पुणे - राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या अति मुसळधार ते मुसळधार पावसामुळे गुरुवारी दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षा केंद्रापर्यंत पोचू न शकलेल्या, परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्या-त्या विषयाची पुन्हा परीक्षा घेण्यात येईल. याबाबत लवकरच सविस्तर माहिती देण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.
राज्यात दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा १६ जुलैपासून सुरू झाली आहे. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण २८ हजार ९७६ विद्यार्थ्यांनी, तर बारावीच्या परीक्षेसाठी ५६ हजार ८४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्य मंडळाच्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे दहावीचा ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक’ विषयाचा पेपर गुरुवारी सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत होता.
तर, फक्त पात्र दिव्यांग परीक्षार्थ्यांसाठी ‘शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र’ विषयाचा पेपरही या दिवशी होता. तर, बारावीचा(सर्वसाधारण आणि बायफोकल) ‘गणित आणि संख्याशास्त्र’ विषयाचा पेपर सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत होता.
राज्यात अनेक भागात नियोजित वेळापत्रकाप्रमाणे दहावी-बारावीची परीक्षेच्या संबंधित विषयाचा पेपर झाला. परंतु, मुसळधार पावसामुळे परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संबंधित विषयाची परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे राज्य सरकारनेही जाहीर केले आहे.
‘दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा सध्या सुरू आहेत. याबाबत शालेय शिक्षण आयुक्त यांच्याशी बोलून निर्णय घेण्यात येईल. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची पुरेपुर काळजी घेतली जाईल.’
- अजित पवार, उपमुख्यमंत्री
‘दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षा सध्या सुरू आहेत. गुरूवारच्या दिवशी नियोजित वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा झाली आहे. परंतु, मुसळधार पावसामुळे पेपर देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संबंधित पेपर देण्याची संधी मिळणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून पुढील अंदाज घेऊन आवश्यकता भासल्यास परीक्षा पुढे ढकलण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.’
- शरद गोसावी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.