Annapaanvidhi phalvarga  
फॅमिली डॉक्टर

अन्नपानविधी फळवर्ग

डॉ. श्री बालाजी तांबे

ओले खोबरे आरोग्यासाठी उत्तम असते. नारळाचा खवलेला कीस रोजच्या स्वयंपाकात वापरणे उत्तम असते, याने पदार्थ रुचकर तर होतोच पण खोबऱ्यातील स्निग्ध गुणामुळे पोटातील आतड्यातील नाजूक श्‍लेष्मल आवरणाचे रक्षण होते, विशेषतः मिरचीसारख्या पदार्थांची तीक्ष्णता व उष्णता बाधण्याची शक्‍यता कमी होते.

फळवर्गातील फलोत्तम असणाऱ्या द्राक्षांची आपण माहिती घेतली. ज्याला कल्पवृक्ष म्हटले जाते अशा नारळाचे काय उपयोग असतात हे आपण आज पाहू या.
संस्कृतमध्ये नारळाला ‘नारिकेल’ म्हणतात. औषधात नारळाचे फळ तर वापरले जातेच, पण नारळाची शेंडी, नारळाचा कोंब, कोवळी फुले वगैरे इतर भागही औषध म्हणून उपयुक्‍त असतात.
चरकसंहिता तसेच सुश्रुतसंहितेत नारळाचे उपयोग पुढीलप्रमाणे वर्णन केलेले आहेत,


तालशस्यानि सिद्धानि नारिकेलफलानि च।
बृंहणस्निग्धशीतानि बल्यानि मधुराणि च 

...चरक सूत्रस्थान


नारिकेलं गुरु स्निग्धं पित्तघ्नं स्वादु शीतलम्‌ ।
बलमांसप्रदं हृद्यं बृंहणं बस्तिशोधनम्‌ ।।

...सुश्रुत सूत्रस्थान
नारळाचे फळ चवीला गोड असते, गुणांनी स्निग्ध व गुरु असते तर शीत वीर्याचे असते, पित्तदोषाचे शमन करते, ताकद वाढवते, मांसधातूचे पोषण करते, हृदयाला हितकर असते व मूत्राशयाची शुद्धी करते. याखेरीज स्निग्ध गुणाचे असल्याने नारळ वातदोषाचे शमन करतो व प्राकृत कफाचे पोषण करते.

उन्हाळ्याच्या दिवसात शहाळ्याचे पाणी फक्‍त तोंडा-घशाचीच तहान भागवते असे नाही तर उष्णतेमुळे थकलेल्या शरीरधातूंनाही पुन्हा टवटवीत करू शकते. शहाळ्याच्या पाण्याचा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे ते शरीरात चटकन स्वीकारले जाते व शरीरातील जलांशाची ताबडतोब पूर्ती करू शकते. जुलाबामुळे डिहायड्रेशन होऊ नये म्हणूनही शहाळ्याचे पाणी पिणे उत्तम असते. अर्थात बरोबरीने इतर उपचार नक्कीच करावे लागतात.

काही कारणास्तव तीव्र औषधे घ्यावी लागत असल्यास, त्यामुळे शरीरात निर्माण होऊ शकणारी अतिरिक्‍त उष्णता कमी होण्यासाठी, शक्‍य तेवढी विषद्रव्ये शरीराबाहेर निघून जाण्यासाठी बरोबरीने शहाळ्याचे पाणी नियमित पिण्याचा बराच चांगला उपयोग होतो.

गर्भवतीसाठीही शहाळ्याचे पाणी उत्तम असते. आजकाल बऱ्याच स्त्रियांमध्ये गर्भाशयजल आवश्‍यकतेपेक्षा कमी होताना दिसते, हे शहाळ्याच्या पाण्यामुळे टाळता येऊ शकते (इतर काही कारण नसल्यास).
शहाळ्याचे पाणी थकलेल्या मनाला व मेंदूलाही पुन्हा स्फूर्ती देणारे असते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी, ताण असणाऱ्या बुद्धिजीवी व्यक्‍तींनी अधूनमधून शहाळ्याचे पाणी पिणे उत्तम होय.

अर्धशिशीमुळे किंवा ऊन लागल्यामुळे डोके दुखत असल्यास शहाळ्याचे पाणी खडीसाखर घालून घेण्याचा उपयोग होतो.
नारळाच्या ओल्या खोबऱ्यापासून काढलेले ‘नारळाचे दूध’ हे अत्यंत पौष्टिक असते. लहान मुलांना सहा महिन्यांनंतर बाहेरचे अन्न सुरू करतात, त्यावेळी हे नारळाचे दूध थोड्या प्रमाणात देणे उत्तम असते.

आधुनिक संशोधनानुसार नारळाच्या दुधात मोनोलॉरिन नावाचे विशेष तत्त्व असते, जे रोगप्रतिकारशक्‍ती वाढविण्यासाठी अत्यावश्‍यक असते आणि ते नारळाच्या दुधाखेरीज फक्‍त स्तन्यात सापडते. म्हणून लहान मुलांसाठी तसेच इतरांसाठीही नारळाच्या दुधाचा आहारात समावेश करणे उत्तम होय. ओले खोबरे किसून वा खवून त्यावर नारळाच्याच पाण्याचा हबका मारून मिक्‍सरच्या साहाय्याने पांढरेशुभ्र असे नारळाचे दूध काढता येते.

पित्तदोष वाढल्याने पोटात जळजळ होत असल्यास किंवा व्रण झाल्याने पोटात दुखत असतानाही नारळाचे दूध थोडे थोडे घेण्याचा चांगला उपयोग होतो.

 

पोटामध्ये जंत झाले असताना साधारण पन्नास मिली इतके नारळाचे दूध अनशापोटी घ्यावे व नंतर तासाभराने प्रकृतीनुरूप दोन-तीन चमचे एरंडेल घ्यावे. याने जुलाब होऊन जंत पडून जातात.
 

केस गळत असल्यास नारळाचे दूध केसांच्या मुळाशी अर्ध्या तासासाठी लावून ठेवावे व नंतर शिकेकाई, नागरमोथा वगैरे मिश्रणाने धुवावे.

ओले खोबरे आरोग्यासाठी उत्तम असते. नारळाचा खवलेला कीस रोजच्या स्वयंपाकात वापरणे उत्तम असते, याने पदार्थ रुचकर तर होतोच पण खोबऱ्यातील स्निग्ध गुणामुळे पोटातील आतड्यातील नाजूक श्‍लेष्मल आवरणाचे रक्षण होते, विशेषतः मिरचीसारख्या पदार्थांची तीक्ष्णता व उष्णता बाधण्याची शक्‍यता कमी होते. याच कारणास्तव त्रयोदशगुणी विड्यात किसलेले खोबरे टाकायचे असते.

काही व्यक्‍तींना पूर्ण तयार झालेले खोबरे पचण्यास जड पडू शकते परंतु शहाळ्यातील पातळ खोबरे वा मलई पचायला अतिशय हलकी असल्याने कुणालाही चालू शकते. नारळाच्या दुधाप्रमाणेच शहाळ्यातील खोबरे अतिशय पौष्टिक व विशेषतः मांसधातूची ताकद वाढविणारे असते, त्यामुळे लहान मुलांच्या आहारात अवश्‍य समाविष्ट करावे.

सातत्याने संगणकावर किंवा उन्हात, प्रखर दिव्यांच्या उजेडात काम करावे लागणाऱ्यांनी शक्‍य तेव्हा शहाळ्यातील पातळ खोबरे खाण्याची सवय ठेवल्यास डोळ्यांची आग होणे, डोके दुखणे, चक्कर येणे वगैरे त्रास दूर राहण्यास मदत मिळेल.
मांसधातूप्रमाणेच शहाळ्यातील मलई शुक्रधातूसाठीही पोषक असते. त्यामुळे गर्भधारणेसाठी प्रयत्न करण्यापूर्वी स्त्री-पुरुषांनी शहाळे खाणे हितकर ठरते.
शहाळ्याची मलई त्वचेसाठीही उत्तम असते. चेहरा, मान, हातापायाचे तळवे यावर शहाळ्याची मलई चोळून लावल्यास त्वचेचा खरखरीतपणा दूर होतो, त्वचा उजळते व अकाली सुरकुत्यांना प्रतिबंध होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Narendra Modi: उड्डाणादरम्यान नरेंद्र मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड, ऐन प्रचारादरम्यान विमानतळावरच अडकून पडले!

School Nutrition : शालेय पोषण आहारातील चॉकलेट रस्त्यावर फेकले, निकृष्टता आणि अळ्यांच्या विरोधात कारवाई

Vikramgad Assembly Constituency 2024 : पतीच्या विजयासाठी आमदार पत्नी प्रचाराच्या मैदानात,आघाडीचे ऊमेदवार सुनिल भुसारांचे पारडे जड

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

SCROLL FOR NEXT