जम्मू-काश्मीर आणि हरियाना राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहे. हरियानामध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली तर जम्मू काश्मिरमध्ये भाजप दुसऱ्या नंबरवर आहे. अजून आकडे हातात येत आहेत. हरियानातील विधानसभा निवडणुकीत मोठी राजकीय चकमक पाहायला मिळाली आहे. विशेषतः तोशाम या चर्चित मतदारसंघात भाजपा आणि काँग्रेस यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.
या मतदारसंघात भाजपा उमेदवार श्रुती चौधरी आणि काँग्रेसचे उमेदवार अनिरुद्ध चौधरी एकमेकांसमोर आहेत. दोघेही एकाच कुटुंबाचे सदस्य असून, माजी मुख्यमंत्री बंसीलाल यांच्या तिसऱ्या पिढीचे ते प्रितिनिधित्व करत आहेत. त्यामुळे ही निवडणूक एकाच घरातील राजकीय वर्चस्वासाठीची लढाई आहे.
तोशामच्या निवडणुकीला आणखी महत्त्वाचे करण्यामागचे एक कारण म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवागने काँग्रेसच्या उमेदवार अनिरुद्ध चौधरीसाठी प्रचार केला होता. सेहवागने आपला भाऊ असा उल्लेख करत मतदारांना अनिरुद्धसाठी मतदान करण्याचे आवाहन केले होते.
भाजपाने श्रुती चौधरीला उमेदवारी दिली असून ती माजी मुख्यमंत्री बंसीलाल यांची नात आहे. तर, काँग्रेसने बंसीलाल यांचे नातू अनिरुद्ध चौधरीला उमेदवारी दिली आहे. श्रुतीच्या आई किरण चौधरी यांनी बंसीलाल यांची राजकीय परंपरा पुढे नेली होती. मात्र आता अनिरुद्धच्या भूमिकेमुळे या लढाईत आणखी रंगत आली आहे.
वीरेंद्र सेहवागने अनिरुद्ध चौधरीला मोठा भाऊ मानत, त्याच्या प्रचारासाठी तोशाममध्ये मोठा उत्साह दाखवला. सेहवागने म्हटले होते की, "जेव्हा मोठा भाऊ काही काम करतो, तेव्हा त्याला मदत करणे आपले कर्तव्य आहे." सेहवागच्या या उपस्थितीने तोशामची निवडणूक अजून जास्त चर्चेत आली.
तोशाम मतदारसंघात यावेळी 62% मतदान झाले. भाजपाच्या श्रुती चौधरी सध्या आघाडीवर आहेत, त्यांना 43,338 मते मिळाली आहेत तर अनिरुद्ध चौधरी मागे असून त्याला 8,665 मतांनी मागे टाकले आहे. या आकड्यांमुळे श्रुतीच्या विजयाची शक्यता जास्त दिसत आहे.
किरण चौधरी यापूर्वी काँग्रेसच्या मोठ्या नेत्या होत्या त्यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला होता. भाजपाने त्यांना राज्यसभेत पाठवले आणि जाट समाजात एक महत्त्वाचा संदेश दिला. 2019 च्या निवडणुकीत किरण चौधरीने भाजपाच्या शशी रंजन परमार यांना हरवून विजय मिळवला होता, पण या वर्षी परिस्थिती बदलली आहे.
तोशामच्या निवडणुकीत चचेऱ्या भावंडांमधील ही चुरस राजकीय रंगमंचावर महत्त्वाची ठरली आहे. आता शेवटचा निकाल काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, पण सध्या श्रुती चौधरी आघाडीवर आहे, हे निश्चित आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.