Guardian of culture sakal
फॅमिली डॉक्टर

संस्कृतीचे संरक्षक

सकाळ वृत्तसेवा

गुरुपौर्णिमा हा आपल्या गुरूंना, सद्गुरूंना समर्पित दिवस. गुरू शब्दाचा शब्दशः अर्थ आहे मोठेपणा. अगदी सुरुवातीला लिहिण्या-वाचण्यास शिकविणारे, बाळबोध शिकविणारे ते शिक्षक. भौतिक विश्र्वातील व बाह्य जगतासाठी असल्या तरी ज्या विद्या आत्मसमाधान देतात त्या विद्या देणारे ते गुरू.

अडचणींतून मार्ग दाखविणारे ते गुरू. जीवन कसे जगावे हे सांगणारे ते गुरू. आणि अंधारातून प्रकाशाकडे नेणारे, आत्मज्ञान करवून, सर्व विश्र्वाशी संबंध जोडून, जनता-जनार्दनात देवत्व दाखविणाऱ्या व अंतिमतः सर्व कष्टांतून, संकटांतून मुक्त करवून पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्त करणारे ते सद्गुरू.

ज्या ज्ञानामुळे जीवन सुखकर होणार असते ते ज्ञान गुरुतत्त्वाने व्यापलेले असते म्हणजेच ते गुरू म्हणून प्रकट झालेले असते. जीवनात लागणारा जोडीदार, बरोबरची मित्रमंडळी; जीवनाचे अंतिम ध्येय म्हणजे समाधान, शांती व स्वातंत्र्य; हे सर्व मिळवून देण्यासाठी लागणारी जी शक्ती वा व्यक्ती तेच गुरुतत्त्व. शरीरात असणारे गुरुतत्त्व भ्रूमध्याच्या मागे मेंदूत असलेल्या पिनिअल, पिच्युटरी या ग्रंथींमार्फत चालणाऱ्या व्यवहाराशी समानता दाखविते. साहजिकच या ग्रंथींची संपूर्ण शरीरावर सत्ता असतो.

‘पाश्र्चिमात्य’ हे संबोधन देशाचे नसून प्रवृत्तीचे आहे. भौतिकता काही मर्यादेपर्यंत आवश्‍यक आहे, पण भौतिकतेमागे धावत राहणे आणि असे धावताना यापाठीमागे असलेल्या शक्तीला विसरणे योग्य नाही. व्यक्तीच्या आत शक्ती नसली तर व्यक्तीचा काय उपयोग? तेव्हा भौतिकता व शक्ती दोन्हींची उपासना महत्त्वाची आहे. व्यक्तिगत उत्कर्ष होण्यासाठी व व्यक्तिगत मोक्षप्राप्तीसाठी मार्गदर्शन करणे हे सद्गुरूंचे कार्य असते.

मोक्षाच्या ठिकाणी आपल्या मागण्या भौतिकतेच्या पार होतात. तेथे आपल्याला कशाचीच अपेक्षा नसते, कसल्याच मागण्या नसतात. हेच वैराग्य. वैरागी व्यक्तीला शरीर असते, पण त्याला मागण्या नसतात. मागणार तरी काय? साधी राहणी, नैतिक विचार, योग्य आहार, आचार व विहार यामुळे त्यांचे आरोग्य एवढे चांगले राहते की त्यांना शरीरभान राहातच नाही. वस्त्रावरही ते अवलंबून नसतात. मिळाले वस्त्र तर कंबरेला गुंडाळतात.

‘जटा बढायी, बभूत लगायी’ ही त्यांची स्थिती असते. यातूनच काही वेळा भोंदूगिरी सुरू होते. पण खरे सद्गुरू संस्कृतीचे रक्षण करतात. ते आपल्याला धर्म, यश (हातात घेतलेले काम शेवटाला नेणे), श्री (आभा), ज्ञान (ब्रह्म सत्य जगन्मिथ्या हे खरे ज्ञान), वैराग्य (आपल्याजवळ असलेले इतरांना वाटून टाकणे), ऐश्र्वर्य (कार्य करायला आवश्‍यक असलेल्या गोष्टी जवळ असणे) या सर्व गोष्टींबद्दल मार्गदर्शन करतात. हे सर्व केल्याने समाजाचे उत्थान होते, समाज एकत्र बांधून राहायला मदत होते, समाजातील भेदभाव संपायला मदत होते.

भारतीय परंपरेत परमपुरुष परमात्म्याबरोबर सर्व विश्र्व चालविण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश हे तीन देव नेमलेले आहेत. निर्मिती, संगोपन व नाश या तिन्हींचा समतोल साधण्यासाठी हे तिघे एकत्र येऊन तयार झाले आहेत सद्गुरू श्रीदत्तात्रेय. श्रीदत्तात्रेय हे सर्व सद्गुरूंचेही गुरू आहेत. पिंडब्रह्मात म्हणजे मनुष्याच्या शरीरात मेंदूचे तीन भाग म्हणजे दत्तात्रेयांची तीन मुखे.

एखाद्याला चांगली कल्पना सुचली तर ती अमलात आणण्यासाठी त्याच्याजवळ १) नवीन सृजन होणे, त्याचे संगोपन होणे आवश्यक असते, २) त्यासाठी आवश्यक ती साधनसामग्री असावी लागते. ३) मोडकळीला आलेल्या व निरुपयोगी ठरलेल्या कल्पना मोडीत काढून त्यांचा नाश करणेही गरजेचे असते. अशाप्रकारे जीवनात या तिघांचे कार्य खूप महत्त्वाचे असते.

जोपर्यंत डोंबाऱ्याला बिनदिक्कत, कुठल्याही काळजीशिवाय, डोळे मिटून तारेवर चालता येत नाही तोपर्यंत त्याला पडण्याची भीती असते, पण जेव्हा तो तारेवर सहजतेने चालू शकतो तेव्हा तो भीतीतून मुक्त झालेला असतो. जीवनाचेही असेच आहे. नाना तऱ्हेच्या समस्यांमुळे जीवनात भीती उत्पन्न होते व भीती उत्पन्न झाल्यामुळे जीवन नकोसे वाटते, यातून सुटावे असे वाटते.

जीवनातून सुटणे याचा अर्थ येथे जिवंत न राहणे असा नसून जीवनातून सुटणे म्हणजे भीती न वाटणे, आनंद निर्माण व्हावा व तो सर्वांना वाटून जीवनाची अनुभूती घेता यावी. हाच मोक्ष व हीच मुक्ती. सद्गुरू श्रद्धेची वाट दाखवून, भीती नष्ट करून जीवन जगण्याची वाट सोपी करतात.

साहजिकच आहे की यात आरोग्याचे मार्गदर्शन सर्वप्रथम येते कारण शरीर हे मन व्यक्त करण्यासाठी एक साधन आहे. परमशक्ती-आत्मशक्ती ही मनाच्या मागची शक्ती असते. आत्मा व मन हे शरीराच्या माध्यमातूनच व्यक्त होत असतात म्हणून शरीराच्या आरोग्याला प्रथम महत्त्व मिळाल्यास त्यात वावगे दिसत नाही. पण नुसते शरीर सुदृढ असून चालत नाही. म्हणून आरोग्याची व्याख्या करत असताना आयुर्वेदाने ‘प्रसन्नात्मेन्द्रियमनाः’ असे म्हटलेले आहे.

शरीरातील तीन दोष, सात धातू, तीन मल व अग्नी हे भौतिक पातळीवरचे १४ मुद्दे संतुलित असतील तेव्हा सर्व इंद्रिये संतुलित होतात व त्यानंतर मनाचे कार्य स्वतंत्रपणे चालू शकते. असे झाले तरच आत्म्याचा या पिंडब्रह्मावर प्रभाव दिसून येतो किंवा ताबा राहू शकतो. मन व आत्मा प्रसन्न राहिल्यास परमात्मप्राप्ती, परम प्राप्ती, मुक्ती, मोक्ष मिळेल.

आयुर्वेद ही भारतीय परंपरा असून यात अनेकांनी मार्गदर्शन करून जीवन सुखी करण्याचे मार्ग दाखविलेले आहेत. लहान मुलाची टाळू भरण्याने, त्याच्या कानात तेल घालण्याने, त्याला अभ्यंग करण्याने गेली हजारो वर्षे झालेला फायदा विसरून मुलाच्या अंगाला तेलाचे बोट लावू नये, कानात तेलाचा थेंबही घालू नये अशा तऱ्हेच्या आचरणापर्यंत अनेक जण आलेले दिसतात कारण त्यांची ज्ञानावरची, सद्गुरूंवरची श्रद्धा कमी झालेली असते.

सृष्टीच्या उत्पत्तीपासून ते प्रलयापर्यंत सर्व प्राणिमात्रांना सुखी जीवन जगता यावे म्हणून आवश्यक असलेले सर्व ज्ञान, परंपरा या सद्गुरू परंपरेने आपल्यापर्यंत येतात. आपणही आपल्या परंपरा, आपले सिद्ध झालेले पारंपरिक ज्ञान जुने समजून टाकून न देता त्या ज्ञानाला गुरूंच्या मार्गदर्शनाखाली सध्याच्या धकाधकीच्या जीवनात उजाळा देऊन कसे वापरावे हे अवगत करून घेण्याची आवश्‍यकता आहे.

सद्गुरूंच्या कृपेने ही जिज्ञासा भारतीयांमध्ये उत्पन्न झाली, पुनः एकदा भारतीयत्व जागृत झाले तर भारत नक्कीच सुखाच्या शिखराकडे जाऊ शकेल.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atul Parchure Passed Away: मराठी रंगभूमीवरचा हरहुन्नरी तारा निखळला! अभिनेते अतुल परचुरे यांचे ५७ व्या वर्षी निधन

Bopdev Ghat Case Update: बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील दुसरा आरोपी ताब्यात; पुणे पोलिसांनी उत्तर प्रदेशातून केली अटक

India summons Canadian diplomat : निज्जर हत्येप्रकरणी आरोप खपवून घेतले जाणार नाहीत! कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यास भारताचे समन्स

Gunaratn Sadavarte: बिगबॉसमध्ये गेलेल्या सदावर्तेंवर हायकोर्टाची नाराजी! त्यांना गांभीर्यच नसल्याचा ठेवला ठपका

Latest Maharashtra News Live Updates: भाजपच्या पराभूत उमेदवारांना पुन्हा उमेदवारी नाही

SCROLL FOR NEXT