केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आज जाहीर झालेल्या निकालात मुंबईच्या प्रियंवदा यांनी देशात तेरावा क्रमांक पटकावला असून राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला.
पुणे - मुंबईच्या व्हीजेटीआय कॉलेजमधून अभियांत्रिकीची पदवी आणि बंगलोरच्या इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीएचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण... त्यानंतर नामांकित आंतरराष्ट्रीय बँकेत सहाय्यक उपाध्यक्ष पदावर नोकरी... असे ‘वेल सेटल्ड’ झाल्यावरही लहानपणापासून ‘आयएएस’ व्हायचे पाहिलेले अस्वस्थ करत होते... अखेर एक दिवस हिय्या केला आणि नोकरी सोडून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा देण्याचा निर्णय घेतला... अवघ्या दोन महिन्यांच्या तयारीवर केलेल्या पहिल्या प्रयत्नात यश आले नाही. मात्र कसून तयारी करत पुढच्या वर्षी परिक्षा दिली आणि थेट देशात तेरावा आणि राज्यात प्रथम क्रमांक पटकावला!
ही यशोगाथा आहे प्रियंवदा म्हाडदळकर यांची. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आज जाहीर झालेल्या निकालात मुंबईच्या प्रियंवदा यांनी देशात तेरावा क्रमांक पटकावला असून राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. ‘‘उत्तम तयारी करून परिक्षा दिली होती. त्यामुळे यश मिळेल, असा आत्मविश्वास होताच. परंतु, मिळालेले यश आश्चर्याचा सुखद धक्का देणारे आहे. या यशामुळे नक्कीच खूप आनंद झाला आहे. लहानपणापासून पाहिलेले स्वप्न साकार झाल्याचा आनंद आहे’’, अशी भावना त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.
‘वडील शासकीय सेवेत असल्याने लहानपणापासूनच प्रशासकीय सेवेचे क्षेत्र खुणावत होते. आईलाही मी प्रशासकीय सेवेत जावे, असे वाटत होते. त्यामुळे एमबीएचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरी करत असले, तरी हे स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हते. २०१८ मध्ये लग्न झाल्यानंतर हैद्राबादला स्थायिक झाले होते. २०२० मध्ये नोकरी सोडण्याचा विचार केला, तेव्हा कुटुंबातील सदस्यांनी पाठिंबा दिला. आर्थिक अवंलंबित्व नसल्याने नोकरी सोडून पूर्णवेळ अभ्यासावर लक्ष देऊ शकले. कोरोनाचा काळ असल्याने ऑनलाइन पद्धतीनेच सगळे सुरू होते. त्यामुळे बहुतांश विषयांचे स्वयंअध्ययन करण्यावर भर दिला. मात्र, समाजशास्त्र आणि एथिक्सच्या पेपरसाठी ऑनलाइन मार्गदर्शन घेतले. रोज किमान नऊ तास अभ्यासाठी द्यायचे, असा निश्चय केला होता. सातत्य महत्त्वाचे आहे, हे लक्षात ठेवले. मुख्य परिक्षेतून निवड झाल्यानंतर मुलाखतीची विशेष तयारी केली. चालू घडामोंडीचा तपशीलात अभ्यास केला. या सगळ्या मेहनतीचे चीज झाल्याचे समाधान आहे. आता लोककल्याणासाठी झोकून देऊन काम करायचे आहे’, असे प्रियंवदा यांनी सांगितले.
‘केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी करणाऱ्या मुला-मुलींना प्रत्यक्ष आणि ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन करतो. प्रत्येक विषयातील तज्ज्ञ त्या त्या विषयातील मार्गदर्शन करतात. प्रियंवदा म्हाडदळकर या मुलाखतीचे मार्गदर्शन घेण्यासाठी आल्या होत्या. तीन महिने आमच्याकडे त्यांनी तयारी केली. परिक्षेत त्यांनी मिळवलेले यश पाहून अतिशय आनंद झाला आहे. त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे मनःपूर्वक अभिनंदन.’
- महेश भागवत, पोलीस आयुक्त, राचकोंडा पोलीस आयुक्तालय, हैद्राबाद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.