सोलापूर : विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नऊ हजार २३२ बसगाड्या राज्यभरातील मतदान केंद्रांपर्यंत ‘ईव्हीएम’ घेवून जाणार आहेत. महामंडळाच्या स्वत:च्या मालकीच्या १३ हजार ३६७ गाड्यांपैकी नऊ हजारांहून अधिक बसगाड्या निवडणूक कामासाठी लागणार आहेत. त्यामुळे १९ व २० नोव्हेंबर हे दोन दिवस वाहतूक विस्कळीत राहील, अशी स्थिती असणार आहे.
राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, मुंबई, पालघर, रायगड, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, नाशिक, नगर, अकोला, अमरावती, यवतमाळ व बुलडाणा या १९ जिल्ह्यांमधील जवळपास ६५ टक्के बसगाड्या निवडणुकीच्या कामकाजासाठी घेतल्या आहेत. त्यामुळे या जिल्ह्यांमधील प्रवासी वाहतूक १९ व २० नोव्हेंबरपर्यंत विस्कळीतच राहील, अशी स्थिती असणार आहे. बहुतेक जिल्ह्यांमधील विभाग नियंत्रकांनी लांब व मध्यम पल्ल्यांची वाहतूक दोन दिवस नियंत्रित करून स्थानिक वाहतूक सुरु ठेवण्याचे नियोजन केले आहे.
१९ नोव्हेंबरला दुपारी एकनंतर सर्व बसगाड्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या गोदामातून ईव्हीएम उचलतील आणि प्रत्येक मतदान केंद्रांवर पोच करतील. त्यानंतर बसगाड्या पुन्हा बसडेपोत येतील. रात्रभर सेवा करून २० नोव्हेंबरला दुपारनंतर त्या गाड्या त्या त्या मतदान केंद्रांवर जातील, असे नियोजन करण्यात आले आहे. तरीपण, दोन दिवस प्रवासी सेवा विस्कळीत राहणार असून २० नोव्हेंबरच्या रात्रीपासून पुन्हा निवडणुकीसाठी नेमलेल्या बसेस प्रवासी सेवेत दाखल होतील. तुर्तास प्रवासी सेवेची मदार महामंडळाच्या ताफ्यातील भाड्याच्या बसगाड्यांवर असणार आहे.
प्रवासी सेवा सुरळीत ठेवण्याचा राहील प्रयत्न
विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी राज्यातील ३१ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नऊ हजार २३२ बसगाड्या देण्यात आल्या आहेत. मतदान केंद्रांवर साहित्य पोच केल्यावर त्या गाड्या रात्री पुन्हा सेवा देतील, जेणेकरून वाहतूक विस्कळीत होवू नये असे नियोजन आहे. २० नोव्हेंबरला पुन्हा वेळेत त्या बसगाड्या त्या त्या मतदान केंद्रांवर पोचतील. २१ नोव्हेंबरपासून बससेवा पूर्ववत होईल.
- अभिजित भोसले, जनसंपर्क अधिकारी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ
निवडणुकीसाठी बसगाड्या
एकूण बसगाड्या
१३,३६७
निवडणुकीसाठी बसगाड्या
९,२३२
पोलिसांची ने-आण करण्यासाठी गाड्या
२४५
विस्कळीत वाहतुकीचे जिल्हे
१९
‘एवढ्या’ अंतरावरील कर्मचाऱ्यांसाठीच बसगाडी
मतदान साहित्य जिल्ह्यातील तीन हजार ७२३ केंद्रापर्यंत पोच करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाकडील ४६८ बसगाड्या देण्यात आल्या आहेत. त्यात ७५ किलोमीटर अंतरावर इलेक्शन ड्यूटी आलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांपर्यंत पोच करण्यासाठी देखील काही बसगाड्यांची सोय केली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी कर्मचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी जवळपास ६० बसगाड्या देण्यात आल्या होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.