सौंदत्ती-यल्लम्मा विधानसभा मतदारसंघ म्हटले, की राज्यात एकच घराण्याचे नाव चर्चेत येते ते मामणी कुटुंबाचे.
सौंदत्ती-यल्लम्मा विधानसभा मतदारसंघ म्हटले, की राज्यात एकच घराण्याचे नाव चर्चेत येते ते मामणी कुटुंबाचे. या मतदारसंघावर शेवटपर्यंत वर्चस्व ठेवलेल्या आनंद मामणी यांच्या निधनानंतर आता पहिली निवडणूक होत आहे. त्यामुळे या मतदारसंघावर राज्याचे लक्ष वेधले. सहा महिन्यांत विधानसभेच्या सर्व जागांसाठी निवडणूक होत असल्याने कमी कालावधीमुळे येथे पोटनिवडणूक लागलेली नाही. भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या सौंदत्ती-यल्लमा मतदारसंघातील भाजप व काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे येथील निवडणूक चुरशीची होणार आहे.
भाजपचे दिवंगत आमदार तथा विधानसभेचे तत्कालीन उपाध्यक्ष आनंद मामणी यांचे निधन झाल्याने त्या ठिकाणी त्यांच्या पत्नी रत्ना मामणी यांना उमेदवारी जाहीर केली आहे; तर काँग्रेसने विश्वास वैद्य यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना उमेदवारी दिली. या ठिकाणी या दोघांमध्ये थेट लढत होणार आहे. बंडखोरीमुळे प्रत्येक वेळी काँग्रेस उमेदवार अवघ्या काही मतांच्या फरकाने मागे राहिला. यंदा काँग्रेसला बंडखोरीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी धडपड करावी लागणार आहे.
२००८ मध्ये झालेल्या पुनर्रचनेत सौंदत्ती-यल्लमा या मतदारसंघाची निर्मिती झाली आहे. या ठिकाणी मामणी कुटुंबाचे वर्चस्व आहे. आनंद मामणी हे २०१३ पासून आतापर्यंत आमदार राहिले आहेत. मात्र, ऑक्टोबर २०२२ मध्ये आमदार आनंद मामणी यांचे निधन झाल्यावर येथील विधानसभेची जागा रिक्तच होती. दिवंगत आनंद मामणी हे विधानसभचे उपाध्यक्ष होते. मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आनंद मामणी यांच्या निधनामुळे अनेकांच्या राजकीय आशा उंचावल्या होत्या. मात्र, त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने त्यांच्या आशा थंडावल्या आहेत. मात्र, अनेक जण बंडाच्या पवित्र्यात आहेत. काँग्रेसमधून उमेदवारीसाठी प्रयत्न करणारे सौरभ चोप्रा हेही बंडखोरीच्या मार्गावर आहेत.
सौंदत्ती-यल्लमा मतदारसंघ हा पारसगड म्हणून ओळखला जात असे. येथून मामणी यांचे चुलत भाऊ वीरुपाक्षी मामणी, बसवराज पट्टणशेट्टी, संजीवकुमार नवलगुंद हेही उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. मात्र, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मामणी यांच्या घरी सांत्वनासाठी भेट दिली होती. त्या वेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आनंद मामणी यांच्या पत्नी रत्ना मामणी यांना उमेदवारी देण्यात येईल, अशी घोषणा केली होती.
त्यामुळे रत्ना मामणी यांना उमेदवारी मिळाली आहे. मामणी कुटुंबाचा राजकीय प्रवास काँग्रेसमधून सुरू झाला. येथे काँग्रेसचा स्वतंत्र असा मतदार आहे. येथील मुस्लिम, दलित, अन्य मागास समाजाने काँग्रेसबरोबर राहणे पसंत केले आहे. परंतु, काँग्रेसला अनेक वर्षांपासून विजयाला गवसणी घालता आलेली नाही. काँग्रेसने या वेळी विश्वास वैद्य यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे दुसरे प्रभावी नेते सौरभ चोप्रा यांनी बंडाचा झेंडा उभा केला आहे. चोप्रा यांनी धजद किंवा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला; तर याचा फटका काँग्रेसलाच बसणार आहे.
मतदारसंख्या अशी
एकूण मतदार - १,९७,७९१
पुरुष - ९९,२२७
महिला - ९८,५६२
इतर मतदार - २
मतदान केंद्रे - २३२
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.