, डोक्याच्या किंवा मानेच्या मागच्या भागावर हाताने चोळणे, तुमच्यासमोर टेबल असेल तर त्या टेबलावरून तुमचा तळवा किंवा हात सतत फिरवणे किंवा हातात पेन असेल तर त्याच्याशी खेळत राहणे या आणि अशा अनेक हालचालींतून तुमच्यात आत्मविश्वासाचा अभाव आहे किंवा विचारलेल्या प्रश्नाने तुम्ही गोंधळून गेला आहात याचे सूचन होते. त्यामुळे अशा गोष्टी टाळाव्यात. चुकीच्या शब्दांनी माणूस तुटतो किंवा दूर जातो असं म्हणतात.
चुकीच्या देहबोलीमुळे तुमच्या मनात नसतानाही समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमची प्रतिमा वेगळी बनू शकते आणि त्यातून ती व्यक्ती तुमच्यापासून अंतर ठेवू शकते. त्यामुळे तुम्ही काय बोलता आहात याकडे तुमचे जेवढे लक्ष असले पाहिजे तितकेच किंबहुना त्याहून जास्त लक्ष तुम्ही एखाद्याशी बोलताना तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव कसे आहेत, हातापायांची कशी हालचाल होते आहे याकडे दिलं पाहिजे. पूर्व आणि मुख्य या परीक्षा पार पाडल्यानंतर तुमची घेतली जाणारी मुलाखत व्यक्तिमत्त्वाची चाचणी असते.
तुमच्या विचारातील स्पष्टता आणि देहबोली हे दोन्ही तुमच्या व्यक्तिमत्वाचे महत्त्वाचे घटक आहेत. एखाद्या प्रश्नाचे उत्तर म्हणून तुम्हाला एखाद्या समस्येवर तुमचे मत विचारले असेल तर तुम्ही जी भूमिका घेता त्यातून तुमच्या विचारांची दिशा आणि पर्यायाने तुमचे व्यक्तिमत्त्व कसे आहे हे मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीच्या लक्षात येते. त्यामुळे उत्तरामध्ये तुमच्या विचारांची स्पष्टता दिसली पाहिजे.
(लेखिका ‘आयआरएस’ अधिकारी, गीतकार, गायिका आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.