Latets Political News: विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोवाडमध्ये खिंडार पडली. यामुळे आमदार अनिल देशमुख यांना मोवाडमध्ये अधिकची मेहनत घ्यावी लागणार आहे.
भाजपचा गड असलेल्या मोवाड शहरात अनिल देशमुख यांचे कट्टर समर्थक व निवडणुकीदरम्यान प्रचाराची धुरा सांभाळणारे युवा कार्यकर्ते विवेक लिखार यांनी समर्थकासह भाजपमध्ये प्रवेश केला. मोवाड शहरात अनिल देशमुख यांना हा फार मोठा धक्का असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. मोवाड हे गेल्या काही निवडणुकापासून भाजपचा गड म्हणून समोर आले आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार डॉ.आशिष देशमुख यांना मोवाडमध्ये आमदार अनिल देशमुख यांच्या तुलनेत मोठे मताधिक्य मिळाले होते. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार चरणसिंग ठाकूर हेही मोवाडमध्ये अनिल देशमुखांपेक्षा आघाडीवर होते.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाआघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वे हे सर्वत्र आघाडीवर असताना मोवाडमध्ये पिछाडीवर होते. नगरपरिषद मोवाडची सत्ताही बहुमताने भाजपकडे होती.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा रस्ता पकडला. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट येथे काहीसा कमजोर झाला होता. माजी नगराध्यक्ष अनिल साठवणे व विवेक लिखार हे मोवाडमध्ये अनिल देशमुखांची धुरा सांभाळत होते.
गेल्या एक दीड वर्षांपासून विवेक लिखार यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात गळचेपी सुरू होती. त्यामुळे त्यांनी व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सोडचिठी देऊन माजी आमदार डॉ.आशिष देशमुख व चरणसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश घेतला.
विवेक लिखार यांच्यासोबत डॉ.संजय सोळंके, मोवाड माजी उपाध्यक्ष रवींद्र भंदिर्गे, अध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट दिलीप बनाईत, नितीन गुरू, उमेश लहुळकर, धीरज बेले, दीनदयाल वैद्य, संजय दुहिजोड, रवींद्र इंगोले, प्रज्वल कुंभारे, संदीप गोळे, कास काजने, मोहिद पटेल, शंकरराव वादबुद्धे, विलास पालपांडे, यादवराव सेंबेकर, लुकेश मानेकर, आशीष बांदरे, धनराजजी केवटे, प्रवीण सातपुते, नंदकिशोर मानेकर या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत स्थानिक व खडकपेंड येथील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपची वाट धरली.विवेक लिखार व सहकाऱ्यांची अनिल देशमुख यांनी साथ सोडणे व भाजपची वाट धरणे कोणाला फायद्याची राहील, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. परंतु आजतरी या घटनेची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.