World Earth Day Special sakal
फॅमिली डॉक्टर

पादस्पर्शं क्षमस्व मे।

भारतीय प्राचीन परंपरेत ऋषिमुनींनी व आयुर्वेदाने अशा बऱ्याच गोष्टी सुचविलेल्या आहेत, ज्यामुळे प्रदूषण कमी करता येईल.

सकाळ वृत्तसेवा

भारतीय प्राचीन परंपरेत ऋषिमुनींनी व आयुर्वेदाने अशा बऱ्याच गोष्टी सुचविलेल्या आहेत, ज्यामुळे प्रदूषण कमी करता येईल.

भारतीय प्राचीन परंपरेत ऋषिमुनींनी व आयुर्वेदाने अशा बऱ्याच गोष्टी सुचविलेल्या आहेत, ज्यामुळे प्रदूषण कमी करता येईल. प्रदूषण न करणे हे जसे महत्त्वाचे आहे तसेच असलेले प्रदूषण दूर व त्याला न्यूट्रलाईझ करणे हेही अत्यंत गरजेचे व आवश्‍यक आहे आणि त्यादृष्टीने प्रयत्न होणे खूप गरजेचे आहे. पर्यावरणावर प्रेम करावे, त्याचे संरक्षण करावे, त्याचे पूजन करावे यासाठीच वनस्पती, नद्या, नाले, पर्वत वगैरेंना देवतास्वरूप मानण्याची भारतीयांची संकल्पना असावी असे दिसते.

भारतीय संस्कृती ही संपूर्ण मानवजातीसाठी वरदानस्वरूप आहे. जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रत्येक लहान-लहान गोष्टीचा ज्या बारकाईने आणि शास्त्रीय परिपूर्णतेने यात अंतर्भाव केला आहे त्यावरून आपल्या ऋषिमुनींच्या प्रगल्भतेसमोर नतमस्तक व्हावेसे वाटते. आज हे मुद्दाम सांगण्याचे कारण असे की आज आहे ‘जागतिक वसुंधरा दिन’. १९७० सालापासून हा दिवस २२ एप्रिलला जगभरात साजरा होतो. भारतीय संस्कृतीमध्ये मात्र रोज सकाळी उठल्यावर जमिनीवर पहिले पाऊल ठेवण्यापूर्वी पृथ्वीमातेला नमन करण्याची आणि पाय ठेवण्यावाचून पर्याय नसल्याने क्षमस्व म्हणण्याची प्रथा आहे.

‘समुद्रवसने देवि पर्वतस्तनमण्डले । विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे ।।’ समुद्ररूपी वस्त्र, पर्वतरूपी शरीराकार असणाऱ्या विष्णुपत्नीला म्हणजेच पृथ्वीमातेला माझे नमन असो आणि पायाचा स्पर्श झाल्याबद्दल पृथ्वी मला क्षमा करो. ब्रह्मांडातील असंख्य ग्रहताऱ्यांचा मनुष्याने अभ्यास केला. पण अजून तरी जीवसृष्टीयुक्त असा एकमेव ग्रह म्हणजे आपली पृथ्वी. धरा, धरती, वसुंधरा या पर्यायी नावांवरून पृथ्वी आपले धारण करणारी आहे हे लक्षात येते. मानव असो किंवा प्राणी-पशू-पक्षी असोत, आपल्या सर्वांच्या विविध गरजा भागवण्याचे सामर्थ्य या पृथ्वीतच आहे. अन्न-वस्त्र-निवारा या सर्वांसाठी आवश्यक असणारी मूळ द्रव्ये जमिनीतून, सागरातून किंवा पृथ्वीच्या वातावरणातूनच मिळत असतात. सुखसोयींसाठी असंख्य साधने मानवाने आज निर्माण केली असली तरी नैसर्गिक संसाधनांखेरीज त्याचे पानही हलणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा नैसर्गिक संसाधनांचा प्रमाणातच वापर करणे, नैसर्गिक स्रोत पर्युषित, अशुद्ध न करणे, फक्त स्वतःपुरता किंवा क्षणिक सुखाचा विचार न करता ज्या पृथ्वीला आपण माता म्हणून संबोधतो तिच्या सुखाचा, तिच्या आरोग्याचा विचार करणे याचे सर्वांनी भान ठेवायला हवे.

आजकाल जरा शहराबाहेर पडले तर मोठ्या कारखान्यांमधून उंचच उंच पोकळ नरसाळ्यांमधून विषारी काळा धूर आकाशात जाण्याची व्यवस्था केलेली दिसते. आकाश अनंत वाटले तरी एका विशिष्ट मर्यादेने पाहिले असता त्याची व्याप्ती मर्यादित असते. त्या मर्यादित आकाशात विषारी वायू जमा झाले तर त्यांना दुसरीकडे जायला वाव नसल्याने ते आकाशातच तरंगत राहतात व पावसाळ्यातील जलधारांबरोबर परत पृथ्वीवर येऊन पोचतात. ही वरून आलेली विषद्रव्ये नदी- नाल्यात मिसळतात, पीक-पाण्याची हानी करू शकतात व पर्यायाने आरोग्याला हानिकारक ठरतात. सहलीला गेल्यानंतर इकडे तिकडे टाकलेला कचरा सहसा पत्रा, प्लॅस्टिकसारख्या द्रव्यांचा असतो ज्याचे विघटन न झाल्याने तो अनेक वर्षे मातीत पडून राहतो व त्यामुळे आजूबाजूच्या कीटकांना किंवा तो कचरा वाहत नदीत गेल्यास नदीत असलेल्या मत्स्यादी प्राण्यांना धोका उद्भवू शकतो.

तसेच कचरा अनेक दिवस पडून राहिल्यास निर्माण झालेल्या वळचणीत जीवजंतू तयार होतात व त्यापासूनही मनुष्याला संसर्ग होऊ शकतो. सांडपाणी वगैरे इकडे तिकडे सोडल्यास अथवा विजेरी वा इतर उपकरणांचे वापरलेले सेल इकडे तिकडे टाकल्याने त्यातून निघणारी विषारी द्रव्ये पाण्यात मिसळतात. मनुष्याला साधारणतः कल्पना येत नाही पण खाल्लेली सर्व औषधे, हॉर्मोन्स नंतर शरीरातून मल-मूत्रांद्वारे विसर्जित केल्यावर पुन्हा पृथ्वीच्या पोटात जाऊन पृथ्वीच्या खाली असलेले पाणी दूषित करतात. स्त्रियांना दिलेल्या हॉर्मोन्सच्या गोळ्या अशा तऱ्हेने पृथ्वीच्या पोटातील पाण्यात मिसळल्यामुळे मासे वगैरे प्राण्यांवर होणारे परिणाम प्रयोगसिद्ध आहेत. मनुष्याच्या पोटातही हेच प्रदूषित पाणी गेल्याने काय परिणाम होत असतील ते वेगळे सांगण्याची गरज नाही.

पर्यावरणाचा नाश होईल असे काहीही न करणे हे प्रत्येक मनुष्याचे प्रथम कर्तव्य आहे. म्हणजेच वाहने मर्यादित प्रमाणात वापरणे, विजेसारख्या सर्व प्रकारच्या शक्तींचा वापर कमीत कमी करणे, विघटन न होणाऱ्या कचऱ्याची वा इ-कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित लावणे, नदी-नाले दूषित न करणे, वृक्ष-लागवड करणे व जंगले वाढवणे या सर्व उपाययोजना केल्या तरी त्या पुरेशा नाहीत. वातावरणात जमलेले विषारी वायू व वाढलेली उष्णता कमी करण्याच्या दृष्टीने काही ठोस प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. भारतीय प्राचीन परंपरेत ऋषीमुनींनी व आयुर्वेदाने अशा बऱ्याच गोष्टी सुचविलेल्या आहेत ज्यामुळे प्रदूषण कमी करता येईल. प्रदूषण न करणे हे जसे महत्त्वाचे आहे तसेच असलेले प्रदूषण दूर व त्याला न्यूट्रलाईझ करणे हेही अत्यंत गरजेचे व आवश्‍यक आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न होणे खूप गरजेचे आहे. पर्यावरणावर प्रेम करावे, त्याचे संरक्षण करावे, त्याचे पूजन करावे यासाठीच वनस्पती, नद्या, नाले, पर्वत वगैरेंना देवतास्वरूप मानण्याची भारतीयांची संकल्पना असावी असे दिसते.

मनुष्याने दैनंदिन दिनक्रमातील आहाराचे नियम पाळले, आरोग्यासंबंधीचे नियम पाळले, व्यायाम केला, योग्य ते औषध-पाणी घेतले तरी पर्यावरणातील बिघाडामुळे कोरोनासारखा साथीचा रोग आला तर काय विध्वंस होऊ शकतो याचा आपण अनुभव घेतलेला आहे. पृथ्वीचा अनादर केला तर ऋतुमानात बदल होतात, भूकंप, वादळे, त्सुनामी, महिनों-न-महिने पेटणारे वणवे या सर्व विध्वंसक आपत्तीला तोंड देणे कर्मकठीण होऊन बसते, याला आपण साक्षी आहोत. यामुळे आरोग्य तर बिघडतेच, पण जीवन जगणेच अशक्य होऊ शकते. तेव्हा कणाकणात असलेल्या ईश्र्वराला जपून त्याला शुद्ध ठेवण्यातच सर्वांचे भले आहे हे समजून घेण्याची वेळ आलेली आहे.

याच उद्देशाने ‘लाइफ इन् बॅलन्स’ हा संकल्पना साकार केलेली आहे. जितके अधिक लोक या संकल्पनेला समजून घेतील, या चळवळीत सहभागी होतील तितकी निसर्गजतनाची, पृथ्वीच्या रक्षणाची, एकंदर संपन्न जीवनाची मूल्ये रुजवता येतील. भौतिकता व मानवता, धनसंपत्ती व समाधान, कर्तव्य आणि परमार्थ या जोड्यांमधील संतुलन म्हणजे ‘लाइफ इन् बॅलन्स’ ही मूव्हमेंट! शारीरिक आरोग्य, मानसिक प्रसन्नता, आकर्षक व्यक्तिमत्व, समाधानी वृत्ती, सामाजिक सौख्य, निसर्गसंवर्धन, सुखी व संपन्न जीवन हे सगळे मिळविण्याचा सोपा व प्रभावी उपाय म्हणजे ‘लाइफ इन् बॅलन्स’. जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने या प्रकल्पात सहभागी होण्याने खऱ्या अर्थाने हा दिवस फक्त आजच नाही तर रोजच साजरा करता येईल.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या विपुल लेखनातून संकलित)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT