Mahayuti vs Mahavikas Aghadi  esakal
Maharashtra Assembly Election

Satara : आठही मतदारसंघांत राजकीय घमासान; विद्यमान आमदारच उतरणार निवडणुकीच्या रिंगणात, 'या' नेत्यांत थेट लढत

Satara Assembly Elections : सध्याचे चित्र पाहता विद्यमान आठही आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

उमेश बांबरे

सातारा-जावळी मतदारसंघात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याविरोधात सध्या तरी महाविकास आघाडीकडे सक्षम उमेदवार नाही.

सातारा : विधानसभा निवडणुकीचा (Satara Assembly Elections) बिगुल अखेर आज वाजला. आता जिल्ह्यातील आठही मतदारसंघांत राजकीय घमासान सुरू होईल. सध्याचे चित्र पाहता विद्यमान आठही आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा समोरासमोर लढती होतील.

सध्या पक्षीय बलाबलात महायुतीचे पारडे जड दिसत असले, तरी महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार कोण यावर निवडणुकीचे गणित अवलंबून राहील. माण-खटाव व फलटण मतदारसंघांत इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने येथे महायुती-आघाडीपुढे बंडखोरी रोखण्याचे आव्हान आहे. आजपासून आचारसंहिता लागू झाल्यामुळे आता इच्छुकांच्या पायाला भिंगरी बांधली जाईल. मतदारांपर्यंत पोचण्याची पहिली फेरी काही विद्यमान आमदारांनी लोकसभा निवडणुकीतच पूर्ण केली आहे. आता ते प्रचाराच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात करतील. #ElectionWithSakal

फलटण : दोन निंबाळकरांतच संघर्ष

फलटणमध्ये माजी सभापती व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण यांनी खासदार शरद पवारांच्या उपस्थितीत तुतारी हातात घेतली आहे. त्यामुळे फलटणमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अशी लढत पाहायला मिळणार आहे. आमदार चव्हाण ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांसोबत गेल्याने आता येथे राष्ट्रवादीला उमेदवारच राहिला नाही. त्यामुळे आता या मतदारसंघातून महायुतीत भाजपचा उमेदवार देण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे हे प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहेत. त्यामुळे फलटण जरी राखीव असला, तरी दोन्ही निंबाळकरांच्या उमेदवारांतच लढत पाहायला मिळणार आहे.

माण- खटाव : मतैक्याने उमेदवार, की बंडखोरी?

माण-खटाव मतदारसंघात भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांना अडविण्यासाठी याही वेळी त्यांचे सर्व विरोधक एकवटले आहेत; पण प्रत्येक जण शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. येथे आमदार गोरेंच्या विरोधात एकच उमेदवार देण्यास यावेळेस चूक झाली, तर शेवटच्या क्षणी आमदार गोरे बाजू पलटवू शकतात; पण त्यांचे बंधू शेखर गोरे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत असल्याने त्यांची भूमिकाही महत्त्वपूर्ण असणार आहे. आजपर्यंत माणच्या इच्छुकाला उमेदवारी दिली गेली आहे. या वेळी खटाव तालुक्याला संधी द्यावी, अशी भूमिकाही प्रभाकर घार्गे यांनी घेतली आहे. सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रभाकर देशमुख, प्रभाकर घार्गे, अनिल देसाई, अभयसिंह जगताप हे इच्छुक आहेत, तसेच काँग्रेसनेही महाविकास आघाडीकडे ही जागा सोडण्याची मागणी केली असून, त्यांच्याकडून रणजित देशमुख इच्छुक आहेत.

पाटण : महाविकासची उमेदवारी कोणाला?

पाटणमध्ये शिंदे गट शिवसेनेचे नेते व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याविरोधात रान उठविण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट एकत्रितपणे ताकद लावणार आहेत. सध्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून सत्यजितसिंह पाटणकर, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून हर्षद कदम हेही इच्छुक आहेत. त्यामुळे दोघांपैकी कोणाला महाविकासची उमेदवारी जाणार त्यावर सर्व काही अवलंबून आहे.

Satara Assembly Elections

कोरेगाव : पुन्हा दोन शिंदे भिडणार

कोरेगाव विधानसभा मतदारसंघात पारंपरिक पद्धतीने शिवसेनेचे आमदार महेश शिंदे विरुद्ध राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांच्यातच काट्याची लढत आहे. सध्या शशिकांत शिंदे यांनी मागील निवडणुकीत महेश शिंदेंकडे गेलेल्यांना पुन्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आणून पक्षाची ताकद वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. महेश शिंदेंकडूनही दररोज शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शिलेदार फोडण्याचे काम होत आहे.

कऱ्हाड उत्तर : मनोज घोरपडे की धैर्यशील?

कऱ्हाड उत्तर मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बाळासाहेब पाटील हे आमदार असून, त्यांच्याविरोधात भाजपकडून मनोज घोरपडे इच्छुक आहेत. त्यांनी यावेळेस जय्यत तयारी केल्याचे सांगितले जाते. भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम हेही इच्छुक आहेत. घोरपडे की कदम यापैकी कोणाला भाजप रिंगणात उतरवणार यावर या निवडणुकीचे गणित अवलंबून आहे. शिवाय, या जागेसाठी अजित पवार आग्रही राहणार का? राहिले तर सक्षम उमेदवार नसल्यामुळे मनोज घोरपडे घड्याळाच्या चिन्हावर लढणार का, असे प्रश्‍न उभे आहेत. या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी लक्ष घातले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून हट्ट धरला जाणार का, याचीही उत्सुकता आहे. बाळासाहेब पाटील यांच्याविरोधात एकच उमेदवार दिला, तर काट्याची टक्कर होईल.

कऱ्हाड दक्षिण : पृथ्वीराजबाबा विरुद्ध अतुलबाबा

कऱ्हाड दक्षिण मतदारसंघात विद्यमान आमदार व काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात भाजपकडून डॉ. अतुल भोसले अशी पारंपरिक लढत होणार आहे. लोकसभा निवडणुकीत बदललेली गणिते व महायुतीचे उमेदवार उदयनराजेंना वाढलेले मताधिक्य विधानसभेलाही जादू करणार का, हे पाहावे लागेल. अतुल भोसले यांच्यासाठी भाजप महायुतीच्या माध्यमातून यावेळेस जोरदार फिल्डिंग लावून त्यांना आमदार करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

वाई : पाटलांच्या विरोधात कोण?

वाई विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष सक्षम उमेदवाराच्या शोधात आहे. त्यांच्याकडे इच्छुकांची संख्या जास्त असली, तरी सर्व जण नवखे आहेत. एखादा उद्योजक किंवा डॉक्टर उमेदवार रिंगणात उतरविण्याचाही प्रयत्न राष्ट्रवादी पवार पक्षाकडून होऊ शकतो. सध्यातरी मकरंद पाटील यांचे पारडे जड आहे. किसन वीर व खंडाळा कारखान्यांची मागील बाकी ऐन निवडणुकीच्या तोंडावर देऊन त्यांनी सभासदांना खूष केलेले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार कोण यावर सर्व गणित अवलंबून आहे.

सातारा-जावळी : आघाडी उमेदवाराच्या शोधात

सातारा-जावळी मतदारसंघात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याविरोधात सध्या तरी महाविकास आघाडीकडे सक्षम उमेदवार नाही. गत निवडणुकीत उमेदवार राहिलेले दीपक पवार, तसेच अजित पवारांच्या पक्षाचे कार्याध्यक्ष अमित कदम हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. शिवसेना (उद्धव ठाकरे) कडून सचिन मोहिते आणि माजी आमदार सदाशिव सपकाळ हेही रिंगणात उतरविले जाऊ शकतात. ही जागा महाविकास आघाडीत सेनेला की राष्ट्रवादीला जाणार यावर महाविकासचा उमेदवार कोण हे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT