आरटीई प्रवेशप्रक्रियेबाबत अद्याप संभ्रमावस्था कायम आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे यंदा मुलांना आरटीई प्रक्रिया कधी सुरू होणार? मुलांना प्रवेश कधी मिळणार? याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. गुरुवारी उच्च न्यायालयात आरटीईबाबत सुनावणी झाली. पंरतु, न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.
आरटीई कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के गरजू मुलांना मोफत प्रवेश देण्यात येतो. यंदा राज्य शासनाने आरटीई प्रक्रियेत बदल केले होते. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेले होते. न्यायालयाने आरटीईच्या जुन्या नियमाप्रमाणे आरटीई प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले होते. मात्र, या याचिकेवर ११ जुलै रोजी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मात्र, न्यायालयाने आरटीईबाबत निकाल जाहीर केला नाही. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाकडे डोळे लावून बसलेल्या पालकांचा भ्रमनिरास झाला. प्रवेशासाठी अजून किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार? असा प्रश्न पालकांना सतावत आहे.
१५ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्राला सुरवात झाली आहे. शाळा सुरू होऊन एक महिना झाला, तरी आरटीई प्रवेशप्रक्रिया रखडलेलीच आहे. खासगी शाळांमधील प्रवेशप्रक्रियेबद्दल प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने पालकांमध्ये चिंता आहे. राज्य शासनाने काढलेल्या आदेशाला उच्च न्यायालयाने शिक्षण हक्कविरोधी ठरवीत स्थगिती दिली आहे. त्यात आता खासगी शाळांनी हस्तक्षेप याचिका दाखल केल्या आहेत. त्यामुळे सुनावणीला वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा आरटीई प्रक्रिया कधी सुरू होईल, याबाबत अस्पष्टता आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आरटीईच्या एकूण ५७४ शाळा असून, ४ हजार ४५१ जागा राखीव आहेत. जिल्ह्यातून जवळपास २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शासनाने पूर्वीच्या नियमावलीप्रमाणे आरटीईची प्रवेशप्रक्रिया सुरू केली होती. परंतु, आता प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने पालकांची चिंता वाढली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.